६० जण अत्यवस्थ; झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात खळबळ

रांची : उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरचे चटपटीत पदार्थ खाणे एका कुटुंबाच्या आणि संपूर्ण गावाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये घडली आहे. गिरिडीह जिल्ह्यातील बाजो गावामध्ये पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ६० जणांना विषबाधा झाली असून, दुर्दैवाने यामध्ये एका ७ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. रंजन कुमार असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून अन्नाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाजो गावातील एका स्थानिक पाणीपुरी विक्रेत्याकडून गावातील अनेक लहान मुलांनी आणि नागरिकांनी पाणीपुरी खाल्ली होती. मात्र, खाल्ल्यानंतर काही तासांतच अनेकांना मळमळणे, उलट्या आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला काही जणांवर स्थानिक पातळीवर उपचार करण्यात आले, मात्र त्रास वाढत गेल्याने त्यांना तातडीने जिल्हा सदर रुग्णालय आणि जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ७ वर्षीय रंजन कुमारची प्राणज्योत मालवली. सध्या २० हून अधिक मुलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच गिरिडीहचे उपायुक्त रामनिवास यादव यांनी रुग्णालयात धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार, कडाक्याच्या उन्हात पाणीपुरीचे साहित्य आणि पाणी योग्य तापमानात (फ्रिजमध्ये) न ठेवल्यामुळे त्यात घातक बॅक्टेरिया तयार झाले असावेत. कित्येक दिवस साठवून ठेवलेले शिळे पदार्थ किंवा दूषित पाणी यामुळे ही विषबाधा झाली असावी, अशी शंका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाने पाणीपुरीचे नमुने आणि पाण्याचे अवशेष जप्त केले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा
उन्हाळ्याच्या दिवसांत अन्नपदार्थ लवकर खराब होतात, त्यामुळे नागरिकांनी बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेषतः पाणीपुरी, बर्फाचे गोळे आणि कापलेली फळे यांपासून संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
उन्हाळ्यात बाहेरचे खाताना ही काळजी घ्या!
ताजेपणा तपासा: पदार्थ नेहमी गरम आणि डोळ्यादेखत तयार केलेलाच खावा.
पाण्याची शुद्धता: उघड्यावरच्या चटण्या किंवा पाणीपुरीचे पाणी पिणे टाळावे. शक्य असल्यास स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
स्वच्छता: विक्रेत्याचा परिसर आणि भांडी स्वच्छ आहेत का, याची खात्री करा.
लक्षणे ओळखा: पोटदुखी, उलट्या किंवा जुलाब सुरू झाल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.