हातकातरो खांबावर हात कापल्याचे ऐतिहास‌िक पुरावे नाहीत : ॲड.कार्लुस फेरेरा

व्हिडीओवरून खट्टर विरोधात आणखी एक तक्रार

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
हातकातरो खांबावर हात कापल्याचे ऐतिहास‌िक पुरावे नाहीत : ॲड.कार्लुस फेरेरा

पणजीः जुने गोवे (Old Goa)  येथील खांबाचे खरे नाव ‘पेलोरिन्हो नोवो’ म्हणजे नवा खांब असे आहे. ३०-४० वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका पुस्तकाच्या आधारावर त्याचा ‘हातकातरो खांब’ असा उल्लेख आहे. मात्र; या खांबावर लोकांचे हात कापले असल्याचे ऐतिहास‌िक पुरावे नाहीत. मात्र गौतम खट्टर यांनी एका व्हिडीओत याचा उल्लेख केल्यावर गोवा सरकारने ‘हातकातरो खांब’ संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले, असा दावा हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा (Carlos Alvares Ferreira)  यांनी केला.  

एका वर्षापूर्वी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावर आक्षेपार्ह टिका करणाऱ्या गौतम खट्टर यांनी हातकातरो खांबाचा विषय घेऊन सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा उल्लेख एका व्हिडीओत केला. या व्हिडीओवरून नव्याने खट्टर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर ॲड. फेरेरा बोलत होते. 

२९ ऑक्टोबर २०२५ मध्ये खट्टर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावर व्हिडीओ काढून त्यांना आतंकवादी संबोधत आम्ही आयुष्यात न ऐकलेल्या गोष्टींचा वापर केला होता. त्यासाठी एक वेगळी घटना म्हणून त्याचे सर्व शब्द लिहून एक तक्रार दाखल केली असल्याचे ॲड. फेरेरा यांनी सांगितले. 

या व्हिडीओत त्यांनी जुने गोवे येथील ‘हातकातरो खांबा’चा उल्लेख केला. त्याचे खरे नाव ‘पेलोरिन्हो नोवो’ म्हणजे नवा खांब, जे एका गावचे किंवा शहराचे केंद्र. या केंद्रावर घोषणा होत होती व गावाची सुरूवात होत होती. त्या खांबावर लोकांचे हात कापत होते; असे सांगून एक पॅटर्न तयार केला, असा आरोप ॲड. फेरेरा यांनी केला. 

गोव्यात पूर्वी सेंट झेवियर लोकांचे हात कापत होते; ही चुकीची आणि द्वेषपूर्ण माहिती लोकांच्या मनात पेरण्यासाठी ही रणनिती आहे. तसेच यात सरकारचा सुद्धा हात आहे. हा व्हिडीओ आल्यानंतर भरपूर लोकांनी लाईक, कमेंट केल्याने लोकांच्या मनात एक भावना तयार झाली. मग गोवा सरकारने मार्च २०२६ मध्ये ‘पेलोरिन्हो नोवो’ हा ‘हातकातरो खांब’ या नावाने संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले, असा दावा फेरेरा यांनी केला. 

लोकांनी मला हा व्हिडीओ पाठवल्यावर मी प्रथम त्याची पडताळणी करून तक्रार दाखल केली. आणि पोलिसांना ‌व्हिडीओची लिंक सुद्धा दिली आणि तो व्ह‌िडीओ डावनलोड करून एका ड्रायव्हमध्ये सेव्ह केला. हे प्रकरण गाजल्यानंतर हा व्हिडीओ खट्टर डिलीट करणार किंवा पोलीस साईट ब्लॉक करण्याचा आदेश देणार. त्यामुळे पुरावे सापडणार नाहीत असा संशय ॲड. फेरेरा यांनी व्यक्त केला आहे. 


हेही वाचा