समेटाची चिन्हे धूसर : ‘आरजी’मधील दोन्ही गटांकडून एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका

पणजी : गेले काही दिवस आरजी पक्षाचे अध्यक्ष मनोज परब आणि पक्षाचे सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकार यांच्यात धुमसत असणारा वाद आता उघडपणे सुरू झाला आहे. दोघांनीही सोशल मीडियाद्वारे एकमेकांना थेट लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दोघांच्याही समर्थकांकडून अतिशय खालच्या पातळीवर टीका सुरू असून दोन्ही गटांत समझोता होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. दरम्यान, परब आणि बोरकर यांनी पक्षावर ताबा मिळविण्यासाठी वकिलांचा सल्ला घेतल्यामुळे पक्षातील फूट अटळ बनली आहे.
मनोज परब यांनी काही दिवसांपासून सोशल मीडियावर टीकास्त्र सुरू केले होते. मात्र आमदार वीरेश बोरकर यांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता शांत राहणे पसंत केले होते. मात्र आता बोरकर यांनीसुद्धा सोशल मीडियावरील शाब्दिक युद्धात उडी घेतली असून मनोज यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
वीरेश बोरकर यांनी बुधवारी रात्री उशिरा ‘पीस’ (शांतता) असे म्हणत संयम राखण्याचे आवाहन करणारी पोस्ट केली होती. मात्र गुरुवारी सकाळी मनोज परब यांनी त्यावर खोचक उत्तर दिले. परब यांनी ‘ग्रीनपीस’ (वाटाणा) अशा शब्दांचा खेळ करत एक इमोजी पोस्ट केली आणि त्याखाली ‘सायलंट कावर्ड मॅच्युरिटी’ असा हॅशटॅग वापरून बोरकर यांच्यावर भ्याडपणाचा आरोप थेट नाव न घेता केला.
त्यानंतर ‘कलम ३९ (अ) चा मुद्दा समोर आला, आता त्याचे साइड इफेक्ट्स समोर आले,’ अशी सूचक पोस्ट वीरेश यांनी केली. त्यानंतर परब यांनी खोचक उत्तर देत आदित्य देसाई आणि वीरेश बोरकर या दोघांचाही ‘भाड्याचे बैल’ म्हणून उल्लेख केला. वीरेश बोरकर यांचे ‘भाड्याचे बैल पक्ष ताब्यात घेण्याच्या प्रयत्न करत आहेत,’ असा आरोप परब यांनी सोशल मीडियावर केला आहे.
सायंकाळी उशिरा मनोज परब यांनी ‘आमदाराचा प्रवक्ता हा कुडचडेचा नागडो बाबा’ अशी टीका फेसबुकवर केली आहे. मात्र आरजी समर्थकांनी याची गंभीर दखल घेत परब यांना मर्यादेत राहून भाष्य करण्याच्या सल्ला दिला आहे. दुसरीकडे, आदित्य देसाई यांनी माध्यमांकडे बोलताना बोरकर समर्थकांची मडगाव येथे पक्ष ताब्यात घेण्याविषयी बैठक झाली होती, याला दुजोरा दिला.
पक्षाचे अध्यक्ष मनोज परब, सरचिटणीस विश्वेश नाईक आणि अजय खोलकर यांनी आमदार वीरेश बोरकर यांच्या विरोधात केलेल्या विधानांचा ‘आरजीपी सांत आंद्रे ब्लॉक’ने अधिकृत पत्राद्वारे तीव्र निषेध केला आहे.
सांत आंद्रे ब्लॉकने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मनोज परब आणि इतर नेत्यांनी आमदार वीरेश बोरकर, त्यांचे स्वीय सहाय्यक लिसियो रोन्कोन आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांविरुद्ध केलेली विधाने आणि आरोप बदनामीकारक तसेच बिनबुडाचे आहेत. गेल्या एक महिन्यापासून आमदारांना बनावट फेसबुक अकाऊंटवरून टार्गेट केले जात असतानाही पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही, असा गंभीर आरोप ब्लॉकने केला आहे.
तसेच केंद्रीय कार्यकारिणीने संपूर्ण सांत आंद्रे ब्लॉकवर केलेल्या आरोपांमुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. जोपर्यंत हे सर्व मतभेद सामोपचाराने सुटत नाहीत, तोपर्यंत आमदार वीरेश बोरकर यांनी ‘सीईसी’च्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहू नये, अशी विनंती ब्लॉक कमिटीने केली आहे. मनोज परब यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून त्यांना हा वाद सोडवण्याची इच्छा नसल्याचे दिसते, असेही या पत्रात म्हटले आहे.
आरजीपीच्या कार्यकारिणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘गोवन वार्ता’ला सांगितले की, हा वाद मिटविण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण आमदार बोरकर त्यांना प्रतिसाद देत नाहीत. मागील दीड महिन्यात आमदार बोरकर यांनी पक्षाच्या कार्यकारिणीशी संपर्क पूर्णपणे तोडलेला आहे. त्यांना बैठकीसाठी बोलविण्याकरिता व्हॉट्सअॅप, ईमेलवर कित्येक संदेश पाठवण्यात आले. पण त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. या आठवड्यात कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत बोरकर यांना आमंत्रित केले आहे. बैठकीत समझौता होण्याची आशा आम्हाला आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.