श्रीमद्भगवगीतेमध्ये दहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या अनंत विभूतींचे दर्शन घडवतात. चराचर सृष्टीतील सर्वश्रेष्ठ प्रतीके, मग ते शस्त्र, प्राणी असो वा निसर्ग, हे सर्व ईश्वरी रूपाचेच अविष्कार आहेत.

गेल्या लेखात आपण श्रीमद्भगवगीतेतील १० व्या अध्यायातील २४ व्या आणि २५ व्या श्लोकांचा सरळ अर्थ बघितला होता. आता आपण त्या श्लोकांचे विस्तृत विवेचन पाहू.
श्रीकृष्ण पार्थाला म्हणत आहेत...
अर्जुना, स्वर्गाच्या सिंहासनाला व राजाला ज्याचे मूळ सहाय्य आहे आणि जो सगळ्या ज्ञानाचे मूलस्थान आहे आणि जो पुरोहितांमध्ये बृहस्पती आहे, तो मीच आहे!
ईशांचा ईश जो भगवान शंकर त्याच्या वीर्याने अग्नीबरोबर कृत्तिकेपासून ज्याचा जन्म झाला तो त्रिलोकींच्या सेनानींमधील प्रमुख सेनानी सुविख्यात कार्तिकेय स्वामीही मीच आहे. जलाशयांमध्ये सगळ्यांत मोठा जो समुद्र आहे, तोही मीच आहे. महर्षींमध्ये थोर तपस्वी जो ऋषीश्वर भृगू, तो मी आहे. जो या इहलोकी कर्मादिक साधनांवाचूनही निष्पन्न होतो म्हणजे सिद्ध होतो आणि प्रणव स्वरूपाने ज्याचा त्यास अंतरातच प्रत्ययास येतो, सर्व वाणींमध्ये सत्याचा उत्कर्ष ज्यांत नित्य निर्विशेष नांदतो, तो एकाक्षर निर्मळ ओंकार मी आहे. सर्व यज्ञांमध्ये श्रेष्ठ जो का सोsहंजप यज्ञ तो मीच आहे. स्थावरांमध्ये सर्व पर्वतांपैकी पुण्यराशी जो हिमालय पर्वत म्हटला जातो, तोही मीच आहे!
अश्वत्थ: सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारद: ।
गंधर्वाणां चित्ररथ: सिद्धानां कपिलो मुनि: ।।२६।।
उच्चै:श्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ।
ऐरावतं गजेंद्राणां नराणां च नराधिपम् ।।२७।।
सरळ अर्थ : सर्व वृक्षांमध्ये पिंपळाचा वृक्ष आणि देवर्षींमध्ये नारदमुनी तसेच गंधर्वांमध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिल मुनी मी आहे.
घोड्यांमध्ये अमृतापासून उत्पन्न झालेला उच्चै:श्रवा नांवाचा घोडा आणि हत्तींमध्ये ऐरावत नावाचा हत्ती तसेच मनुष्यांमधील राजा तो मीच होय.
विस्तृत विवेचन : पार्था, गुणांच्या योगाने कल्पद्रुम, पारिजात व चंदन ही झाडे विख्यात खरी. पण सर्व वृक्षांमध्ये जो पिंपळ आहे, तोच मी आहे. सर्व गंधर्वांमध्ये मी चित्ररथ आहे. देवर्षींमध्ये मी नारद आहे. सर्व सिद्धांमध्ये मुनिवर्य जो कपिलमुनि तो कपिलाचार्य मीच आहे. कपिलाचार्य हे सांख्यशास्त्र प्रवर्तक महामुनी. कर्दमऋषी व देवहुती यांचा पुत्र. विष्णूचा अवतार. कपिलांचा जन्म सिद्धपूरला झाला. तेथे बिंदुसरोवरावर त्यांचा आश्रम आजही दाखवला जातो. त्यांनी सगराच्या साठ हजार पुत्रांना क्रोधाग्नीने जाळून भस्म केले. आपल्या मातेस त्यांनी आत्मज्ञानाचा उपदेश केला.
हे पार्था, सर्व अश्वांमध्ये उच्चै:श्रवा अश्व- क्षीरसमुद्रातून निघालेला इंद्राचा घोडा. चौदा रत्नांपैकी एक - तोही मीच. तसेच सगळ्या हत्तींमध्ये क्षीरसागरमंथनातून निघालेला दैवी हत्ती जो ऐरावत तोही मीच आहे. त्याचप्रमाणे प्रजा होऊन सर्व लोक ज्याची सेवा करतात तो नरांमध्ये विभूतिविशेष असलेला जो राजा तो म्हणजे मीच असे तू समज.
आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कंदर्प: सर्पाणामस्मि वासुकि: ।।२८।।
अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पित्रूणामर्यमाचास्मि यम: संयमतामहम् ।।२९।।
सरळ अर्थ : मी शस्त्रांमध्ये वज्र आणि गायींमध्ये कामधेनू आहे. शास्त्रोक्तरीतीने प्रजोत्पत्तीचा हेतू म्हणजे कारण जो कामदेव तो मी आहे. सर्पांमध्ये सर्पराज वासुकी मी आहे. तसेच नागांमध्ये शेषनाग आणि जलदेवतांचा अधिपती वरुणदेव मी आहे. पितरांमध्ये अर्यमा नांवाचा पित्रेश्वर मी आहे व शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी आहे.
विस्तृत विवेचन : पुढे विष्वक्सेन म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला की आयुधांमध्ये इंद्राच्या हाती शोभणारे वज्र मी आहे. धेनूंमध्ये कामधेनू मी आहे. जे जन्मविते आहेत त्यांच्यामध्ये रती-पती जो मदन तो माझीच विभूती आहे. सर्पकुळामध्ये सर्वश्रेष्ठ असा वासुकी मी आहे व नागांमध्ये वरिष्ठ असा शेषनाग अनंत मी आहे. जळ-देवतांमध्ये पश्चिमेचा स्वामी जो वरुण तो मी आहे आणि पितृगणांमध्ये अर्यमा नामक जी पितृदेवता आहे, ती माझी विभूती आहे. यमलोकामध्ये जीवांच्या मनांचा हिशेब घेऊन त्यांची शुभाशुभ कर्मे लिहून ठेवणारे, त्या जीवांना त्या त्या कर्मांप्रमाणे फळ देणारे व त्या त्या कर्मांचे सुख-दु:ख-भोग भोगवणारे जे आहेत, त्यांच्यामध्ये कर्मसाक्षी म्हणजे जो यम-धर्म तोही मीच आहे.
प्रल्हादश्चास्मि दैत्यानां काल: कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेंद्रोsहं वैनतेयश्च पक्षिणाम् ।।३०।।
अर्थ : दैत्य-कुळात म्हणजे राक्षसांमध्ये दैत्य-भावाने कधीही लिप्त न होणारा जो प्रल्हाद तो मी होय. या संपूर्ण विश्वाला सदासर्वदा ग्रासणारा जो महाकाळ आहे, तोही मीच. हिंस्त्र पशूंमध्ये मी वनराज सिंह आहे. व पक्ष्यांमध्ये मला पाठीवर वाहणारा जो गरुड तो मीच आहे.
पवन: पवतामस्मि राम: शस्त्रभृतामहम् ।
झषाणां मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मि जाह्नवी ।।३१।।
सरळ अर्थ : मी पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू, शस्त्रधाऱ्यांमध्ये राम, जलचरांमध्ये मगरमत्स्य आणि नद्यांमध्ये श्रीभागीरथी गंगा आहे.
विस्तृत विवेचन : हे अर्जुना, पृथ्वीच्या विस्तारात सगळ्यात वेगवान असा जो पवन, तो मी आहे. शस्त्रधाऱ्यांमध्ये ज्यानं धर्माचा कैवार घेऊन सुवेल पर्वतावर उभा ठाकून धनुष्य-बाण हाती घेऊन महाप्रतापी लंकाधीश रावणाचा शिरच्छेद करून देवांचा लौकिक पुनरपी प्रस्थापित केला, तो सद्गुणांचा सागर असलेला अयोध्यापती प्रभू रामचंद्र मी आहे. जलचरांमध्ये पुच्छ असलेला मगरमत्स्य मी आहे. जलौघांमध्ये जिला भगीरथ राजाने स्वर्गातून पृथ्वीवर आणली, जिला जह्नूने गिळली व भगीरथाच्या प्रार्थनेने मांडीतून पुन्हा सोडली, ती त्रैलोक्यात प्रख्यात असलेली गंगा मी आहे. या व अशा आणखीही अनेक माझ्या विभूती आहेत. (क्रमशः)

- मिलिंद कारखानीस, (लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.) मो. ९४२३८८९७६३