देशाच्या तुलनेत गोव्यातील किरकोळ महागाई दर कमी

इंधन दरवाढीचा परिणाम : एप्रिलमध्ये देशातील दर ३.४८ टक्के


16th May, 11:47 pm
देशाच्या तुलनेत गोव्यातील किरकोळ महागाई दर कमी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : एप्रिल महिन्यात गोव्यातील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर कमी होऊन २.२ टक्के झाला. संपूर्ण देशात महागाई दर कमी असण्यात गोवा चौथ्या स्थानी राहिला. एप्रिल महिन्यात देशातील महागाई दर ३.४८ टक्के राहिला. अन्नधान्य तसेच दागिने, इंधन आदींच्या किमती वाढल्याने मार्चच्या तुलनेत एप्रिलमधील राष्ट्रीय महागाई दरात किरकोळ वाढ झाली आहे. याशिवाय राष्ट्रीय घाऊक महागाई दर वाढून ८.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे येणाऱ्या काळात सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
इराण-अमेरिका युद्धामुळे इंधन आणि पर्यायाने दळणवळण महाग झाल्याने देशातील महागाई दर वाढला आहे. एप्रिल महिन्यातील महागाई दर या वर्षातील तिसरा सर्वाधिक महागाई दर ठरला आहे. असे असले तरी तो आरबीआयने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी खात्याच्या अहवालानुसार गोव्यात एप्रिल महिन्यात ग्रामीण भागात महागाई दर १.६८ टक्के, तर शहरी भागात २.४९ टक्के राहिला. गोव्यात मार्च महिन्यात महागाई दर २.२१ टक्के होता. फेब्रुवारीमध्ये २.१८ टक्के, तर जानेवारीमध्ये १.९२ टक्के होता.
देशात सर्वांत कमी महागाई दर मिझोरममध्ये
एप्रिलमध्ये मिझोरम येथील महागाई दर देशात सर्वांत कमी म्हणजेच ०.६९ टक्के होता. यानंतर छत्तीसगढ (१.३५ टक्के), अरुणाचल प्रदेश (२.०७ टक्के), गोवा (२.२ टक्के), मणिपूर (२.३३ टक्के) यांचा क्रमांक लागतो. तर तेलंगणामधील महागाई दर सर्वाधिक ५.८१ टक्के राहिला. याशिवाय तामिळनाडू (४.१८ टक्के), आंध्र प्रदेश (४.२ टक्के), कर्नाटक (४ टक्के), सिक्कीम (४.१६ टक्के) या राज्यातील महागाई दर तुलनेने अधिक होता. केंद्र शासित प्रदेशात दिल्लीमधील महागाई दर सर्वांत कमी म्हणजेच १.९६ टक्के होता.

हेही वाचा