इंधन बचतीचे स्टंट

प्रवासी ईव्ही बसेस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धावू लागल्या तर प्रदूषण टळेल आणि इंधनाचीही बचत होईल. अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देऊन काही फरक पडण्याची शक्यता नाही. त्यासाठी सरकारने धोरणात बदल करून इंधनाचा वापर कमी करायला हवा.

Story: संपादकीय |
19th May, 09:17 pm
इंधन बचतीचे स्टंट

हैदराबादमधील भाषणावेळी पेट्रोल, डिझेलची बचत करण्यासाठी आणि विदेशी चलन वाचविण्यासाठी सोने खरेदी टाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. वर्षभर सोने खरेदी करू नका, असे आवाहन त्यांनी जनतेला केले; पण त्यानंतर लोकांनी चांदीच्या चपलाही करून घेतल्याच्या बातम्या तुफान सुरू आहेत. ‘मोदींचा आदेश सर आँखों पर!’ म्हणणाऱ्या नेत्यांनी लगेच आदेश काढून मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांनी तेल बचतीसाठी उपाय करावेत असे निर्देश दिले. लोकांनी हे करावे, ते करावे असे आदेश काढले जातात, पण ते आदेश पाळले जातात का त्याकडे कोणाचे लक्ष नाही. मोदींनी आवाहन केल्यानंतर तसा आदेश काढून आपण किती आपल्या साहेबांशी एकनिष्ठ आहोत, ते दाखवून देण्याचा प्रयत्न भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये सुरू झाला. केंद्रातील मंत्री आणि भाजपच्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी काटकसर करण्याचे आदेश जारी केले. हे सगळे सुरू असताना मोदींनी विदेश दौरा आखला. म्हणजे हैदराबादमधील भाषणात विदेश दौरा टाळा, असे सांगून मोदी लगेच पाच देशांच्या दौऱ्यावर गेले. ते युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा करून परतणार आहेत. देशातील जनतेला पेट्रोल कमी वापरा, सोने खरेदी करू नका, असे सांगून लगेच ते विदेशात गेल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली. विरोधकांना प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या आयटी सेलने राहुल गांधींचे दौरे उकरून काढले. त्यावर जनताही तुटून पडली. राहुल गांधींचे दौरे दाखवण्याचा तो प्रयत्न भाजपवर उलटला. मोदींचे भाषण आणि विदेश दौरा यांची वेळ चुकल्यामुळे मोठे लोकही क्रोनोलॉजी चुकवू शकतात, यावर अनेकांचा विश्वास बसला.

मोदींनी केलेल्या आवाहनानंतर मंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील वाहने कमी केल्याचे दाखवले. बऱ्याच लोकांनी सुरक्षा रक्षकांची वाहने कमी केली, असे व्हिडीओ वगैरे काढून ते सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली. काहींनी आपल्यापुढे काही वाहने कार्यक्रमाच्या ठिकाणी पाठवायची आणि आपल्यामागे काही वाहने तिथे बोलवायची, असे सत्र आरंभून दुप्पट इंधनही वापरण्यास सुरुवात केली. शिवाय ते फिरत असलेल्या वाहनांच्या मागे-पुढे कॅमेरामनसाठी वेगळी वाहने द्यायची, अशी काटकसरीची कसरत सध्या नेत्यांची सुरू आहे. अनेकांनी या कसरतीमुळे पूर्वीपेक्षा जास्त उधळपट्टी चालवली आहे. ज्या भागात विमानाची सेवा नाही, तिथे रेल्वेने जाऊन आपण पंतप्रधानांच्या आवाहनाचा सन्मान केल्याचे सांगत आहेत. त्यामुळे मोदींच्या आवाहनाचे प्रसिद्धीच्या स्टंटमध्ये रूपांतर करणाऱ्या नेत्यांमुळे देशाची कुठली बचत होत आहे, ते स्पष्ट दिसत आहे. दागिन्यांच्या दुकानातील गर्दी ओसरलेली नाही, पण देशात दागिन्यांची खरेदी काही टक्क्यांनी घटली आहे. त्याच धामधुमीत कोणीतरी आपल्या मोठ्या मुलासाठी चांदीची चप्पल केल्याची बातमीही झळकते. देश संकटाच्या उंबरठ्यावर असताना मोदींच्या आवाहनाचे सोहळे करून नेते चंगळ करत आहेत, हे दुर्दैव आहे. 

काही नेत्यांना आताच कळू लागले की सुरक्षा रक्षक आणि वाहनांचा ताफा पुढे-मागे नसेल तर आपल्या जीवाला काही धोका नाही. मोदींच्या भाषणाचा फायदाच एका अर्थाने होत आहे. नेत्यांनी वाहनांचा ताफा कमी केला म्हणजे हे लोक देशाची आणि राज्याची तिजोरी इतके दिवस जाणीवपूर्वक लुटत होते, असेच म्हणावे लागेल. आपण वाहने कमी केली म्हणून आपल्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी टॅक्सी शेअर करायची, कदंब व एसटी यांसारख्या बसेसनी प्रवास करावा, असे आदेशही काढले गेले. गोव्यातही असे आदेश जारी केले आहेत, पण त्याचा परिणाम मात्र दिसून येत नाही. पर्वरीतील सचिवालय, पणजीतील सरकारी कार्यालये, बांबोळी आणि इतर सरकारी इस्पितळांच्या ठिकाणचे कर्मचारी पूर्वीपासूनच शेअरिंग पद्धतीच्या वाहनाने प्रवास करतात, त्यामुळे असे कर्मचारी पूर्वीपासूनच काटकसर करत आहेत. कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यासोबत सरकारने खरे म्हणजे, कदंबसारख्या महामंडळाला किंवा राज्यातील प्रवासी बस मालकांना ईव्ही बसेस खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. आजही गोव्यातील अंतर्गत भागात डिझेलवरील कदंब बसेस जातात. गोव्यातील अंतर्गत भागात ईव्ही बसेसचा वापर केला, तर मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होईल. प्रवासी ईव्ही बसेस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धावू लागल्या तर प्रदूषण टळेल आणि इंधनाचीही बचत होईल. अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देऊन काही फरक पडण्याची शक्यता नाही. त्यासाठी सरकारने धोरणात बदल करून इंधनाचा वापर कमी करायला हवा.