एखाद्या वाचनालयात आपल्याला हवे ते पुस्तक मिळेलच याची हमी नसते. मात्र ई-लायब्ररीत एकाच वेळी अनेक जण हवे ते पुस्तक वाचनासाठी निवडू शकतात. राज्यातील ९० ग्रंथालयांना ई लायब्ररीमध्ये रूपांतरित केल्यानंतर त्याचा फायदा गॅझेटप्रेमी नव्या पिढीला नक्कीच होईल.

जगभरात २३ एप्रिल हा ‘पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर गोवा सरकारच्या मंत्रिमंडळाने नव्या ग्रंथालय धोरणाला मंजुरी देऊन एक स्तुत्य पाऊल टाकले आहे. वाचन संस्कृतीला आणखी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हे धोरण आखले असून ते लवकरच जाहीर केले जाईल. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात पुस्तक वाचनाकडे असलेला ओघ कमी होत असताना शासन पातळीवर असा निर्णय होणे हे पुस्तकप्रेमींचा हुरूप वाढवणारे आहे. गोव्यात किंवा भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवर नव्या पिढीला पुस्तकवाचनात फारसा रस दिसत नाही. हातात असणाऱ्या मोबाईलवर जगभरातील खबरबात आणि माहिती मिळत असल्याने पुस्तकांना केवळ अभ्यासक्रमापुरतेच महत्त्व दिले जात असल्याचे चित्र आहे. हे निराशाजनक चित्र दूर सारायचे असेल तर मुलांनाही त्याच मार्गाने वाचनाची गोडी लावायला हवी. त्यासाठी ई-लायब्ररी हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरू शकतो. ई-लर्निंगची वाढती गरज पाहता पुढील पाच वर्षांत भारतीय ई-लायब्ररी बाजारपेठ आणखी वेगाने विस्तारण्याची अपेक्षा या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. ई-लायब्ररींच्या उपलब्धतेमुळे ज्ञान संपादन करण्यातील सुलभता, संवाद आणि संशोधन क्षमता वाढते. तसेच ज्ञान मिळवण्यातील पुस्तक वाचनासारखे भौतिक अडथळे दूर करून कधीही, कुठेही इंटरनेटच्या माध्यमातून वाचनाची भूक शमवता येते. एखाद्या वाचनालयात आपल्याला हवे ते पुस्तक मिळेलच याची हमी नसते. त्यासाठी काही वेळा फेऱ्या माराव्या लागतात. ई-लायब्ररीचे तसे नाही. एकाच वेळी अनेक जण हवे ते पुस्तक वाचनासाठी निवडू शकतात. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी नव्या ग्रंथालय धोरणाअंतर्गत राज्यातील ९० ग्रंथालयांना ई लायब्ररीमध्ये रूपांतरित केले जाणार आहे. त्याचा फायदा गॅझेटप्रेमी नव्या पिढीला नक्कीच होईल.
सध्या राज्यात १९१ ग्रामपंचायतींपैकी ५१ ग्रामपंचायतींकडून वाचनालये चालवली जातात. पणजीत कृष्णदास शामा यांच्या नावाने मध्यवर्ती वाचनालय आहे. सासष्टीतील नावेलीत एक जिल्हा वाचनालय चालविले जाते. पेडणे, डिचोली, वाळपई, फोंडा, कुडचडे, सांगे, काणकोण अशा सात ठिकाणी तालुका वाचनालये आहेत, तर साखळी, कुंकळ्ळी आणि केपे येथे तीन शहरी वाचनालये आहेत. शाळा, सामाजिक-साहित्यिक संस्था आणि अन्य खासगी घटकांमार्फत मिळून दीडशेच्या वर ग्रंथालये राज्यभर चालविली जातात. यापैकी पाटो-पणजी येथील कृष्णदास श्यामा गोवा मध्यवर्ती ग्रंथालय (स्थापना १८३२), म्हापसा येथील नगरपालिकेचे आताईद लोबो नगर वाचनालय (स्थापना १८८३), मळा-पणजी येथील श्री महालक्ष्मी प्रासादिक हिंदू वाचन मंदिर (स्थापना १९०७), मडगावच्या गोमंत विद्या निकेतन संस्थेचे वाचनालय (स्थापना १९१२), पणजीतील श्री सरस्वती मंदिर वाचनालय (स्थापना १९१३), गोमंतक मराठी अकादमीचे पर्वरीतील वाचनालय (स्थापना १९८९), साखळीतील आत्मोद्वार वाचनालय (स्थापना १९२६) अशा काही वाचनालयांनी १०० वर्षांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण केला आहे. ही वाचन परंपरा नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे पुढे घेऊन जाण्यासाठी ई-लायब्ररी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. जगभरातील नवनवे संशोधन ते दुर्मिळ पुरातन ग्रंथ भांडार एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याने नव्या पिढीला वाचनाचा खजिना अधिक सुलभपणे हाताळता येणे शक्य होईल.
मध्यंतरी मुलांच्या हातातील मोबाईल आणि त्यावर सोशल मीडियाचा अतिरेक हा मुद्दा चर्चेत आला. सोशल मीडियाच्या मायाजालात विद्यार्थीदशेतील मुले वाहावत जात असल्यामुळे यावर नियंत्रण आणण्याचे उपाय आवश्यक असल्याचे मत व्यक्त होऊ लागले. गतवर्षाच्या अखेरीस सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांना मोबाईलवर सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातली. त्यानंतर इंडोनेशिया आणि फ्रान्सनेही तशी बंदी घातली. हा आदर्श घेऊन अनेक देश या मार्गाचा अवलंब करणार आहेत. गोव्याच्या माहिती तंत्रज्ञान खात्यानेही या संदर्भात संबंधित घटकांशी विचारविनिमय सुरू केला आहे. सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष हा एक मुद्दा आहेच, त्याचबरोबरीने अवांतर वाचन आणि ज्ञानसंपादनाबाबतची वाढती अनास्था हे कारणही या बंदीमागे आहे. पुस्तकांच्या जगात वावरून वाचनाला झोकून देणारी पिढी ज्ञानसंपन्न, बहुश्रुत होते. ती पिढी घडवायची असेल, तर ज्ञानाची कवाडे आधुनिक मार्गांनी उघडायला हवीत. विद्यार्थीदशेतच वाचनाचे बाळकडू मिळाले, तर पुढचा मार्ग अधिक सुकर होईल. ई लायब्ररीसारखे उपक्रम त्यासाठीच विस्तारावे लागतील.