डिचोलीत आजपासून १४ जूनपर्यंत कीर्तन महोत्सव

अधिकमासानिमित्त बिचोलीम वेलफेअर फाऊंडेशन व संत समाज डिचोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन


just now
डिचोलीत आजपासून १४ जूनपर्यंत कीर्तन महोत्सव

पत्रकार परिषदेत माहिती देताना मुकुंद कवठणकर. सोबत महेश म्हांबरे, अजित टाककर आणि श्याम शिरोडकर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : रविवार, १७ मे ते १४ जून या अधिकमासात बिचोलीम वेलफेअर फाऊंडेशन व संत समाज डिचोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आनंदाचे डोही’ हा कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महिन्याभरात नामवंत कीर्तनकारांची कीर्तने सादर होणार आहेत, अशी माहिती मुकुंद कवठणकर व वेलफेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश म्हांबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अजित टाककर, एकनाथ लामगावकर यांचीही उपस्थिती होती. मुकुंद कवठणकर सविस्तर कार्यक्रम सांगताना म्हणाले, हा कीर्तन महोत्सव अधिक मासात आयोजित केला जातो. यावर्षी तो पोंबुर्फेवाडी, शिरोडवाडी मुळगाव येथील श्री रवळनाथ शांतादुर्गा मंदिरात दररोज सायं. ७ ते रात्री ८.३० या वेळेत होणार आहे. इतर विधी होऊन रात्री ९ वा. या सोहळ्याची सांगता होणार आहे. १७ मे रोजी दुपारी ३.३० वा. वेताळ मंदिरात भाविक जमणार आहेत. नारदमुनींची पालखी दिंडीपथकाने पोंबुर्फेवाडी येथे नेली जाणार आहे. तेथे महोत्सवाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्याला देवस्थानचे अध्यक्ष शिवदत्त शेट्ये, प्रमुख वक्ते डॉ. विनय मडगावकर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी कीर्तन संपल्यावर धुपारती होईल. या २९ दिवसांमध्ये २९ यजमान सेवा बजावणार आहेत. अखेरच्या दिवशी १४ जून रोजी संदीप माणके यांचे कीर्तन होणार आहे. कीर्तन ही आपली संस्कृती असून ती टिकावी व पुढील पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे महेश म्हांबरे यांनी सांगितले.
कीर्तनभक्तीत मोठा आनंद असून तो आनंद द्विगुणित व्हावा यासाठी कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवाचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा.
_ श्याम शिरोडकर, संत समाज डिचोली

हेही वाचा