भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, सृष्टीतील प्रत्येक श्रेष्ठ गोष्ट, मग ती विद्या असो (अध्यात्मविद्या), अक्षरे असो (अकार), किंवा मानवी गुण असोत (क्षमा, स्मृती, धृती), ते सर्व त्यांचेच स्वरूप आहेत.

पाहिलेल्या वस्तूची निरंतर आठवण करून देणारी जी स्मरणशक्ती आहे, ती स्मृतीही माझीच विभूती आहे. या इहलोकी जी स्वहितानुकूल बुद्धी असते तीही मीच होय. त्रिलोकांतील 'धृती' म्हणजे धारणा म्हणजे मनात धरून ठेवण्याची जी शक्ती आहे, तीही मीच आहे. क्षमाही मीच आहे.
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वाद:
प्रवदतामहम् ।।३२।।
अक्षराणामकारोsस्मि द्वंद्व:
सामासिकस्य च ।
अहमेवाक्षय: कालो धाताsहं विश्वतोमुख: ।।३३।।
सरळ अर्थ : हे अर्जुना, सर्व सृष्टीचा आदी, अंत व मध्यही मीच आहे. तसेच मी सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या म्हणजे ब्रह्मविद्या मी आहे. आणि परस्परांत विवाद करणाऱ्यांमध्ये तत्वनिर्णयासाठी केला गेलेला वाद मी आहे.
तसेच मी अक्षरांमधे 'अ'कार आणि समासांमधे द्वंद्व नामाचा समास आहे. तसेच अक्षय काल अर्थात् कालाचाही महाकाल आणि विराट्स्वरूप सर्वांचे धारण व पोषण करणाराही मीच आहे.
विस्तृत विवेचन : सगळ्या चांदण्या वेचून घेण्याची इच्छा झाली तर त्यासाठी ज्याप्रमाणे आधी आकाशाची मोट नीट बांधायला हवी किंवा पृथ्वीवर परमाणू किती आहेत, त्यांची मोजणी करायची झाली तर ज्याप्रमाणे संपूर्ण पृथ्वीचा गोल उचलून काखेत घ्यावा लागेल किंवा महावृक्षाची फुले, फळे, फांद्या एकदमच हाती धराव्या असे वाटत असेल, तर ज्याप्रमाणे त्या महावृक्षाचे मूळ उपटून हाती घ्यावे लागेल त्याप्रमाणे जर माझे सगळे आघवे विभूतिविशेष कळावे असे वाटत असेल, तर माझे निर्विकार निर्मळ स्वरूप जाणून घेणे आवश्यक आहे. एरवी नाहीतर अर्जुना, तू माझ्या वेगवेगळ्या किती विभूती ऐकशील?
तरी हे बुद्धिमंता, जे जे सगळे आहे ते ते सगळे तत्वता मीच आहे, हे तू नीट जाणून घे. जसे वस्त्रामध्ये एकच सूत सगळीकडे ओतप्रोत भरलेले असते, तसा हे किरीटी, या समस्त सृष्टीच्या आदी, मध्य व अंत यांच्यामध्ये सगळीकडे मी आणि मीच एकटा ओतप्रोत भरून राहिलेला आहे. असे माझे सर्वव्यापकाचे परिपूर्ण ज्ञान झाले की मग माझ्या वेगवेगळ्या विभूती जाणून घेण्याचे प्रयोजनच राहत नाही.
पण तुझा तसा अधिकार नाही, म्हणून ते जाऊदे. तू विचारलेल्या माझ्या विभूती मी तुला सांगतो.
सर्व विद्यांमध्ये मी अध्यात्मविद्या आहे. अध्यात्मविद्या म्हणजे आत्मस्वरूपासंबंधीची विद्या. ब्रह्माच्या सहज स्थितीला 'अध्यात्म' असे नाव देतात. ज्या ज्ञानामुळे परमात्मवस्तूचा अनुभव येतो व बाकी सर्व प्रपंचज्ञान हे अज्ञान आहे असे समजते, ते अध्यात्मज्ञान. अंतिम सत्य शोधून काढण्याच्या दृष्टीने केलेले अनुभवाचे पृथक्करण म्हणजे अध्यात्मशास्त्र. पिंडब्रह्मांडाच्या बुडाशी कोणते श्रेष्ठ तत्व आहे व मनुष्याने तद्रूप कसे व्हावे, हे ठरविण्यासाठी अध्यात्मशास्त्राची प्रवृत्ती आहे.
