यांचे ‘मीपण’ अपरिपक्व फळापरी

'मीपण ज्यांचे पक्‍व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो' या बा. भ. बोरकर यांच्या ओळींप्रमाणे अहंकार सहज गळून पडल्याशिवाय जीवनाचे सौंदर्य कळत नाही, हे उमजले असते तर आरजीपीवर ही वेळ आली नसती.

Story: संपादकीय |
22nd May, 12:20 am
यांचे ‘मीपण’ अपरिपक्व फळापरी

रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षात वाद सुरू होऊन गेल्या आठ दिवसांत जे मतभेद, वाद उफाळून आले, त्यावर 'गोवन वार्ता'ने याच जागी आधी १३ मेच्या अंकात 'पोरांनी केलेले वाराच नेणार!' आणि या पक्षातील वाद टोकाला गेल्यानंतर १९ मेच्या अंकात 'उंटावरचे शहाणे' मथळ्याखाली विचार मांडले. हा पक्ष टिकावा असे अनेक गोमंतकीयांना वाटते. आता सध्याच्या घडीला पछाडलेल्या तरुणाईने 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या बॅनरखाली व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी जी क्रांती चालवली आहे, तीच क्रांती काही वर्षांपूर्वी रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाने गोव्याच्या राजकारणात करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पहिल्या प्रयत्नात जास्त आमदार मिळाले नाहीत. फक्त एक आमदार पदरी आला, पण त्यांनी जी मतांची टक्केवारी मिळवली ती मगो, आप आणि गोवा फॉरवर्ड या तीन पक्षांपेक्षा जास्त होती. अनेक मतदारसंघांत क्रमांक दोन आणि तीनवर या पक्षाचे उमेदवार राहिले. त्यामुळे आरजीपीला राजकीय भवितव्य आहे, असे सर्वांनाच दिसू लागले. भाजप, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगो आणि आम आदमी पार्टी यांनी मात्र आरजीपी ही 'पोरांची पार्टी' आहे असे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ज्यांनी गांभीर्याने आरजीपीकडे पाहिले, त्यांना मदत केली ते सगळे आज निराश झाले आहेत. ज्यांनी हा 'पोरांचा पक्ष' आहे असे म्हटले होते, ते आरजीपीतील नेत्यांच्या भांडणाची, रडण्याची, गटबाजीची मजा पाहत आहेत. एका पक्षाची काही वर्षांतच अशा पद्धतीने शकले पडतील, असे कोणालाच वाटले नव्हते. दुर्दैवाने या पक्षाचा अंतिम प्रवास सुरू झाल्याचीच चिन्हे आहेत. आरजीपीचे अध्यक्ष आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आरजीपी उभी राहिली, ते मनोज परब यांनी राजकीय संन्यास जाहीर केला. आरजीपीचे अध्यक्षपद आणि सदस्यपदही त्यांनी सोडले. हा आरजीपीच्या शेकडो कार्यकर्त्यांसाठी धक्का होता. अनपेक्षितपणे मनोज परब यांनी हा निर्णय जाहीर केला. आता पुढे हा पक्ष काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. गोव्यातील बहुतेक प्रश्नांवर आवाज उठवणारे आणि राजकारणात छक्के पंजे जाणून असलेल्यांना टाळून तरुणाईला एकत्र घेऊन राजकारणाचा नवा अध्याय लिहायचा प्रयत्न करणारे मनोज परब आता राजकारणातूनच निवृत्त झाले आहेत. हे आरजीपीच्या अनेक सदस्यांसाठी धक्कादायक असेल. गोव्यातील राजकारणासाठीही धक्कादायक असेल, पण त्यांचा हा निर्णय अत्यंत अपरिपक्व आणि बालिश आहे. 

एवढी मोठी चळवळ उभी करून त्याला राजकीय पक्षात रूपांतर करून परब यांनी अंतर्गत राजकारणाला गेले काही दिवस सोशल मीडियावर लक्ष्य केले. आपण सर्व प्रश्नांची उत्तरे देणार असे सांगितले आणि अचानक आपण हे राजकारणच सोडत आहोत, अशी घोषणा केली. हे एखाद्या गावातील एखाद्या वाड्यावरील तरुणांच्या एखाद्या क्लबमध्ये झालेल्या भांडणासारखेच आहे. म्हणजे क्लबमधील दोघा-तिघांनी आरोप केले म्हणून रागाने अध्यक्षाने क्लबच सोडून द्यायचा, असा हा प्रकार झाला. राजकारणात इतकी अपरिपक्वता चालत नाही. सगळी वादळे पचवून उभे राहणारे लोक राजकारणात टिकतात. मनोज परब यांनी ही परिपक्वता दाखवणे गरजेचे होते. गेले काही दिवस मनोज परब आणि वीरेश बोरकर यांच्या गटात एकमेकांवर आरोप करण्याचे सत्र सुरू होते, त्याचा अंत हा परब यांच्या राजकीय निवृत्तीने झाला आहे, असे म्हणावे लागेल. वीरेश बोरकर आमदार म्हणून पुढेही निवडून येतील. दोघांच्या गटांतील लोकही राजकारणात असतील, पण फक्त या साऱ्या वादातून काहीही निष्पन्न न होता आरजीपीचे जे नुकसान झाले आहे, ते मनोज परब यांच्या जाण्याने झाले असेल हे पुढे दिसेलही. गोव्यातील तरुणांमध्ये राजकीय आशावाद निर्माण करणारी आरजीपी तूर्तास संपलेली नाही, पण या पक्षाचा पाया रोवणारे परब यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. गोव्याचे अनेक प्रश्न या पक्षाने घेतले. अनेकांनी त्यांना जाहीरपणे आणि पडद्यामागूनही पाठिंबा दिला, पण शेवटी एक चांगला राजकीय पक्ष बनल्यानंतरही या पक्षातील पोरकट वादामुळे एका तळमळीने काम करणाऱ्या युवा नेत्याला पक्ष मुकला आहे.

म्हाताऱ्यांच्या राजकारणाला कंटाळलेल्या तरुणांना मनोज परब आणि वीरेश बोरकर या तरुणांनी राजकारणाकडे आकर्षित केले. सरतेशेवटी परिपक्वता नसल्यामुळे या दोन्ही तरुण नेत्यांमध्ये वाद निर्माण झाले. काहीवेळा न बोलता शांत राहून काही निर्णय घ्यायचे असतात. आरजीपीत ही सामंजस्याची भूमिका कोणीच घेतली नाही. जो तो जीभ टाळ्याला लावत सुटला. कोणाचेच काही ऐकण्याच्या मनस्थितीत आरजीपीचे तरुण नेते नव्हते, त्याचे परिणाम मनोज परब यांच्या राजकीय संन्यासात दिसले. 'मीपण ज्यांचे पक्‍व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो' या बा. भ. बोरकर यांच्या ओळींप्रमाणे अहंकार सहज गळून पडल्याशिवाय जीवनाचे सौंदर्य कळत नाही, हे उमजले असते तर आरजीपीवर ही वेळ आली नसती.