सायबर ठगांचा विळखा आणि पोलिसांची सुस्ती !

सायबर गंडा असो किंवा दरोडे असो, सायबर विभाग असो किंवा क्राईम विभाग असो पोलिसांची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही, हे मान्य करावे लागेल.

Story: विचारचक्र |
22nd May, 12:16 am
सायबर ठगांचा विळखा आणि पोलिसांची सुस्ती !

सायबर भामट्यांनी गोमंतकीय जनतेची फसवणूक करू नये म्हणून गोवा सायबर पोलिसांनी आतापर्यंत कोणतीही जनजागृती मोहीम हाती घेतलेली नाही. त्यामुळे गोव्यातील सधन लोक सायबर ठगांना मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. गेल्या अवघ्या ५ महिन्यांत ६ हजारांहून अधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गोवा पोलिसांनी काही सटरफटर लोकांना अटक केलेली असली, तरी या सायबर गुन्हेगारांकडून एक पैसाही जप्त करणे पोलिसांना शक्य झालेले नाही.

२०२५ मध्ये गोव्यात मोठ्या प्रमाणात भोळ्याभाबड्या लोकांची  सायबर ठगांनी फसवणूक केली होती. ‘तुम्हाला विदेशातून किमती भेटवस्तू आली असून त्यावर अमूक रक्कम अबकारी कर भरावा ‌लागेल,’ असे सांगितले जाते. ‘५० हजार अबकारी कर भरावा लागतोय म्हणजे ५ लाखांची तरी भेटवस्तू असणार,’ असा हिशेब करून ‘बेसावध सावज’ अशा भामट्यांना बळी पडते. एकदा पैसे भरले की मग सुटका नाही. हे पैसे भरा, ते पैसे भरा म्हणून पुरे बँक खाते रिते केले जाते. पर्वरीतील माझा एक जवळचा मित्र अशा पद्धतीने तब्बल २७ लाख रुपये गमावून बसला आणि त्या धक्क्याने त्याला आपला जीव गमवावा लागला.

सुमारे १० वर्षांपूर्वी असाच मला एक फोन आला. माझी विमा पॉलिसी  पूर्ण झाली असून पैसे परत मिळण्यासाठी बँक खाते क्रमांक व इतर तपशील द्या, अशी विनंती करण्यात आली. फोन आला तेव्हा मी कार्यालयात होतो व पॉलिसीचा तपशील माझ्याकडे उपलब्ध नव्हता. त्यानंतर मी माझ्या विमा एजंटला फोन करून माझी पॉलिसी पूर्ण झाली असून विमा कंपनीकडून फोन आला होता, असे सांगितले.  त्यावेळी तो फोन विमा कंपनीचा नसून एखाद्या भामट्याने केला  असणार, असे विमा एजंटने सांगितले. ही गोष्ट खरीच निघाली. माझे नशीब बलवत्तर म्हणून मी बचावलो होतो. अन्यथा मीही सायबर  ठगांना बळी पडलो असतो.

गोवा सायबर विभाग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या  ५ महिन्यात आलेल्या तक्रारीत गेल्या वर्षाच्या तुलनेत ६० टक्के वाढ झाली आहे. पोलिसांकडे आलेल्या विविध तक्रारींनुसार विविध प्रकारे लोकांना सुमारे १०० कोटींना ठकविले आहे. प्रत्यक्षात ही रक्कम दुप्पट असून तक्रार करताना आकडा कमी दाखविण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ‌पैसे गेल्याची तक्रार नोंद केल्यास आयकर खात्याचे अधिकारी हात धुवून मागे लागण्याची भीती असल्याने तक्रारीत कमी रक्कम दाखविण्यात येते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’ नावाचा नवा प्रकार चालू केला आहे. एखाद्या सधन व्यक्तीची संपूर्ण माहिती गोळा करून ‘सावज’ निश्चित केले जाते. एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्यातील व्यवहाराचा‌ तपशील ती व्यक्ती आणि बँक यांच्याशिवाय तिसऱ्या व्यक्तीला माहीत असणे शक्यच नाही. मग ही अत्यंत गोपनीय माहिती सायबर भामट्यांपर्यंत कशी पोहचते?

बँक खात्यात जमा होणारी किंवा काढली जाणारी रक्कम फार मोठी असल्यास त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक आहे. त्यामुळे कोणाची इच्छा असो किंवा नसो आमच्या बँक खात्यातील मोठ्या व्यवहारांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दरदिवशी मिळत असते, हे बहुतेक लोकांना माहितीच नसते.

