
रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षात सध्या उघडपणे भगदाड पडलेले दिसत आहे. गोव्यात राजकीय क्रांती घडवून आणण्यासाठी उदयास आलेला हा पक्ष ही सामाजिक आणि राजकीय क्रांती घडवून आणण्यापूर्वीच मावळण्याच्या वाटेवर आला आहे.
जीवाभावाचे मित्र असलेले आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब व सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने दोघांचे समर्थक असलेल्या आरजी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उभी फूट पडली आहे. या फुटीतून दोन्ही गटांतील शीतयुद्धाच्या आरोपांच्या फेर्या सोशल मीडियावर सुरू आहेत. दोन्ही गटांतील नेत्यांनी परब व बोरकर यांच्यासह काही पदाधिकार्यांवर वैयक्तिक पातळीवर टीका केली आहे. आरजी पक्षावर हक्क दाखवण्यापर्यंत हा वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे आगामी काळात सोशल मीडियावरील हा वाद उघडपणे बाहेर पडण्याची शक्यता आहे.
मगो, काँग्रेस आणि भाजप या गोव्यातील प्रमुख राजकीय पक्षांसमोर आव्हान उभे करणारा आणि निज गोमंतकीयांच्या मनात घर निर्माण करणारा हा आरजी पक्ष २०२२ साली गोव्याच्या राजकारणात उतरला होता. तत्पूर्वी २०१७ मध्ये एक गोमंतकीयांच्या हक्कासाठी झगडणारी संस्था म्हणून गोव्यात आरजी पक्षाचा उगम मनोज परब, वीरेश बोरकर व इतरांनी केला होता. भाजप, काँग्रेस व मगो पक्षाच्या भ्रष्ट कारभार विरोधात आणि गोव्यातील प्रश्नांना वाचा फोडून गोव्याचे हित आणि गोव्याबाहेरील धनवंतांकडून पैशांच्या बळावर बळकावल्या जाणार्या जमिनीचे संरक्षण, अशा मुद्द्यांवरून गोमंतकीयांना राजकीय क्रांतीची आशा ‘आरजी’ने दाखवली होती. २०२२ च्या निवडणुकीत गोवा विधानसभेत आपले प्रतिनिधित्व सिद्ध करण्याची किमया या नवोदित पक्षाने आमदार वीरेश बोरकर यांच्या रूपात केली होती. २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तारूढ होण्यापासून दूर ठेवण्यास आरजी पक्षाने प्रमुख भूमिका बजावली होती, असे काँग्रेसबरोबरच राजकीय समीक्षकांचे मत आहे. ‘आरजी’मुळेच भाजप सत्तास्थानी आल्याचे दुःख काँग्रेसला अजूनही आहे.
गोव्याच्या कानाकोपऱ्यात आरजी पक्ष पोहोचला होता. हा भाजप आणि काँग्रेसाठी धोका होता. आरजीपी आता फुटीच्या राजकारणातून जात असल्यामुळे गोव्यातील इतर राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरलेले आहे. कारण आरजी हाच या पक्षांसाठी धोका होता. यापूर्वी गोव्यातील राजकीय पक्षांमध्ये अशी फूट पडलेली नव्हती. मगो व काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या विधिमंडळ गटात पूर्वी फूट पडली होती आणि नंतर या आमदारांच्या गटाने दुसर्या पक्षात प्रवेश केला होता. परंतु आरजीपीमध्ये जाहिररित्या मनोज परब आणि वीरेश बोरकर यांचे दोन गट पक्षाचे चिन्ह मिळवण्यासाठी एकमेकांसमोर उभे राहिल्यास गोव्याच्या इतिहासात एखाद्या राजकीय पक्षात उभे भगदाड पडणारा हा पहिलाच पक्ष ठरेल. निज गोमंतकीयांना राजकीय क्रांतीची स्वप्ने दाखवणारा हा पक्ष या क्रांतीच्या पुस्तकाची पाने उघडतो की बंद करतो, हे येणारा काळच ठरवेल.
- उमेश झर्मेकर