आमदार वीरेश बोरकरांना पक्षाची ‘कारणे दाखवा’ नोटीस

वीरेशबाबत आज निर्णय : आरजी पक्ष आगामी विधानसभा निवडणूक लढवणार


17th May, 11:50 pm
आमदार वीरेश बोरकरांना पक्षाची ‘कारणे दाखवा’ नोटीस

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पक्षविरोधी कारवायांप्रकरणी आमदार वीरेश बोरकर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्यानंतर आरजी पक्षाने सोमवारी सायंकाळी त्यांच्यासोबत बैठक आयोजित केली आहे. पक्षाचे प्रमुख मनोज परब आणि इतर पदाधिकारी आमदार बोरकर यांच्याकडून स्पष्टीकरण घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. मात्र, वीरेश बैठकीला उपस्थित राहणार का, याबाबत त्यांच्या बाजूने माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे बैठकीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी आमदार वीरेश बोरकर यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे दोघांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. काही दिवसांपासून मनोज आणि वीरेश यांच्या समर्थकांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शनिवारी वीरेश समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन मडगाव येथे पक्षासंदर्भात बैठक झाल्याची माहिती दिली. रविवारी मनोज परब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक झाली. बैठकीला आमदार बोरकर अनुपस्थित होते. बैठकीतील निर्णयांची माहिती मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पक्षाचे खजिनदार अजय खोलकर, सरचिटणीस विश्वेश नाईक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल ज्युलियस आल्मेदा यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. त्यांनी केलेल्या पक्षविरोधी कारवायांची माहिती आमदार वीरेश बोरकर यांनाही दिली होती. तरीही वीरेश बोरकर यांनी आल्मेदा यांच्यासोबत वावरणे सुरूच ठेवले. आरजीच्या केंद्रीय समितीच्या बैठकीलाही बोरकर उपस्थित राहिले नाहीत. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना ते पाठिंबा देत राहिले. त्यामुळे पक्षाने बोरकर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी आणि पुढील निर्णयासाठी सोमवारी बैठक होणार आहे.
पत्रकार परिषदेत मनोज बोरकर म्हणाले...
आरजी पक्षात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही जण न्यायालयात जाऊन पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य देसाई याबाबत कायदेशीर सल्ला देत आहेत. पक्ष ताब्यात घेण्यासाठी मडगावमध्ये काही जणांनी बैठक घेतली. मात्र, आरजी पक्ष बरखास्त होणार नाही. पक्षाचे अस्तित्व कायम राहील आणि आगामी निवडणूक पूर्ण तयारीने लढवली जाईल.
माझ्यासह अनेकांनी मेहनत घेऊन आरजी पक्ष स्थापन केला. पक्ष वीरेश बोरकर यांच्या ताब्यात देण्याची माझी तयारी होती. कोणतेही पद न घेता पक्षासाठी काम करण्याची माझी तयारी होती. मी त्यांना व्हॉट्सअॅपवर संदेशही पाठवला होता. मात्र त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही आणि मडगावमध्ये बैठक घेतली. त्या बैठकीची माहिती मिळाल्यानंतरच कारवाईची प्रक्रिया सुरू झाली.
काही जण हिंदू-ख्रिश्चन या मुद्द्यावरून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जण न्यायालयात जाऊन पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी आदित्य देसाई कायदेशीर सल्ला देत आहेत. आदित्य देसाई इतरांच्या नावाने फेसबुक पेज चालवत आहेत. काही जण निधीच्या मुद्द्यावरून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षविरोधी कारवाया करणारे किंवा भाडोत्री लोक यांच्या हातात आम्ही पक्षाचा ताबा देणार नाही. तसेच अशा कारवाया करणाऱ्यांवर पुढेही कारवाई केली जाईल.
ज्युलियस आल्मेदा यांनी माझ्या आणि वीरेश बोरकर यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आम्ही एकत्र नाही, असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांना दूर करण्यासाठी मी वीरेशला विनंती केली. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना आम्ही अनेकदा समजून घेतले; मात्र मी मुत्सद्दी नाही. चुकीच्या गोष्टी सहन करणे माझ्या स्वभावात नाही. त्यामुळे सहा ते सात जणांवर पक्षविरोधी कारवायांप्रकरणी कारवाई करावी लागली. जे कोणी पक्षविरोधी काम करतील, त्यांच्यावर पुढेही कारवाई केली जाईल.
आमदार म्हणून वीरेश बोरकर यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांची कामगिरी विजय सरदेसाई यांच्या तोडीस तोड व्हावी, असा सल्ला मी त्यांना दिला होता. अधिवेशनाच्या काळात इतर कार्यक्रमांमध्ये न गुंतता फक्त विधानसभा कामकाजावर लक्ष केंद्रित करावे, असे मी सांगितले होते. विजय सरदेसाई प्रत्येक विषयाचा अभ्यास करून बोलतात. त्याप्रमाणे अभ्यास करण्याचा सल्लाही मी त्यांना दिला होता.