गोवा पोलिसांनी सजग व्हावे

दिल्ली पोलिसांनी दाखवलेले धाडस आणि केलेली शिताफीची कारवाई, ही अनुकरणीय आहे. त्याच धर्तीवर गोवा पोलिसांनीही गुन्हे रोखण्यासाठी अधिक सक्रिय आणि सजग होण्याची गरज आहे. त्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती, स्थानिक गुप्तचर यंत्रणा बळकट करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे.

Story: संपादकीय |
4 hours ago
गोवा पोलिसांनी सजग व्हावे

दोनापावला आणि म्हापशात दरोडे घालून देशाबाहेर पळालेल्या बांगलादेशी दरोडेखोरांना दिल्लीत अटक करण्यात दिल्ली क्राईम ब्रँचला यश आले. गोव्यात दोन मोठे दरोडे घालून दोन्ही वेळा गोवा पोलिसांना गुंगारा देऊन देशाबाहेर पसार झालेल्या या दरोडेखोरांनी दिल्ली पोलिसांवर गोळीबारही केला. दिल्ली पोलिसांच्या तावडीतून निसटले असते, तर ते पुन्हा पसार झाले असते. गोव्यात फक्त दरोडेच घालून पैसे, दागिन्यांची लूट केली होती. इतर ठिकाणी दरोड्यावेळी लोकांची हत्याही केल्याचे आरोप या दरोडेखोरांवर आहेत. पिस्तूल आणि इतर हत्यारे घेऊनच भारतात अनेक राज्यांत दरोडे घालत सुटलेल्या या टोळीला जेरबंद करणाऱ्या दिल्ली पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद आहे.

गोवा, कर्नाटक, ओडिशा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये या टोळीने अनेकांच्या घरांवर दरोडे घालून रोख रक्कम आणि कोट्यवधी रुपयांचे दागिने लुटलेले आहेत. या सर्व राज्यांमध्ये त्यांच्यावर कित्येक गुन्हे नोंद आहेत. कर्नाटकातील एका दरोड्यावेळी त्यांनी एका महिलेची हत्याही केली. दरोडे घालणे, लुटणे आणि बांगलादेशात पसार होऊन तिथे लपून बसणे, अशा प्रकारे हे दरोडेखोर पोलिसांना गुंगारा देत असत. गोव्यात दोन मोठ्या दरोड्यांत त्यांचा हात होता. दोनापावला येथे एका मोठ्या उद्योजकाच्या कुटुंबीयांच्या बंगल्यावर दरोडा घालून एक किलो सोने आणि ३ लाख रुपयांची रोकड घेऊन ते थेट बांगलादेशात पसार झाले होते. त्यानंतर म्हापशातील गणेशपुरी येथे एका डॉक्टरच्या घरी दरोडा घालून ३५ लाखांचा ऐवज लंपास केला होता. यापैकी काहींवर फोंड्यातही एक गुन्हा दाखल आहे. गोवा पोलिसांनी दिल्ली पोलिसांना दिलेल्या माहितीची मदत झाल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. अर्थात, गोव्यातील दरोड्यांतील संशयितांना पकडणे हे गोवा पोलिसांसाठी आव्हान ठरले होते. एका घटनेनंतर काही महिन्यांनी दुसरा दरोडा घालून ते पुन्हा पसार झाले होते. यातील अनेकांना यापूर्वीही अनेकदा वेगवेगळ्या राज्यांत अटक झाली होती. काहींनी अनेक वर्षे तुरुंगात काढलेली आहेत. त्यानंतर कित्येक गुन्ह्यांमध्ये हे दरोडेखोर वेगवेगळ्या राज्यांतील पोलिसांना हवे होते. दिल्ली पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली आहे. चोरीला गेलेला ऐवज त्यांच्याकडून हस्तगत करणे, हेही एक आव्हान असेल. कारण प्रत्येकवेळी दरोड्यानंतर ते बांगलादेशात पसार व्हायचे. त्यांनी दरोड्यात लुटलेला ऐवज सापडणे कठीण होईल. मात्र, या सर्व संशयितांवर खटले चालवून ते पुन्हा सुटणार नाहीत, याची दक्षता घेण्याची जबाबदारी पोलिसांची असेल. आधी एटीएम लुटणारी ही टोळी नंतर घरफोडी करू लागली. त्यात वेगवेगळ्या राज्यांत अनेक घरांवर दरोडे घालून लोकांना मारहाण करणे, खून करणे अशा गोष्टीही त्यांनी केल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर खटले चालवताना त्यांना कठोर शिक्षा होईल, यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागतील. सध्या ज्यांना अटक झाली आहे, त्यापैकी काहीजणांनी यापूर्वीही तुरुंगवास भोगलेला आहे. सहाजण पोलिसांच्या जाळ्यात अडकले, पण दोघे घटनास्थळावरून पसार झाले आहेत. ही फक्त सात-आठ लोकांची टोळी असण्याची शक्यता नाही. अजूनही त्यांचे साथीदार असतील. या टोळीचे पूर्ण नेटवर्क मोडीत काढण्याची गरज आहे.

एका बाजूने गोव्यातील मोठ्या दरोड्यातील संशयितांना अटक झाली आहे, तर दुसऱ्या बाजूने गोव्यात चोऱ्या सुरूच आहेत. या दरोडेखोरांना दिल्लीत अटक झाली, त्याचवेळी कदंबा पठारावरील एका घरात मोठी चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. डिचोली पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. त्यामुळे गोव्यात चोऱ्या थांबलेल्या नाहीत. त्या रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. गोवा पोलिसांना चोऱ्या रोखण्यात अपेक्षित यश मिळालेले नाही. काही प्रकरणांत तत्पर कारवाई करून आरोपींना काही तासांत अटक करण्यात आली, तर अनेक प्रकरणांत गुन्हेगार अजूनही फरार आहेत. दिल्ली पोलिसांच्या तावडीत सापडलेले आरोपी गोवा पोलिसांच्या हाती यापूर्वी लागले नव्हते, ही वस्तुस्थिती दुर्लक्षित करता येणार नाही. दिल्ली पोलिसांनी दाखवलेले धाडस आणि केलेली शिताफीची कारवाई, ही अनुकरणीय आहे. त्याच धर्तीवर गोवा पोलिसांनीही गुन्हे रोखण्यासाठी अधिक सक्रिय आणि सजग होण्याची गरज आहे. त्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती, स्थानिक गुप्तचर यंत्रणा बळकट करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे. सायबर फसवणूक, बनावट कॉल सेंटर, अंमली पदार्थांचा व्यापार आणि घरफोड्या अशा विविध गुन्ह्यांत गुंतलेल्या टोळ्या गोव्यात बिनधास्तपणे वावरत असल्याचे चित्र आहे. गुन्हेगारांच्या मनात गोवा पोलिसांचा धाक उरलेला नाही, ही गंभीर बाब आहे. हे चित्र बदलण्यासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे.