२० ते २२ मे पर्यंत सुर्ला येथे होणार शिबिर

पणजी : डिचोली तालुक्यातील (Bicholim Taluka) सुर्ला गावातील बाधित शेतकरी, जमीनधारक, भोगवटादार तसेच कायदेशीर वारसांसाठी नुकसानभरपाईचे दावे सादर करण्याकरीता विशेष सुविधा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेल्या रिट याचिकेवरील आदेशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. हे शिबिर २० ते २२ मे २०२६ दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय, सुर्ला येथे होणार आहे.
उपजिल्हाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी, डिचोली (Deputy Collector, Bicholim) यांची पात्र लाभार्थ्यांना नुकसानभरपाई मंजूर व वितरित करण्यासाठी कोर्ट कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री तथा खाण व भूविज्ञान मंत्र्यांच्या निर्देशानुसार दावा सादरीकरण व पडताळणी सुलभ करण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
संबंधित सर्व पात्र दावेदारांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिराला उपस्थित राहून आपले दावे सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बाधित सर्व्हे क्रमांक, लाभार्थींची नावे व हक्क तपशीलांची यादी सुर्ला ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दावेदारांनी फॉर्म-१ आणि १४ ची प्रत, ओळखपत्र, बँक खात्याचा तपशील, १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील ‘इंडेम्निटी बाँड‘, मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, संमतीपत्र तसेच अन्य संबंधित महसुली कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहणार आहे. सर्व कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित प्रतींसह मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी आणणे बंधनकारक असेल.
ओळख, हक्क व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच नुकसानभरपाई वितरित केली जाणार असून; वादग्रस्त प्रकरणांमध्ये सक्षम न्यायालयाच्या आदेशापर्यंत रक्कम रोखून ठेवली जाऊ शकते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.