वक्त्यांच्या ठिकाणी वाद म्हणून जो काही असतो तो माझीच विभूती आहे, असे समज. वाद म्हणजे काय? कोणता वाद? एखाद्या ठिकाणी एखाद्या वेळी तिथे जमलेले शास्त्राच्या आधाराने बरेच काहीबाही बोलतात, पण त्यांचे एकमत होत नाही. वादावादाने वादच वाढत जातो पण निर्णय काही केल्या होत नाही. असा होणारा वाद तो वाद नव्हे, (तो वितंडवाद) जो वाद ऐकून श्रोत्यांचा तर्क स्वाभाविकपणे जोर घेतो आणि ज्या वादाच्या अंतर्गत होणारी प्रवक्त्यांची पांडित्य-प्रचुर भाषणे ऐकायला मधुर वाटतात, अशा प्रतिपादनात व सादरीकरणात समजावून सांगण्यासाठी केलेला जो वाद असतो, तो खरा वाद होय. आणि तो मीच आहे हे समज.
अक्षरांमध्ये 'अ' हे अक्षर मी आहे. वाङमय व्याकरणातील समासांमध्ये 'द्वंद्व' समास मी आहे. किडा-मुंगी-माशीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना स्वाहा करणारा जो 'काळ' तो मी आहे. मेरू, मंदार आदी पर्वतांसहित संपूर्ण पृथ्वी जो चुरून टाकतो आणि मग सगळेच जलमय झाल्यानंतर ते सगळे जिथल्या तिथे जिरवतो, जो वायूलाही गिळून टाकतो, कल्पांतीचे तेजही सर्वथा ग्रासून टाकतो आणि शेवटी उरलेला सगळा नभ:प्रांत ज्याच्या पोटात सामावतो, तो अपार काळही धनंजया मीच आहे. सृष्टिकर्ता प्रजापती ब्रह्मा ही माझीच विभूती आहे.
मृत्यु: सर्वहरश्चाहमुद्भवश्च
भविष्यताम् ।
कीर्ति: श्रीवाक्च नारीणां स्मृतिर्मेधा
धृति: क्षमा ।।३४।।
सरळ अर्थ : हे अर्जुना, मी सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि पुढे होणाऱ्यांच्या उत्पत्तीचे कारण आहे. तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती (कीर्ती आदी या सात देवांच्या स्त्रिया आणि स्त्रीवाचक नावे असणारे गुणही प्रसिद्धच आहेत, म्हणून दोन्ही प्रकारांनीही भगवंताच्या विभूतीच आहेत) श्री, वाक्, स्मृती, मेधा, धृती व क्षमाही मीच आहे.
विस्तृत विवेचन : हे धनंजया, जी ही सगळी सृष्टी, सगळे जीव-जीवन मी निर्माण केले आहे, त्या सगळ्यांचे धारण मीच करतो. त्या सगळ्यांचे जीवन मीच आहे आणि त्यांचा नाश करणारा मृत्यूही मीच आहे.
आता स्त्रीवर्गात ज्या सात विभूती आहेत, त्या मी तुला अपूर्वाईने सांगतो. कीर्ती जी नित्य नवी आहे, ती माझीच मूर्ती होय. औदार्यासहित जी संपत्ती आहे, ती माझीच विभूती. न्यायरूपी पालखीमधे बसून जी विवेकाचा पंथ अंगिकारते ती 'वाचा'ही माझी विभूती आहे.
पाहिलेल्या वस्तूची निरंतर आठवण करून देणारी जी स्मरणशक्ती आहे ती स्मृती ही माझीच विभूती होय, यात काहीही शंका नाही. या इहलोकी जी स्वहितानुकूल बुद्धी असते, तीही मीच होय. त्रिलोकातील 'धृती' म्हणजे धारणा, म्हणजे मनात धरून ठेवण्याची जी शक्ती आहे तीही मीच. क्षमाही मीच. अशा नारी वर्गातील या सात शक्ती माझ्या विभूती आहेत, हे तू जाण.
बृहत्साम तथा साम्नां गायत्री
छन्दसामहम् ।
मासानां मार्गशीर्षोsहमृतूनां
कुसुमाकर: ।।३५।।
सरळ अर्थ : त्याचप्रमाणे मी गायन करावयाच्या श्रुतींमध्ये बृहत्साम आणि छंदांमध्ये गायत्री छंद, तसेच महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना व ऋतूंमध्ये मी वसंत ऋतू आहे.
(क्रमश:)

मिलिंद कारखानीस
(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल
असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)
मो. ९४२३८८९७६३