विराटचा माजी सहकारी बनला देवदूत; जखमी लुंगी एनगिडीसाठी उभारला 'ग्रीन कॉरिडॉर'

दिल्ली पोलिसांनी अवघ्या ११ मिनिटांत जखमी खेळाडूला पोहोचवले रुग्णालयात; ६० अधिकाऱ्यांची धडपड अखेर फळाला.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
44 mins ago
विराटचा माजी सहकारी बनला देवदूत; जखमी लुंगी एनगिडीसाठी उभारला 'ग्रीन कॉरिडॉर'

नवी दिल्ली: खेळपट्टीवर कधीकाळी विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून क्रिकेट खेळणारे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे दिल्ली पोलीस सहाय्यक आयुक्त (ACP) संजय सिंह यांनी शनिवारी आपल्या प्रसंगावधानाने एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचे प्राण वाचवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी हा गंभीररित्या जखमी झाला होता. दिल्लीच्या संध्याकाळच्या प्रचंड वाहतूक कोंडीतून मार्ग काढत एसीपी संजय सिंह यांनी अवघ्या ११ मिनिटांत एनगिडीला रुग्णालयात पोहोचवले. एरव्ही हे अंतर पार करण्यासाठी ३० मिनिटांहून अधिक वेळ लागतो.


Lungi Ngidi injury


फिरोजशाह कोटला मैदानावर पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीत मिड-ऑफला झेल घेण्याच्या प्रयत्नात लुंगी एनगिडी डोक्यावर आदळला. मैदानावरील प्राथमिक उपचारानंतरही दुखापतीचे गांभीर्य वाढल्याचे लक्षात येताच, ६ वाजून १६ मिनिटांनी रुग्णवाहिका स्टेडियमवरून बाहेर पडली. दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील संध्याकाळची वेळ म्हणजे ट्रॅफिकचा पीक अवर. अशा परिस्थितीत गुगल मॅप्सने दाखवलेल्या मार्गावर रुग्णवाहिका अडकण्याची दाट शक्यता होती. मात्र, मैदानावर तैनात असलेल्या एसीपी संजय सिंह यांनी आपल्या क्रिकेटच्या अनुभवातून दुखापतीचे गांभीर्य ओळखले आणि तातडीने 'ग्रीन कॉरिडॉर' निर्माण करण्याचा धाडसी निर्णय घेतला.


DC's Lungi Ngidi in hospital after banging his head into field, to be  discharged shortly - The Tribune


एसीपी संजय सिंह यांनी स्वतःच्या अनुभवाचा वापर करत गुगल मॅप्सचा मार्ग नाकारून लांबचा पण मोकळा मार्ग निवडला. त्यांनी नियंत्रण कक्षाशी समन्वय साधून ट्रॅफिक सिग्नल मॅन्युअली सिंक्रोनाइझ केले. एनगिडी हा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे आणि त्याची दुखापत गंभीर होती. एक क्रिकेटपटू म्हणून मला माहिती आहे की, मैदानातील दुखापतीकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती किती भीषण होऊ शकते. त्यामुळे आम्ही कोणताही धोका न पत्करता हा तात्काळ ग्रीन कॉरिडॉर उभारला, असे एसीपी सिंह यांनी नमूद केले. सहसा अशा कॉरिडॉरचे नियोजन आधी करावे लागते, मात्र ही मोहीम काही मिनिटांतच राबवण्यात आली.


What Has Happened To Lungi Ngidi - Delhi Capitals Star Suffers Nasty Injury,  Ambulance Arrives On Ground During DC vs PBKS | Cricket News


या थरारक मोहिमेत सुमारे ६० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वय साधला. कोणत्याही सुरक्षा एस्कॉर्टशिवाय वायरलेस सेटवर एकमेकांशी संपर्क ठेवून १० किलोमीटरचा रस्ता रिकामा करण्यात आला. परिणामी, ६:२७ वाजता रुग्णवाहिका बीएलके मॅक्स रुग्णालयात सुखरूप पोहोचली. रुग्णालयात स्कॅनिंग आणि प्राथमिक उपचारानंतर एनगिडीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दिल्ली कॅपिटल्स आणि आयपीएलने सोशल मीडियावरून एनगिडी सुरक्षित असल्याची माहिती दिली. रात्री उशिरा स्वतः एनगिडीनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून चाहत्यांचे आभार मानले.


Lungi Ngidi Suffers Serious Head Injury In IPL Clash, Delhi Traffic Police Green  Corridor Gets DC Pacer To Hospital In 11 Minutes | VIDEO | Republic World

हेही वाचा