नास्नोळा पंचायतीची बक्षीस योजना : कचऱ्यावर नियंत्रणासाठी शक्कल

म्हापसा : नास्नोळा गावाला कचरामुक्त करण्यासाठी पंचायतीने नवा उपक्रम राबवला आहे. कचरा टाकणाऱ्या वाहनाच्या क्रमांकासह फोटो किंवा व्हिडिओ काढा आणि १ हजार रुपये बक्षीस मिळवा, अशी योजना पंचायतीने सुरू केली आहे. या मोहिमेत सर्वाधिक फोटो काढून देणाऱ्याला १० हजार रुपयांचे विशेष महापारितोषिक देऊन गौरविण्यात येईल, असे पंचायतीने जाहीर केले आहे.
गावातील कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी नास्नोळा ग्रामपंचायतीने अत्यंत कडक आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कचरामुक्त आणि सुंदर गाव घडवण्याच्या उद्देशाने सरपंच लक्ष्मण केरकर यांच्या नेतृत्वाखालील पंचायत मंडळाने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.
पंचायतीने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार, जर कोणीही व्यक्ती नास्नोळा पंचायतीच्या हद्दीत बेकायदेशीरपणे कचरा फेकताना आढळली आणि तुम्ही त्याचा गाडीच्या नंबर प्लेटसह फोटो किंवा व्हिडिओ काढून पंचायतीला पाठवला, तर माहिती देणाऱ्या जागरूक नागरिकाला १ हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. शिवाय या मोहिमेत जो नागरिक कचरा फेकणाऱ्यांचे सर्वाधिक फोटो काढून देईल, त्याला १० हजार रुपयांचे विशेष महा-पारितोषिक दिले जाईल, असे पंचायतीने घोषित केले आहे.
या कचरा फेकणाऱ्यांची गय केली जाणार नसून गाडीची ओळख पटताच संबंधित दोषी व्यक्तीविरुद्ध पंचायतीकडून ५ हजार रुपये दंडात्मक शुल्क वसूल केले जाणार आहे. आपले गाव स्वiच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नास्नोळा पंचायत मंडळाने नागरिकांना या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून गावात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या कडेला व उघड्यावर कचरा फेकला जात असल्याचे आढळून आले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा बेजबाबदार नागरिकांमध्ये भीती आणि शिस्त निर्माण व्हावी, या उद्देशाने पंचायतीने आता ही मोहीम राबवली आहे.
गुरुवारपासून आम्ही या मोहिमेला सुरुवात करत आहोत. नियम मोडणाऱ्यांचे फोटो जी व्यक्ती आम्हाला देईल, त्याला रोख बक्षीस दिले जाईल. स्वच्छ गाव, सुंदर भविष्य हा संकल्प डोळ्यांसमोर ठेवून लोकांनी उघड्यावर कचरा न फेकता गोवाचे सौंदर्य अबाधित ठेवण्यास सहकार्य करावे.
- लक्ष्मण केरकर, सरपंच