
राज्यातील १२६ विधानसभा मतदारसंघांत ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली. निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर केला जाणार आहे. कोणाचे सरकार येणार याची उत्सुकता लागली आहे. भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. २०१६ मध्ये भाजपने प्रथमच सरकार स्थापन केले होते. २०२१ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने विजयी घोडदौड कायम ठेवली होती. यंदा भाजपने मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली प्रचार मोहीम राबवली. त्यांना शह देण्यासाठी काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते.
भाजपने आसाम गण परिषद आणि बोडो लँड पीपल्स फ्रंट या पक्षांशी युती केली. काँग्रेस ‘आसाम संमिलित मोर्चा’ या ८ पक्षांच्या युतीसोबत रिंगणात आहे. गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सत्ताविरोधी लाटेचा फायदा घेऊन परिवर्तनाचा नारा दिला. २०२१ मध्ये काँग्रेस आघाडीकडे प्रमुख नेत्याचा चेहरा नव्हता. यावेळी काँग्रेसने गौरव गोगोई यांच्या रूपाने आक्रमक चेहरा दिला आहे. लोकसभेत उपनेते आणि तीन वेळा खासदार राहिलेल्या गौरव गोगोई यांनी प्रथमच विधानसभा निवडणूक लढवली. ‘एआययुडीएफ’ आणि ‘युपीपीएल’ हे पक्ष स्वबळावर मैदानात उतरले आहेत. ‘एआययुडीएफ’ची बंगाली वंशाच्या मुस्लीमबहुल भागात ताकद आहे. प्रमोद बोरो यांच्या नेतृत्वाखालील ‘युपीपीएल’चे बोडो लँड भागात वर्चस्व आहे.
मुख्यमंत्री सरमा यांच्या नेतृत्वाखालील भाजपने घुसखोरी आणि स्थलांतरितांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला. भाजपच्या सत्तेला ‘कुशासन’ म्हणत काँग्रेसने परिवर्तनाचा नारा दिला. भाजप सत्तेत आल्यापासून भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा काँग्रेसने केला. काँग्रेस सत्तेत आल्यास प्रभावी योजना राबवण्याचे आश्वासनही दिले. आसामी समुदायांचे प्राबल्य असलेल्या ‘अप्पर आसाम’वर सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केले होते. २०२१ मध्ये सीएएच्या विरोधात तीव्र संताप असूनही भाजपने ३४ पैकी २८ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने ‘राईजोर दल’ आणि ‘आसाम जातीय परिषद’ यांच्याशी युती करून अप्पर आसाममधील पाया मजबूत केला. १५ जागा असलेल्या बोडो लँड प्रादेशिक क्षेत्रात भाजप आणि मित्रपक्षांचे पारडे जड दिसत आहे.
लोअर आसाम आणि बराक व्हॅलीमध्ये बंगाली वंशाच्या मुस्लीम मतदारांनी २०२१ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला पाठिंबा दिला होता. यंदा मुस्लीम मतदारांमधील एका गटाने भाजपप्रणित रालोआला छुपा पाठिंबा दिला आहे. बराक व्हॅली भाजपचा गड मानला जातो. भाजपने अप्पर आसाममधील गड राखला आणि बोडो लँडमध्ये मित्रपक्षांची चांगली कामगिरी झाली, तर पुन्हा भाजपचीच सत्ता निश्चित आहे. काँग्रेस आघाडीने या समीकरणांना सुरुंग लावला का, हे ४ मे रोजीच स्पष्ट होणार आहे.
- प्रदीप जोशी