इटली-इस्रायल यांच्यातील संरक्षण करार रद्द

Story: विश्वरंग |
17th April, 10:23 pm
इटली-इस्रायल यांच्यातील संरक्षण करार रद्द

मध्य पूर्वेतील वाढता संघर्ष आणि लेबनॉनमधील बिघडलेली सुरक्षा लक्षात घेता इटलीने इस्रायलबाबत कठोर भूमिका घेतली आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी इस्रायलसोबतचा द्विपक्षीय संरक्षण करार पुढे न नेण्याचा निर्णय जाहीर केला असून, या कराराचे होणारे 'ऑटो रिन्यूअल' तत्काळ स्थगित केले आहे. इटलीच्या या निर्णयामुळे संरक्षण क्षेत्रातील जागतिक समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पंतप्रधान मेलोनी म्हणाल्या, लेबनॉन आणि सभोवतालच्या प्रदेशातील सध्याची युद्धजन्य परिस्थिती पाहता, इस्रायलसोबतचा संरक्षण करार आपोआप नूतनीकरण न करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. इटलीने घेतलेला हा निर्णय इस्रायलसाठी राजनैतिक आणि लष्करी धक्का मानला जात आहे. इटली आणि इस्रायल यांच्यातील या करारामुळे दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून लष्करी उपकरणांची देवाणघेवाण, प्रगत तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील संशोधनामध्ये जवळचे सहकार्य होते. मात्र, 'ऑटो रिन्यूअल' स्थगित झाल्यामुळे आता हा करार आपोआप पुढे सुरू राहणार नाही. यामुळे भविष्यात दोन्ही देशांमधील लष्करी आणि तांत्रिक सहकार्यावर मोठ्या मर्यादा येणार आहेत.

इटलीच्या या निर्णयामागे गेल्या आठवड्यात लेबनॉनमध्ये घडलेली एक घटना कारणीभूत ठरली आहे. लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेवर तैनात असलेल्या इटालियन शांतता सैनिकांच्या ताफ्यावर इस्रायली सैन्याने गोळीबार केला होता. या हल्ल्यात इटलीच्या लष्करी वाहनांचे नुकसान झाले होते. आपल्या सैनिकांवर झालेल्या या हल्ल्यामुळे इटलीमध्ये संतापाची लाट असून, सरकारने यापूर्वीच इस्रायली दूतावासाला पाचारण करून कडक शब्दांत आपला निषेध नोंदवला होता.

इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांनी नुकताच लेबनॉनचा तातडीचा दौरा करून बेरुतमध्ये त्यांनी लेबनॉनचे राष्ट्रपती जोसेफ आउन आणि परराष्ट्र मंत्री युसूफ रग्गी यांची भेट घेतली. ताजानी यांनी स्पष्ट केले की, निष्पाप नागरिकांवर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. मी लेबनॉनच्या जनतेशी एकता व्यक्त करण्यासाठी येथे आलो आहे. गाझा पट्टीप्रमाणे लेबनॉनमध्ये हिंसाचार पसरू नये, ही इटलीची ठाम भूमिका आहे, असे त्यांनी नमूद केले. इटलीने तत्काळ आणि कायमस्वरूपी संघर्षविरामाची मागणी केली असून, तणाव कमी करण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न करण्याची तयारी दर्शवली आहे. इटलीने इस्रायलच्या विरोधात घेतलेली ही भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, लेबनॉन आणि इस्रायलमध्ये संवाद प्रस्थापित करण्यासाठी इटलीने हे एक प्रकारचे 'दबावतंत्र' वापरले आहे. आता इटलीच्या या भूमिकेमुळे इस्रायलच्या संरक्षण पुरवठा साखळीवर आणि तांत्रिक संशोधनावर नेमका काय परिणाम होतो, याकडे जागतिक समुदायाचे लक्ष लागले आहे.

- सुदेश दळवी