लैंगिक शोषण, जादूटोणा, आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप

सोलापूर : स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या मनोहर भोसले ऊर्फ मनोहर मामाला पुन्हा अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर मनोहर मामाच्या काळ्या कर्तृत्वाच्या सुरस कथा आता समोर येत असून, पोलिसांनी त्याच्या आर्थिक साम्राज्याचा तपास करण्यासाठी कंबर कसली आहे. सोमवारी गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), सायबर क्राईम आणि आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्या विविध आश्रमांवर संयुक्त धाडी टाकून झाडाझडती सुरू केली आहे.
करमाळा तालुक्यातील घोटी येथे मनोहर भोसलेने २७ एकरांमध्ये एक आलिशान आश्रम उभा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, २०११ मध्ये लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर आणि जामिनावर सुटल्यावर त्याने हे नवीन साम्राज्य उभे केले. घोटी येथील हा आश्रम त्याच्या पत्नीच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय बारामतीजवळील गोजूबावी येथील जागा त्याचा विश्वासू सहकारी विशाल वाघमारे याच्या नावावर असल्याचे समजते. उंदरगाव, गाणगापूर आणि पुणे येथील मालमत्तांचीही पोलीस एकाच वेळी चौकशी करत आहेत.
आधी २१ हजारांची पावती, मगच भविष्य!
मनोहर मामाच्या दरबारात लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडला जात होता. भविष्य जाणून घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आधी ११ ते २१ हजार रुपयांची सक्तीची पावती फाडावी लागत असे. पावती असल्याशिवाय कोणालाही प्रवेश मिळत नसे. विशेष म्हणजे, गावातील लोक त्याच्याकडे जात नसले तरी, अनेक लोकप्रतिनिधी आणि परराज्यातील भाविक त्याच्या जाळ्यात अडकले होते. या माध्यमातून त्याने कोट्यवधींची माया जमवल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तपास यंत्रणांच्या हाती लागणार ‘घबाड’
आर्थिक गुन्हे शाखा सध्या आश्रमातील सर्व आर्थिक व्यवहार आणि देणग्यांच्या नोंदी तपासत आहे. ही प्रचंड संपत्ती जमवण्यासाठी त्याला कोणी आर्थिक रसद पुरवली? यात आणखी किती प्रभावशाली व्यक्तींचे चेहरे दडले आहेत? याचा शोध घेतला जात आहे. सायबर विभागाकडून त्याच्या डिजिटल व्यवहारांची आणि गैरकृत्यांची माहिती गोळा केली जात आहे.
तपासाचा फास आवळला
मनोहर भोसले सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्यावर फसवणूक आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. घोटी, उंदरगाव, मांजरी येथील फार्म हाऊस आणि पुण्यातील फ्लॅटवर एकाच वेळी कारवाई सुरू असल्याने भोंदूगिरीचे हे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.