निवडणुकांसाठी केजरीवाल यांच्या तीन हमी : वेळ्ळी येथे आरोग्य पॉलीक्लिनिक नाईट क्लिनिकचे उद्घाटन

वेळ्ळी येथील सभेत बोलताना अरविंद केजरीवाल. समोर उपस्थित जनसमुदाय.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आरोग्य, वीज आणि महिला कल्याणाबाबत तीन महत्त्वाच्या गॅरंटी जाहीर केल्या. यातून ‘आप’ निवडणुकांसाठी तयारी सुरू केल्याचे जाहीर केले.
केजरीवाल यांच्या उपस्थितीत वेळ्ळी मतदारसंघात गोव्यातील तिसऱ्या आरोग्य पॉलीक्लिनिक नाईट क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला गोवा प्रभारी आतिशी, कार्याध्यक्ष जेर्सन गोम्स, वरिष्ठ उपाध्यक्ष संदेश तळेकर देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. २०२७ च्या विधानसभा निवडणुकांचे संकेत देत केजरीवाल यांनी यावेळी सरकार आल्यास गोव्यातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज, १० लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य विमा संरक्षण व प्रत्येक महिलेला दरमहा १ हजार रुपयांची थेट आर्थिक मदत देण्यात येईल, असे जाहीर केले.

चिंचणी येथे सुरू झालेले क्लिनिक सोमवार ते शनिवार सायं. ७ ते सकाळी ७ या वेळेत सुरू राहील. अनेक वर्षांपासून स्थानिक लोक रात्रीच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्रस्त होते. सरकारने मदत नाकारली; पण जनतेच्या सोयीसाठी हे पाऊल उचलले, असे आमदार क्रूझ सिल्वा यांनी यावेळी सांगितले.
सभेत केजरीवाल यांनी स्मार्ट मीटर सक्तीवर निशाणा साधला. सरकारने जनतेला २४ तास वीज देण्यावर लक्ष केंद्रित करावे, स्मार्ट मीटर लावून लोकांवर पाळत ठेवण्याचे राजकारण करू नये. गोव्यातील ४० पैकी फक्त ‘आप’च्या दोनच आमदारांनी मोफत क्लिनिक सुरू करून दाखवले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. वाल्मिकी नाईक म्हणाले, हे क्लिनिक म्हणजे केवळ निवडणुकीचे आश्वासन नसून ‘आप’च्या आरोग्य मॉडेलचे जिवंत उदाहरण आहे. आम्ही विरोधी बाकांवर असूनही काम करून दाखवतो.
१५ वर्षांपासून प्रलंबित भूमिगत केबलिंग पूर्ण : सिल्वा
आमदार क्रूझ सिल्वा यांनी सांगितले की, मतदारसंघातील १५ वर्षांपासून प्रलंबित असलेले भूमिगत केबलिंग पूर्ण केले, ३०-४० वर्षे जुन्या पाण्याच्या पाईपलाईन्स बदलल्या, ३.५ लाख चौरस मीटर पडिक जमीन लागवडीखाली आणली, १०० हून अधिक मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे.