अशा व्यक्तीला कठोर शिक्षा व्हायला हवी. त्याच्यावर सरकारने त्वरित अनिश्चित काळासाठी गोव्यात येण्यावर प्रवेश बंदी लागू करावी. अशा एकमेकांच्या धर्मांविरोधात विष ओकणाऱ्यांची गोव्याला गरज नाही, हे सरकारने दाखवून द्यावे.

गोव्यात जागोजागी मंदिर, चर्च दिसतील. त्याही पुढे ठिकठिकाणी घुमट्या, खुरीस दिसतात. या गोव्याची ओळखच धर्मनिरपेक्ष राज्य अशी आहे. सर्वधर्मियांना समावून घेऊन, बंधुत्व भावना ठेवून वाटचाल करणारे हे राज्य आहे. इथे एका धर्माच्या सणात दुसऱ्या धर्माचा सन्मान, किंबहुना दुसऱ्या धर्मातील वस्तू आल्यानंतर एका धर्माची जत्रा किंवा फेस्त साजरे होते. प्रत्येकजण आपल्या धर्माचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. सरकारी सुट्ट्या ते सणाच्या काळात लाउडस्पीकर लावण्यापर्यंत सर्व धर्मांच्या सणांसाठी सरकारनेच मुभा दिलेली असते. इथला धार्मिक सलोखा हा आजकालचा नाही. तो इथे गोव्यात सुरुवातीपासूनच आहे. तरीही काही लोक गोव्यात वारंवार धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतात. हे करणारे लोक सगळ्याच धर्मांत आहेत, हे विशेष. कधी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरणे, कधी त्यांच्या पुतळ्यावरून वाद करणे, कधी सेंट झेविअरविषयी विषारी भाषण करणे, तर कधी दोन धर्मांत तणाव निर्माण करण्याचे प्रकार होत असतात. इथल्या जनतेने आणि पोलिसांनी कधीही गोव्यातील शांतता बिघडू दिली नाही. त्यामुळेच गोव्यातील एकोपा टिकून आहे. गोव्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कित्येक प्रयत्न यापूर्वीही झाले, पण ते सगळे असफल झाले. एकमेकांच्या धर्मांचा आदर करणे, हे गोवेकरांच्या रक्तात आहे. काही धर्मांध शक्ती ज्या धर्मांधतेपोटी आणि राजकीय पोळ्या भाजण्यासाठी जाणून बुजून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करतात, त्यांनाही त्यांचा हेतू गोव्यात साध्य होत नाही, याची जाणीव आहे. तरीही जातीय ध्रुवीकरण करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न होत असतो.
वास्कोतील एका कार्यक्रमात एका वक्त्याने अशाच प्रकारचे टाळ्या मिळवण्यासाठीच सेंट झेविअरवर आक्षेपार्ह भाषण केले. विशेष म्हणजे त्यावेळी व्यासपीठावर मंत्री मॉविन गुदिन्हो आणि संकल्प आमोणकर होते. भाषण करण्यासाठी आयोजकांनी या वक्त्याला सेंट झेविअरची बरीच माहिती दिली होती, असा त्याच्या भाषणावरून अंदाज काढता येतो. हिंदीत बोलणारा हा वक्ता वारंवार सेंट झेविअरविषयी अशा पद्धतीने बोलत होता की, त्याला हे बोलण्यासाठी आधीच कुणीतरी शिकवले असावे, हे स्पष्ट दिसत होते. आयोजकांनी आता दिलगिरी व्यक्त केली असली, तरी त्या वक्त्याचे भाषण पाहता त्याला त्या संदर्भात आधीच पूर्ण माहिती पुरवण्यात आली होती, असे स्पष्ट दिसते. सेंट फ्रान्सिस झेविअरला अतिरेकी संबोधणाऱ्या या व्यक्तीवर कडक कारवाई व्हायला हवीच, शिवाय त्याला भविष्यात गोव्यात येण्यास बंदी घालायला हवी. इन्स्टाग्रामवर लाईक्स मिळवण्यासाठी आणि धर्माच्या नावाने विष पेरणाऱ्या अशा लोकांना गोव्यात प्रवेशबंदी हवी. धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणारे श्रीरामसेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्यावर गोव्यात अनेक वर्षे प्रवेश बंदी होती. ही गौतम खट्टर नावाची व्यक्ती तर गोव्यात येऊन ख्रिस्ती मंत्र्यांच्या समोरच सेंट झेविअरवर टीका करते. या घटनेमुळे गोव्यात दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते, तणाव उद्भवू शकतो याची कल्पना असतानाही या व्यक्तीने राज्यात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याने गोव्याची शांतता बिघडवण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. तो इथल्या नागरिकांनी हाणून पाडला असला तरी अशा लोकांची गोव्याच्या जनतेला गरज आहे का, त्याचा विचार व्हायला हवा. अशा द्वेष पेरणाऱ्या धर्मांधतेला खतपाणी घालणाऱ्या वक्त्याची गोव्याला गरज नाही, हे गोव्यातील जनतेने दाखवून दिले. त्यांच्या भाषणानंतर राज्यभर संताप व्यक्त होत आहे. राजकीय पक्षांकडून असो किंवा सामाजिक स्तरावर त्या व्यक्तीचा निषेध होत आहे. त्यावरून गोव्यातील जनतेला अशा ढोंगी आणि मूर्ख लोकांची गरज नाही, हे अधोरेखित होते. या घटनेनंतर सरकारने त्या वक्त्यावर कारवाई करण्याचे जाहीर केले आहे. त्याच्यावर गुन्हाही नोंद झाला आहे. त्याच्यावर चालवण्यात येणारा खटला गांभीर्याने घेतला जावा. अशा व्यक्तीला कठोर शिक्षा व्हायला हवी. त्याच्यावर सरकारने त्वरित अनिश्चित काळासाठी गोव्यात येण्यावर प्रवेश बंदी लागू करावी. अशा एकमेकांच्या धर्मांविरोधात विष ओकणाऱ्यांची गोव्याला गरज नाही, हे सरकारने दाखवून द्यावे. यापुढे गोव्यातील संस्थांनीही अशा मूर्ख लोकांना आमंत्रित करू नये.