आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रसार माध्यमांशी संवाद साधण्यास मनाई

नियम मोडल्यास करणार शिस्तभंगाची कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th May, 10:16 pm
आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रसार माध्यमांशी संवाद साधण्यास मनाई

पणजी : आरोग्य खात्याने आपल्या प्रशासनिक कक्षेत येणाऱ्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पूर्वपरवानगीशिवाय माध्यमांशी संवाद साधण्यास मनाई केली आहे. यासंदर्भात खात्याने नुकतेच एक परिपत्रक जारी केले असून, केवळ ठराविक अधिकाऱ्यांनाच पत्रकार परिषद, निवेदने आणि मुलाखती देण्याचे अधिकार दिले आहेत.

नियमभंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई

या नव्या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जाईल, याची खात्री सर्व खातेप्रमुखांना करावी लागणार आहे. या सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर सीसीएस (सीसीए) नियम, १९६५ अंतर्गत विभागीय चौकशी सुरू करून तत्काळ शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अनधिकृत माहिती देण्यावर आक्षेप

काही आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी शासनाच्या मंजुरीशिवाय किंवा पूर्वसूचनेशिवाय लेख प्रसिद्ध करत आहेत आणि पत्रकार परिषदा घेत आहेत. अशी अनधिकृत माहिती देणे आणि विधाने करणे हे केंद्रीय नागरी सेवा (आचार) नियम, १९६४ च्या ‘नियम ९’ च्या तरतुदींचे थेट उल्लंघन आहे.

अधिकृत प्रवक्त्यांनाच परवानगी

खात्याने केवळ गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन, वैद्यकीय अधीक्षक आणि एसएसबी नोडल अधिकारी, खात्याचे संचालक आणि एनसीडीसीपी मुख्य आरोग्य अधिकारी तसेच दोन्ही जिल्हा इस्पितळांचे वैद्यकीय अधीक्षक यांनाच माध्यमांशी संवाद साधण्याचे अधिकार दिले आहेत. या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर कुणीही योग्य पूर्वपरवानगीशिवाय माध्यमांशी बोलू नये, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

डॉ. फर्नांडिस यांचे विधान

सोशल मीडियावर या परिपत्रकाचा आणि डॉ. केतन भाटीकर यांची शवचिकित्सा करणाऱ्या डॉक्टरांच्या समितीच्या प्रतिक्रियेचा थेट संबंध जोडला जात आहे. सरकारने शवचिकित्सेसाठी डॉ. आंद्रे फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पथकाची स्थापना केली होती. सरकारी पत्रकानुसार मला तुम्हाला काही सांगता येत नाही, माझे ओठ बंद झालेले आहेत, असे विधान शवचिकित्सा पूर्ण झाल्यावर डॉ. आंद्रे फर्नांडिस यांनी केले.

सोशल मीडियावर चर्चा

डॉ. फर्नांडिस यांचे विधान डॉ. भाटीकरांच्या मृत्यूच्या कारणापेक्षा अधिक गूढ निर्माण करणारे असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. त्यांचे ओठ कुणी बंद केले आहेत? पूर्ण माहिती देता येत नसेल तर ‘प्राथमिक तपासात सर्पदंश वाटतो’, अशी मोघम माहिती देता आली असती. विभागप्रमुख असलेल्या व्यक्तीने आपल्या पदाला शोभेल असे निर्भयपणे वागणे अपेक्षित आहे. त्यामुळे या विषयावर सार्वजनिक चर्चा व्हावी, अशी प्रतिक्रिया आणि आवाहन टोनी मार्टिन नामक सोशल मीडिया युजरने केले आहे.

#GoaNews #HealthDepartment #MediaGuidelines #AndreFernandes #GoaMedicalNews #CCSRules #BreakingNews #GoaGovernment