४२ व्या खाण सुरक्षा सप्ताह २०२५-२६ चा समारोप

रामावतार मीना यांची उपस्थिती : फोमेंतो रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेडकडून कार्यक्रमाचे आयोजन


34 mins ago
४२ व्या खाण सुरक्षा सप्ताह २०२५-२६ चा समारोप

कार्यकमाला उपस्थित रामावतार मीना, रमेश वालिकर, आफताब अहमद, पी. के. जैन, टी. श्रीनिवास, राजीव कुमार, धीरजकुमार जगदीश आणि संदीप मोरजकर.
...
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : खाण सुरक्षा महासंचालनालयाच्या अधिपत्याखालील खाण सुरक्षा आणि उत्पादकता परिषदेने (गोवा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर) शुक्रवारी फोंड्यात ४२ व्या खाण सुरक्षा सप्ताह २०२५-२६ च्या समारोप सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे आयोजन फोमेंतो रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेडने केले होते. या सोहळ्याला भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे खाण सुरक्षा उपमहासंचालक रामावतार मीना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
व्यासपीठावर गोवा विभागाचे खाण सुरक्षा आणि उत्पादकता परिषद व खाण सुरक्षा संचालकाचे संयोजक रमेश वालिकर, नागपूर येथील खाणकाम पश्चिम विभागाचे खाण सुरक्षा संचालक आफताब अहमद, नागपूर येथील पश्चिम विभागाचे खाण सुरक्षा संचालक - यांत्रिक पी. के. जैन, नागपूर येथील पश्चिम विभागाचे खाण सुरक्षा संचालक - विद्युत टी. श्रीनिवास, गोवा व उत्तर प्रदेशचे खाण सुरक्षा आणि उत्पादकता परिषद व खनिज संसाधन प्रमुख तथा फोमेंतो रिसोर्सेसचे अध्यक्ष राजीव कुमार, खाण सुरक्षा आणि उत्पादकता परिषदेचे उपाध्यक्ष व वेदांता लिमिटेडचे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी धीरजकुमार जगदीश आणि खाण सुरक्षा आणि उत्पादकता परिषदेचे सचिव व फोमेंतो रिसोर्सेसचे महाव्यवस्थापक संदीप मोरजकर उपस्थित होते.
४२ व्या खाण सुरक्षा सप्ताहाचा भाग म्हणून खाण उद्योगात सुरक्षा जागरूकता आणि सर्वोत्तम पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी परिसंवाद, विविध शाखांमधील व्यावसायिक चाचण्या आणि प्रथमोपचार स्पर्धा यांसारखे उपक्रम आयोजित केले होते. अध्यक्ष राजीव कुमार आणि उपाध्यक्ष धीरजकुमार जगदीश यांनी स्वागत केले. परिषदेचे सचिव संदीप मोरजकर यांनी खाण सुरक्षा सप्ताहाचा अहवाल सादर केला. प्रमुख पाहुणे रामावतार मीना यांनी कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी रामावतार मीना आणि इतर मान्यवरांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. पुढील खाण सुरक्षा सप्ताहाचे यजमानपद वेदांता लिमिटेडने स्वीकारले. परिषदेचे सचिव संदीप मोरजकर यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
अपघात कमी करणे हा खाण सुरक्षा सप्ताहाचा उद्देश
खाण उद्योगातील अपघात कमी करणे, व्यावसायिक धोके टाळणे आणि शून्य-हानीयुक्त कार्य वातावरणाला प्रोत्साहन देणे हा खाण सुरक्षा सप्ताह साजरा करण्याचा उद्देश आहे. कार्यक्रमात खाण व्यवस्थापन, कामगार, सरकारी अधिकारी आणि खाण उद्योगाशी संबंधित इतर हितधारकांनी सहभाग घेतला. गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी विभागातील ५० खाणींनी १५ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत सुरक्षा सप्ताह सोहळ्यात सहभाग घेतला. 

खाण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खाणींची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये उत्कृष्ट लोह खनिज ब्लॉक म्हणून फोमेंतो रिसोर्सेस यांना तृतीय पारितोषिक मिळाले.

मार्गदर्शनात रामावतार मीना म्हणाले...

नोव्हेंबर २०२५ पासून लागू करण्यात आलेला नवीन ओएसएच कोड आणि केंद्रीय नियम खाणींना लागू करण्यात येणार आहेत. कामगारांचे हित, कल्याण आणि सुरक्षा सुधारण्याचा हा उद्देश आहे. खाण महासंचालनालयाच्या ‘शून्य नुकसान’ संकल्पनेवर भर देत कोणताही अपघात होऊ नये, यंत्रसामग्री आणि पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, तसेच सर्व कामगारांना अधिक सुरक्षित कामाचे वातावरण मिळावे, याची खात्री करणे आवश्यक आहे.

पूर्वी खाण कायदा १९५२ लागू होता, मात्र आता त्याची जागा ‘ओएसएच कोड २०२०’ या कायद्याने घेतली आहे. यापूर्वी अस्तित्वात असलेले खाण नियम आता केंद्रीय नियमांच्या स्वरूपात लागू झाले आहेत. या नियमांतील तरतुदींची अंमलबजावणी सर्व खाणींनी सुरू करावी.

फक्त रोजगार नव्हे, तर व्यवसाय आणि तेथे काम करणाऱ्या लोकांचे कल्याण, सुरक्षा आणि पर्यावरण सुधारणा हे सरकारचे धोरण आहे. आता प्रत्येक कामगाराला नियुक्तीपत्र देणे बंधनकारक असेल. किमान वेतन निश्चित करावे लागेल. कामाचे तास आठवड्याला ४८ तासांपेक्षा आणि दिवसाला ८ तासांपेक्षा अधिक असणार नाहीत.

महिला कामगारांनाही या नियमांमुळे मोठा फायदा होणार असून त्यांना २६ आठवड्यांच्या प्रसूती रजेची तरतूद करण्यात आली आहे. कोणतीही महिला कर्मचारी कोणत्याही खाणीत २४ तास कोणत्याही वेळी काम करू शकते; मात्र भूमिगत कामासाठी काही विशेष नियम लागू असतील.

२०१६-१७ मध्ये शेवटचा सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला होता. २०१८ नंतर गोव्यातील खाणी बंद झाल्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा सुरक्षा सप्ताह साजरा होत असून आजचा दिवस सर्वांच्या स्मरणात राहील.