
राज्यात विधानसभेच्या २३४ जागा असून त्यासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत एम. के. स्टॅलिन यांचा सत्ताधारी द्रमुक, मुख्य विरोधी पक्ष अण्णाद्रमुक आणि प्रसिद्ध अभिनेता विजय यांच्या तमिलगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्ष यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे. बहुमतासाठी ११८ जागांची आवश्यकता असल्याने या निवडणुकीत कोणी बाजी मारली हे ४ मे रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
जयललितांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षाची ताकत काहीशी कमी झाली आहे. मागील विधानसभेत ४ सदस्य असलेल्या भाजपला यावेळी सदस्यांची संख्या वाढवायची आहे. भाजपने अण्णा द्रमुक (एआयएडीएमके) पक्षाशी युती केली आहे. युतीतून पक्षासाठी मिळालेल्या २७ जागांवर पक्षाने उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अण्णामलाई यांना उमेदवारी नाकारल्याच्या दाव्याचे पक्षातील नेत्यांनी खंडन केले आहे. अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) जागावाटपावर त्यांचा निर्णय अवलंबून होता. कोईम्बतूरमध्ये भाजपला आणखी एक जागा मिळाली असती तर अण्णामलाई निवडणूक रिंगणात उतरले असते. अण्णाद्रमुक प्रमुख पलानीस्वामी यांनी जागावाटपावर नियंत्रण ठेवले होते. भाजपने त्यांच्याकडे सिंगानल्लूर, सुलूर आणि गौंडनपालयम या जागांची मागणी केली होती; परंतु पलानीस्वामी यांनी त्याला नकार दिला. मर्यादित जागावाटपामुळेच अण्णालाई यांनी स्वतः रिंगणात न उतरता पक्षाचा प्रचार करण्याचा निर्णय घेतल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
२०२१ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने २० जागा लढवल्या होत्या, पैकी चारच जागांवर विजय मिळाला होता. यावेळी भाजपच्या वाट्याला २७ जागा आल्या आहेत. जागांची संख्या वाढली असली तरीही अपेक्षेप्रमाणे मतदारसंघ मिळालेले नाहीत. भाजपने जागावाटपात आक्रमक पवित्रा घेतला नाही. कारण भाजपसाठी २०२९ ची लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. राज्यात प्रबळ मित्रपक्षाशिवाय विजय मिळवणे कठीण आहे, त्यामुळे अण्णा द्रमुकचे नेते नाराज होणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे. अण्णामलाई यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर केली. ते म्हणतात, विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय वैयक्तिक नसून संघटनात्मक आहे. रालोआच्या विजयासाठी मी प्रचार करेन.
ओपिनियन पोलमधून राज्यात चुरशीच्या लढतीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २३४ पैकी १०७ ते १२० जागा रालोआला मिळण्याची शक्यता आहे. सत्ताधारी डीएमकेच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ला १०२ ते ११५, तर टीव्हीके पक्षाला ५ ते १२ व इतरांना १ ते ६ जागा मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपची कामगिरी कशी होते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
- प्रदीप जोशी