राज्यातील मंत्री, अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर बंदी

मुख्यमंत्र्यांकडून ताफ्यातील वाहनांमध्ये कपात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th May, 10:58 pm
राज्यातील मंत्री, अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर बंदी

पणजी : आखाती देशांतील युद्धस्थिती आणि अर्थव्यवस्थेवरील संभाव्य परिणाम लक्षात घेऊन गोवा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी परदेश दौऱ्यांवर निर्बंध घालण्याचे आवाहन केले असून, त्यानुसार राज्याचे मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी आणि पंचायत सदस्यांच्या परदेश दौऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

सरकारी खर्चातून परदेश दौऱ्यांना मज्जाव

विविध कामांसाठी मंत्री, आमदार तसेच पंचायत सदस्यांकडून अनेकदा परदेश दौरे केले जातात. यापूर्वी अशा अनेक परदेश भेटी झाल्या आहेत. मात्र, यंदा सरकारी खर्चातून कोणालाही परदेश दौरा करता येणार नाही, असा स्पष्ट आदेश वित्त खात्याने जारी केला आहे. या बंदीमध्ये जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंच तसेच सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

विदेशी चलन बचतीवर भर

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर विदेशी चलनाची गरज भासणार आहे. त्यामुळे विदेशी चलनाची बचत करणे अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक ठरणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर, पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांचा आदर्श

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मी माझ्या ताफ्यातील वाहने कमी केली आहेत. आता माझ्या ताफ्यात केवळ एक वाहन आहे. इंधन वाचवण्यासाठी सर्वांनी योग्य पावले उचलावीत, असे गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

#GoaNews #ForeignTours #NarendraModi #GoaGovernment #ForeignExchange #PromodSawant #EconomicMeasures #BreakingNews