
जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढत असताना, चीन आता मानवरहित युद्धप्रणालीच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. चीन अशा रोबोटिक कुत्र्यांची निर्मिती करत आहे, जे लांडग्यांच्या कळपाप्रमाणे एकत्र मिळून शत्रूवर तुटून पडतील. हे रोबोट केवळ स्वयंचलित नाहीत, तर ते ड्रोनच्या सहाय्याने अतिशय गुंतागुंतीच्या लष्करी मोहिमा पूर्ण करण्यास सक्षम असल्याचा खळबळजनक खुलासा एका अहवालात करण्यात आला आहे.
चीनच्या सीसीटीव्हीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका कार्यक्रमात या ‘रोबोटिक वुल्फ’ची क्षमता जगासमोर मांडली आहे. हे रोबोट पूर्वीच्या मॉडेल्सपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. पूर्वी हे रोबोट केवळ एका सैनिकाला मदत करण्यासाठी वापरले जात होते, परंतु आता हे रोबोट एक स्वतंत्र ‘लष्करी यंत्रणा’ म्हणून विकसित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या रोबोट्समध्ये एक सामायिक नेटवर्क आहे, ज्याला शास्त्रज्ञ ‘कॉमन ब्रेन’ (सामायिक मेंदू) असे संबोधत आहेत. याद्वारे हे रोबोट एकमेकांशी माहिती शेअर करतात आणि युद्धाच्या मैदानात सामूहिक निर्णय घेतात.
चीनने या रोबोट्सचे त्यांच्या कामाच्या स्वरूपावरून विविध प्रकारांत वर्गीकरण केले आहे. ‘शॅडो’ हा रोबोट प्रामुख्याने शत्रूच्या हालचालींवर पाळत ठेवणे आणि गुप्त माहिती गोळा करण्याचे काम करतो. ‘ब्लडी’ हा ताफ्यातील सर्वात घातक भाग असून, तो थेट हल्ल्यासाठी डिझाइन केला आहे. हा रोबोट मायक्रो मिसाईल्स, ग्रेनेड लाँचर्स आणि ऑटोमॅटिक रायफल्सनी सज्ज असतो. ‘पोलर’ हा रोबोट युद्धाच्या ठिकाणी रसद पुरवणे, दारुगोळा पोहोचवणे आणि सपोर्ट सिस्टीम म्हणून कार्य करतो. हे रोबोट ताशी १५ किमी वेगाने धावू शकतात आणि २५ किलोपर्यंत वजन उचलून दुर्गम भागातही सहज हालचाल करू शकतात.
केवळ जमिनीवरच नाही, तर हवेतही चीनने आपली ताकद वाढवली आहे. चीनने ‘एटलस’ नावाची एक अत्याधुनिक ड्रोन प्रणाली विकसित केली आहे. ही यंत्रणा एकाच वेळी ९६ ड्रोनवर नियंत्रण ठेवू शकते. एआय तंत्रज्ञानामुळे हे ड्रोन स्वतः निर्णय घेण्यास सक्षम असून शत्रूची संचार व्यवस्था ठप्प करण्यात निष्णात आहेत.
चीनने समुद्रातही ‘एल-३०’सारखी मानवरहित जहाजे तैनात केली आहेत, जी स्वतःचा मार्ग स्वतः ठरवतात आणि शत्रूच्या जहाजांना वेढा घालू शकतात. तसेच, शत्रूचे ड्रोन नष्ट करण्यासाठी चीनने ‘गुआंगजियान ११-ई’ आणि ‘गुआंगजियान २१-ए’ ही लेझर शस्त्रे विकसित केली आहेत, जी काही सेकंदात शत्रूचे हवाई हल्ले मोडून काढू शकतात. भविष्यात मानवी हस्तक्षेप पूर्णपणे शून्य करून संपूर्ण युद्ध यंत्रणा स्वयंचलित करण्याचे चीनचे लक्ष्य आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, हा ‘वुल्फ पॅक’ पॅटर्न भविष्यातील युद्धाचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकणारा ठरेल.
- सुदेश दळवी