प्रशासनाबरोबर भाविकांचीही कसोटी

Story: अंतरंग- उत्तर गोवा |
12th April, 11:21 pm
प्रशासनाबरोबर भाविकांचीही कसोटी

गोव्यासह कोकण प्रांत जत्रा, कालोत्सव आणि नाटकांच्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. मकर संक्रांत झाली की ठिकठिकाणी जत्रा आणि कालोत्सवांना सुरुवात होते. सध्या सर्वत्र जत्रा, काले आणि नाटके सुरू आहेत. अनेक मंदिरामध्ये स्थापनादिनानिमित्त किंवा इतर दिवशी धार्मिक विधींसह रात्री नाटके होतात. ज्या गावात एकाहून अधिक मंदिरे आहेत, तिथे एकाहून अधिक जत्रा भरतात. जत्रेमध्ये खाद्यपदार्थ, खेळण्यांची दुकाने व हॉटेल्स उभारली जातात. जत्रांचा विचार केला तर जांबावलीचा गुलालोत्सव, फातर्पा शांतादुर्गेची जत्रा व शिरगाव येथील लईराई देवीची जत्रा यांची व्याप्ती मोठी आहे. या जत्रांमध्ये बरीच गर्दी होते. शेजारच्या राज्यांतूनही भाविक येतात. 

यंदा शिरगाव येथील लईराई देवीची जत्रा २१ एप्रिल रोजी होणार आहे. दरवर्षी या जत्रे​विषयी कमालीचे औत्सुक्य असते. धगधगत्या होमकुंडातून धोंडांचे चालणे, हा थरार असतो. राज्यभरातील हजारोंच्या संख्येने धोंड एकत्र जमतात. इतर जत्रांपेक्षा धोंडांची मोठी संख्या हे सुद्धा शिरगावच्या जत्रेचे एक वैशिष्ट्य आहे.

दुर्दैवाने गेल्या वर्षी जत्रेत चेंगराचेंगरी होऊन सहा भाविकांचा मृत्यू झाला. याशिवाय बरेच भाविक जखमी झाले होते. या दुःखद घटनेला यंदा एक वर्ष पूर्ण होत आहे. यंदाचा जत्रोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, अशी प्रार्थना भाविक करीत आहेत. या जत्रेला नेहमीच गर्दी प्रचंड होते. गर्दीच्या तुलनेत जागा कमी पडते तसेच दुकानांमुळे रहदारीलाही अडचणी निर्माण होतात. 

यंदा कोणताही अनर्थ घडू नये, यासाठी सरकार आणि प्रशासनाने पहिल्यापासूनच उपाययोजना आखल्या आहेत. वाहन पार्किंग, होमकुंड, धोंडांची ये-जा आणि भाविकांची रहदारी याविषयीचा आराखडा तयार केला आहे. रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. दुकानांच्या संख्येवरही मर्यादा आणली आहे. दरवर्षी मंदिराची व्यवस्थापन समिती दुकानांना मान्यता द्यायची. यंदा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली खास समिती स्थापन करण्यात आली आहे. सुरक्षा उपाय व आराखडा विचारात घेऊन ही समिती दुकानांना मान्यता देणार आहे. तसेच ज्या रस्त्यावरून धोंड होमकुंडाकडे जातात, त्या रस्त्यावर एकही दुकान असणार नाही. तसेच गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग तसेच एकंदर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचीही व्यवस्था असणार आहे.

मानवाने मागील चुकांपासून धडा घेणे आवश्यक आहे. यंदाच्या जत्रेसाठी सरकार तसेच प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना केल्या असल्या तरी, कोणत्याही सार्वजनिक उत्सवात शिस्त ही महत्त्वाची असते. शिरगाव जत्रेत भाविकांनी शिस्त पाळली तर निश्चितपणे हा उत्सव यशस्वी होईल. यंदाची जत्रा सुरक्षितपणे पार पाडणे, ही केवळ प्रशासनाचीच नव्हे तर भाविकांचीही मोठी कसोटी आहे.

- गणेश जावडेकर