गोवा केवळ पर्यटनासाठी ओळखला जाऊ नये. शिक्षण, संशोधन, समुद्रशास्त्र, पर्यावरणशास्त्र, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक अभ्यास यांचे केंद्र म्हणूनही गोव्याची ओळख निर्माण व्हायला हवी अशी अपेक्षा डॉ. माशेलकर यांच्या सत्कार सोहळ्यात व्यक्त झाली.

राष्ट्रीय स्तरावर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार प्राप्त झालेले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक सन्मानप्राप्त ज्येष्ठ संशोधक तथा शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या पणजीतील सत्कार सोहळ्यात मांडले गेलेले मुद्दे केवळ भाषणापुरते मर्यादित नसून गोव्याच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरू शकतात. विशेषतः गरिबांसाठी संशोधन आणि ज्ञानकेंद्र म्हणून गोव्याची उभारणी आणि २०३७ पर्यंत विकसित गोव्याचे स्वप्न हे अत्यंत महत्त्वाचे विषय ठरले. पणजीत झालेल्या यांच्या सत्कार सोहळ्याने केवळ एका शास्त्रज्ञाचा गौरव केला नाही, तर गोव्याच्या बौद्धिक परंपरेला, मराठी-कोकणी संस्कारांना आणि विज्ञाननिष्ठ भारताच्या स्वप्नाला उजाळा दिला. अशा कार्यक्रमांकडे फक्त सन्मान सोहळा म्हणून पाहणे चुकीचे ठरेल; ते समाजाला दिशा देणारे कार्यक्रम असतात. डॉ. माशेलकर हे गोव्याच्या मातीतून उगवलेले जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक आहेत. साध्या परिस्थितीतून जगप्रसिद्ध संशोधक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. पणजीत त्यांचा सत्कार म्हणजे गोव्याने आपल्या प्रतिभावंत पुत्राला दिलेला मान ठरतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आधुनिक विज्ञान, भारतीय संस्कार आणि मातृभूमीप्रेम यांचे अद्वितीय मिश्रण दिसते. विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळा नाही, तर समाजबदलाचे साधन आहे हा संदेश त्यांच्या जीवनातून मिळतो. आज अनेक तरुण परदेशी नोकरी, सोपी कमाई किंवा तात्कालिक यशाच्या मागे धावताना दिसतात. अशा वेळी डॉ. माशेलकर यांचा संघर्षमय प्रवास सांगतो की ज्ञान, परिश्रम आणि सातत्य यांच्याशिवाय मोठेपण मिळत नाही. अशा सोहळ्यात त्यांनी नवकल्पना, शिक्षण, संशोधन, स्टार्टअप संस्कृती, जागतिक स्पर्धा आणि भारतीय बुद्धिमत्तेची ताकद यावर भर दिला. ते आजच्या काळाचे अचूक निदान आहे. भारताला फक्त ग्राहक राष्ट्र न राहता संशोधनप्रधान राष्ट्र व्हावे लागेल, असेच त्यांनी सूचित केले. गोवा केवळ पर्यटनासाठी ओळखला जाऊ नये. शिक्षण, संशोधन, समुद्रशास्त्र, पर्यावरणशास्त्र, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक अभ्यास यांचे केंद्र म्हणूनही गोव्याची ओळख निर्माण व्हायला हवी. माशेलकरांसारख्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव म्हणजे त्यांच्या या विचारांचा स्वीकार करणे. अंजली माशेलकर ट्रस्टने काही रोगांचे निदान करण्यासाठी कमी खर्चातील स्ट्रीप तयार केली, हा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. विज्ञान जर फक्त मोठ्या कंपन्यांच्या नफ्यासाठी वापरले गेले, तर त्याचा समाजाला मर्यादित फायदा होतो. पण गरिबांना परवडेल, गावागावांत पोहोचेल आणि वेळेवर निदान करेल असे संशोधन म्हणजेच खरे लोकाभिमुख विज्ञान आहे. आरोग्यसेवा महाग होत असताना अशा नवकल्पना समाजासाठी वरदान आहेत आणि राज्य सरकार यात पुढाकार घेणार आहे, ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही स्वागतार्ह आहे.
सत्कार सोहळ्यापूर्वी दोन परिसंवादांत व्यक्त झालेल्या विचारांचीही दखल घ्यावी लागेल. शिक्षण आणि उद्योग यांची सांगड घालण्यासाठी काय करता येईल, यावर तज्ज्ञांनी मांडलेले विचार मौलिक स्वरुपाचे होते. एका वक्त्याने केवळ विचार मांडून, चर्चा करून उपयोग नाही, त्याची अंमलबजावणीही व्हायला हवी, हे मत सर्वांना पटणारे आहे. रोजगारक्षम आणि कुशल युवक नोकरीसाठी मिळत नाहीत, म्हणून त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यावर विशेषतः उद्योगांतर्गत प्रशिक्षण देण्यावर वक्त्यांनी भर दिला. अर्थात जे निष्कर्ष काढले जातात त्यावर कार्यवाही व्हावी, यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. माशेलकर समितीने यापूर्वी सुचविलेल्या मुद्द्यांवर झालेली कार्यवाही आणि उचलेली पावले, याबद्दलची माहिती सरकारने दिली असती, तर ते संयुक्तित ठरले असते. गोमंतकीय असल्याने माशेलकरांना गोव्याबद्दल ममत्व आहे, निसर्गावर प्रेम आहे, संस्कृतीचा अभिमान आहे, हे त्यांच्या बोलण्यातून क्षणोक्षणी जाणवत होते. अशा संवेदनशील व्यक्तींच्या नावाचा केवळ जयघोष पुरेसा नाही, त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून आपले मार्गक्रमण सुरू आहे का, यावर संबंधितांनी चिंतन करावे. शिक्षण क्षेत्रात खाजगी विद्यापीठ आणण्याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असू शकतील. शिक्षणाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी उच्च शिक्षणाचा दर्जा जसा उंचावणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे प्राथमिक स्तरावर शिक्षणाचा दर्जा घसरल्याने सरकारी शाळा बंद पडल्याचा मुद्दाही महत्त्वाचाच आहे. याचाही उल्लेख परिसंवादात झाला. समाज सेलिब्रिटींचा गौरव सहज करतो; पण संशोधक, शिक्षक, वैज्ञानिक यांना तितकाच मान दिला, तर देशाची मानसिकता बदलू शकते. पणजीतील सत्कार सोहळा एक साधा समारंभ नव्हता; तो गोव्याच्या आत्मभानाचा, विज्ञाननिष्ठ विचारांचा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा सांस्कृतिक क्षण होता. पर्यटनाच्या झगमगाटात हरवणाऱ्या गोव्याने जर अशा बुद्धिवंतांना केंद्रस्थानी ठेवले, तर भविष्यातील गोवा अधिक समृद्ध, सजग आणि सक्षम बनेल.