साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये​ विद्यार्थ्याची आत्महत्या, तर डॉ. केतन भाटीकर यांचा सर्पदंशाने मृत्यू

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
just now
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : सांकवाळ येथील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये पीचडी करणाऱ्या अर्जुन साबू (२६) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बोरी येथे भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. डॉ. केतन भाटीकर यांचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. याशिवाय अपघाती मृत्यू, चोरीच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार 

‘अपना घर’मधून पळालेला एक जण ताब्यात

मेरशी येथील ‘अपना घर’ या सरकारी पुनर्वसन केंद्रातून दोन अल्पवयीन मुलांनी पलायन केल्याची घटना घडली. रविवारी सकाळी ही मुले केंद्राच्या कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊन पसार झाली. जुने गोवे पोलिसांनी या मुलांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली. एकाला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार जुने गोवा पोलिसांत देण्यात आली आहे.

ओकांब-धारबांदोडा येथील दूधसागर नदीत विद्यार्थी बुडाला

ओकांब-धारबांदोडा येथील दूधसागर नदीत रविवारी सायंकाळी मित्रांसोबत आंघोळीसाठी गेलेला इम्तियाज हुसेन (२१, लडाख) हा युवक बुडाला. इम्तियाज हा फर्मागुडी येथील आयआयटीचा विद्यार्थी आहे. माहिती मिळाताच फोंडा पोलीस व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बेपत्ता युवकाचा शोध सुरू केला.

बनावट पासपोर्टप्रकरणी अफगाणी व्यक्तीला अटक

बनावट भारतीय पासपोर्ट बाळगून, विविध नावे धारण करून भारतीय प्रशासकीय यंत्रणांची फसवणूक करणाऱ्या दिगराज हिरो याला रविवार, दि. १० रोजी पहाटे दाबोळी विमानतळ पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी दाबोळी विमानतळावरील इमिग्रेशन ब्युरोचे विभागप्रमुख शनिगरम श्रीहर्ष यांनी दाबोळी विमानतळ पोलीस स्थानकात तक्रार केली होती.

सोमवार 

चिंचणीत संतप्त लोकांनी फोडले वीज कार्यालय

वादळी वार्‍यासह आलेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे सासष्टीतील चिंचणी परिसरात अनेक ठिकाणी झाडे व वीज खांब कोसळून पडले. यामुळे मागील तीन दिवस या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे नागरिकांचा राग अनावर झाला. कार्यालयाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी कार्यालयाचा दरवाजा फोडला.

निष्काळजीपणामुळे वाळपई आरोग्य केंद्रातील डॉक्टर निलंबित

गँगरीनमुळे ११ वर्षीय मुलाला पाय गमवावा लागल्याच्या प्रकरणी वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याने वाळपई आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. यवंती गावडे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. याबाबतचा आदेश आरोग्य सहसचिव प्रणब भट यांनी जारी केला आहे. या प्रकरणी तज्ज्ञ समितीकडून सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत डॉ. गावडे यांचे निलंबन कायम राहणार आहे.


कारची दुभाजकाला धडक बसून चालक जखमी

जुने गोवा येथील कदंब बगलमार्गावर सोमवारी सायंकाळी कार चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालक शिवम कोलवेकर (वय २७, रा. कुळे) हा गंभीर जखमी झाला आहे. कारने प्रथम दुभाजकाला आणि त्यानंतर वीज खांबाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

मंगळवार

गव्याच्या हल्ल्यातच होमगार्ड दिनेशचा मृत्यू

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानुसार तसेच शवचिकित्सा अहवालानुसार होमगार्ड दिनेश गावडे यांचा मृत्यू गव्याच्या हल्ल्यात झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी दिली.

लोटलीत हिट अँड रन प्रकरणात यूपीच्या तरुणाचा मृत्यू

वेर्णाहून लोटलीकडे जाणार्‍या रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मिर्झापूर (उत्तरप्रदेश) येथील ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मायना कुडतरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून संशयित गाडीचालकाला अटक केली आहे.

कोलवा, सुरावलीतील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई

सासष्टीतील अन्न व औषध खात्याच्या पथकाने कोलवा, सुरावलीत स्टॉल्स, आस्थापनांची पडताळणी केली. कोलवा किनारी आरोग्य कार्ड नसणे, अस्वच्छता यासाठी १४ विक्रेत्यांना नोटीस काढल्या. तर, सुरावलीत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करत १८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय मडगावातील एका खानावळीत पाहणी करत ते बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.

चिखली-दाबोळी विमानतळ मार्गावर भरधाव बोलेरो उलटली

चिखली-दाबोळी विमानतळ मार्गावर भरधाव वेगातील बोलेरो वाहन अचानक उलटले. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी चालक सुदैवाने सुखरूप बचावला.

बुधवार

बिट्स पिलानीतील एका विद्यार्थ्याची आत्महत्या

सांकवाळ येथील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये पीचडी करणाऱ्या अर्जुन साबू (२६) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर विद्यार्थी केरळचा रहिवासी असून, तो या कॅम्पसपासून काही अंतरावर असलेल्या एका इमारतीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता.

कुडतरीत १७ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

‘नीट-यूजी २०२६’ची परीक्षा रद्द झाल्यानंतर निर्माण झालेल्या तणावातून नेसाय-कुडतरी येथे राहणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ‘यापुढे मला पुन्हा स्पर्धा परीक्षेला बसायचे नाही’, असे चिठ्ठीत लिहून या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. हा विद्यार्थी मूळचा बंगळूर येथील असून मडगाव परिसरातील एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होता.

काशिनाथ शेट्ये यांची पीआय, पीएसआय विरोधात गुन्हे शाखेकडे तक्रार

चुकीच्या तक्रारीनंतर कोणतीही चौकशी न करता खोटा गुन्हा नोंदवल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी जुने गोवे पोलीस निरीक्षक गौरीश मळीक, पोलीस उपनिरीक्षक संकेत पोखरे आणि योगेश तिगाडी यांच्या विरोधात गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी करून पोलीस निरीक्षक गौरीश मळीक आणि उपनिरीक्षक संकेत पोखरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

गुरुवार

बोरी येथे भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू; एक जखमी

टॉप कोला - बोरी येथे स्कूटरला मागून जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात स्कूटरच्या मागे बसलेल्या मोहिनी तुकाराम नाईक (६३, रा. बेतकी - बोरी) यांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत त्यांचे पती तुकाराम नाईक हे किरकोळ जखमी झाले आहेत.

गुंतवणूकदारांना २.४८ कोटींचा गंडा घालणाऱ्यास अटक

जास्त व्याजाचे आमिष दाखवून गोव्यातील अनेकांना ‘ओरिस कॉईन’मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून २.४८ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) संशयित रवी शंकर ठाकूर (३५, मुंबई) याला अटक केली.

सरकारी नोकरीच्या आमिषाने १८ लाखांना लुबाडले

उसगाव भागातील काही जणांना सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने १८ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी सुहाना सुजय नाईक (३९, आमोणा) या महिलेला अटक केल्यानंतर गुरुवारी सुभाष सीताराम नाईक (पाळी - साखळी) याला अटक केली.

शुक्रवार


डॉ. केतन भाटीकर यांचे निधन

डॉ. केतन भाटीकर आणि त्यांचे सहकारी सुशांत कवळेकर गुरुवारी मध्यरात्री दांडेलीहून गोव्याच्या दिशेने कारने येत होते. अनमोड घाटात कार उभी करून डॉ. भाटीकर खाली उतरले. याच दरम्यान त्यांचा मोबाईल झाडीत पडला. तो उचलण्यासाठी ते वाकले असता त्यांना सर्पदंश झाला. यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

जीएसटी कर चुकवेगिरी​प्रकरणी कॅसिनो कंपनीच्या संचालकाला अटक

कॅसिनो संबंधित सेवांवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भरण्यात कसूर करून ‘शून्य विवरणपत्रे’ दाखल करत शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाच्या गोवा विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी कांदोळी-सायपे येथील हॉटेल हिल्टन गोवा रिझॉर्टमधील फिनिक्स कॅसिनो चालवणाऱ्या टर्टल गेमिंग अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक संदीप राधेश्याम राय (४४, ताळगाव) याला अटक करण्यात आली आहे.


सत्तरीत चक्रीवादळाचा तडाखा

सत्तरी तालुक्याला शुक्रवारी पहाटे चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला असून अनेक भागांत नैसर्गिक आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून पडल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली, तर विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने वीजपुरवठाही खंडित झाला.

शनिवार

गिरी येथील अपघातात पेडणेतील दुचाकीस्वाराचा मृत्यू

गिरी, बार्देश येथील ग्रीन पार्क जंक्शनवरील उड्डाणपुलावर इनोव्हा कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार श्रेयश श्रीपाद तेली (२४, पेडणे) यांचा मृत्यू झाला. म्हापसा जिल्हा इस्पितळात सेवा बजावणारे ज्युनिअर डॉक्टर निथीन बालन (रा. मूळ केरळ) हे पर्वरीहून पेडे, म्हापसा येथे आपल्या केएल ५० एम ८७३३ क्रमांकाच्या कार गाडीने जात होते. तर युवक हा त्याच दिशेने दुचाकीवरून जात होता. यावेळी अपघात झाला.


घराला आग लागून महिलेचा गुदमरुन मृत्यू

चोडण येथील खैराटवाडा भागात घरातील इन्व्हर्टरचा शॉर्टसर्किटमुळे स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत सपना बाबलो वळवईकर (५५) या महिलेचा गुदमरून मृत्यू झाला. दुर्घटनेत धुरामुळे बेशुद्ध पडलेल्या तिच्या दोन मुलांवर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरू आहेत. आगीत वळवईकर यांच्या घराचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

बनावट सोने तारण ठेवून बँकेला चुना, महिलेला अटक

बनावट सोन्याचे दागिने बँकेत तारण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज लाटत बँकेची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय महिलेला अटक करण्यात पणजी पोलिसांना यश आले आहे. संशयित महिलेने पणजी येथील 'सीएसबी बँके'त १६ बनावट सोन्याच्या बांगड्या तारण ठेवून तब्बल ७ लाख ३५ हजार रुपयांचे कर्ज घेत बँकेचे आर्थिक नुकसान केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून ही महिला पोलिसांना गुंगारा देत गोव्याबाहेर पसार झाली होती.

लक्षवेधी

भंडारी समाजाच्या सर्वसाधारण सभेत समाज प्रमाणपत्राच्या गैरवापराचा मुद्दा गाजला. काही सदस्यांनी प्रमाणपत्रांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत त्यावर निर्बंध आणण्याची मागणी केली, तर काहींनी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे समर्थन केले.

होमगार्ड दिनेश गावडे याच्या मृत्यू प्रकरणातील शवविच्छेदन अहवालाची गोपनीयता वन खात्याकडून भंग झाल्याचा आरोप दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या फॉरेन्सिक विभागाने केला आहे. याप्रकरणी फॉरेन्सिक विभागप्रमुख डॉ. मधू घोडकिरेकर यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात काही दिवसांपूर्वी अनेक संशयास्पद डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता पार्सेकर यांची बदली करण्यात आली आहे. स्वच्छता विभागाचे निरीक्षक मनोज नाईक यांच्या बदलीची प्रक्रिया आरोग्य खात्याने सुरू केली आहे.

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा येथे जप्त केलेल्या हायड्रोपोनिक गांजाचे वजन व्यावसायिक प्रमाणात आहे. तसेच या प्रकरणातील एक संशयित फरार आहे, असे निरीक्षण नोंदवून विदेशातून आणलेल्या ८.३४ कोटी ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक केलेल्या संशयित सीमा कटयाल (३७, हरयाणा), अमीर सय्यदहुला खान (३१, मुंबई) आणि अंसारी मोहम्मद साजिद (३४, मुंबई) या संशयिताचा जामीन अर्ज फेटाळून लावला. 

हेही वाचा