बांबोळी सामूहिक बलात्कार प्रकरणी संशयितांविरुद्ध आरोपपत्र दाखल

आगशी पोलिसांनी १४० पानी आरोपपत्रामध्ये एकंदर २३ साक्षीदारांचे जबाब नोंदवले.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
just now
बांबोळी सामूहिक बलात्कार प्रकरणी संशयितांविरुद्ध आरोपपत्र दाखल

पणजी : बांबोळी सामूहिक बलात्कार प्रकरणात आगशी पोलिसांनी तपास करत मेरशी येथील जलदगती न्यायालयात संशयित आरोपी रोवन आब्रान्चेस आणि मेक्वीन आद्राद यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. एकूण १४० पानांच्या या विस्तृत आरोपपत्रामध्ये पोलिसांनी २३ प्रमुख साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, तांत्रिक व परिस्थितीजन्य पुरावे भक्कमपणे मांडले आहेत. या प्रकरणातील दोन्ही संशयितांचा जामीन न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

१८ मार्च रोजी एका महिलेने या संदर्भात आगशी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, १७ मार्च रोजी ती महिला बांबोळी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेली असता, दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन्ही संशयित अज्ञात युवकांनी तिच्याशी ओळख वाढवून मैत्री केली. त्यानंतर त्यांनी तिला मद्यपान करण्यास प्रवृत्त केले. नशा चढल्यानंतर संशयितांनी तिला आगशी येथील नवीन जुवारी पुलाखाली, नदीच्या काठालगत असलेल्या निर्जन भागात नेले. तिथे तिला अधिक मद्य देऊन ती पूर्णपणे बेशुद्ध आणि हतबल असताना तिच्यावर बळजबरीने सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य ओळखून उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार, आगशीचे पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक रक्षा नाईक यांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान पीडितेने माहिती दिली की, बांबोळी येथील एका दुकानातून दारू खरेदी करताना संशयितांनी डिजिटल माध्यमातून यूपीआय (UPI) द्वारे पैसे चुकते केले होते. पोलिसांनी या माहितीच्या आधारे तात्काळ संबंधित दुकानाची आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यूपीआय ट्रान्झॅक्शनच्या डिजिटल पुराव्यावरून पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत रोवन आब्रान्चेस याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला साथीदार मेक्वीन आद्राद याच्या सहभागाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या..

हेही वाचा