माझ्या विम्याची मुदत पूर्ण झाली असून मला अमूक रक्कम परत मिळणार, ही माहिती मुंबई, दिल्ली किंवा कोणी सांगावे, गोव्यातीलच एखाद्या कॉल सेंटरमध्ये बसलेल्या सायबर भामट्यांना कशी मिळाली, हे एक कोडे आहे. ‘सायबर सावज’ निश्चित करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातील सर्व व्यवहारांची माहिती मिळविली जाते, हे कसे शक्य आहे? बँकेचा एखादा कर्मचारी त्यांना सामील असल्याशिवाय हे शक्य नाही.

सायबर फंदा प्रकरणी पोलिसांनी अनेक भामट्यांना अटक केली आहे. मात्र पोलिसांच्या हाती एक दमडीही लागलेली नाही. सायबर  गुन्ह्यामध्ये सर्व पैसा बँक खात्यामध्ये वळविला जातो. एका खात्यामधील रक्कम दुसऱ्या बँक खात्यात वळवून रोख स्वरुपात पैसे काढले जातात. मात्र हे पैसे कोणी काढले, हे समजणे शक्य आहे. पैसे मिळाले नाहीत तरी खातेदाराला अटक करणे शक्य आहे. कारण जगभरातील कोणत्याही बँकेत बनावट नावाने खाते उघडणे शक्य नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची टोपी घालणाऱ्या या कथित सायबर गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

सायबर गुन्हेगार मोकाट सुटले तर आपली अर्थव्यवस्थाच साफ कोलमडून पडेल. आयुष्यभर काबाडकष्ट करून जमवलेल्या कोट्यवधी रुपयांवर एखादा भामटा जर डल्ला मारून ऐषआराम करत असेल, तर कायदा सुव्यवस्थेची ती थट्टाच ठरेल. ‘डिजिटल अरेस्ट’ किंवा इतर सायबर गुन्ह्यात पैसे बँक खात्यात जमा केले जातात. ते पैसे दुसऱ्या खात्यात वळवून विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे मूळ गुन्हेगारापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. या समस्येवर मात करण्यासाठी सर्व सायबर गुन्ह्यात ज्या खात्यात पैसे वळविले जातात त्या खातेदाराला मुख्य गुन्हेगार मानण्याची गरज आहे.

गेल्या वर्षी पर्वरी येथील गोवा राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण संस्थेत सुमारे ४ कोटींचा गोंधळ झाला. पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीने शिक्षण संस्थेचे बनावट चेक तयार करून सुमारे ४ कोटी काढले. ते चेक बनावट होते हे बँक अधिकाऱ्यांना कळलेच नाही, एवढे ते हुबेहूब होते. सह्या बनावट होत्या, पण बँक अधिकारी फसले. पोलीस तक्रार झाली तेव्हा बँकेने आपली चूक मान्य करून भरपाई दिली. शिक्षण संस्थेला भरपाई मिळाल्याने त्यांना या प्रकरणात काही रस राहिलेला नाही. बनावट चेक तयार करून बँकेला ४ कोटींना लुबाडणारे संशयित आरोपी बंगालचे आहेत. या प्रकरणाचे पुढे काय झाले, हे कोणालाच माहीत नाही. ज्या खात्यात हे चेक जमा झाले, त्या खातेदारानेच हा घोटाळा केला, ही गोष्ट स्पष्ट आहे. त्यामुळे बँकेने या प्रकरणाचा  पाठपुरावा करून आपले पैसे वसूल केले पाहिजेत.

गोव्यात बांगलादेशी सराईत दरोडेखोरांनी दोन दरोडे घालून कोट्यवधी रुपयांचे सुवर्णालंकार लुटले. दरोडेखोर बांगलादेशी होते हे सिद्ध होताच गोवा पोलिसांनी काही बांगलादेशी नागरिकांना पकडून आणले आणि दरोडेखोरांनाच पकडल्याचा आभास निर्माण केला. गेल्या महिन्यात दिल्ली पोलिसांनी दिल्लीत काही सराईत दरोडेखोरांना अटक केली. दोनापावला व म्हापसा येथील दरोडे या लोकांनी घातले होते, असे सांगण्यात येत आहे. गोवा पोलीसही दिखावा करतात, हे आता स्पष्ट झाले आहे. या दोन्ही दरोड्यातील मुद्देमाल मिळवणे शक्य झालेला नाही.

सायबर गंडा असो किंवा दरोडे असो, सायबर विभाग असो किंवा क्राईम विभाग असो पोलिसांची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही, हे मान्य करावे लागेल.

- गुरुदास सावळ

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)