बिट्स पिलानीतील आणखी एका विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळले

दीड वर्षांत सातवी आत्महत्या : वेर्णा पोलिसांकडून तपास सुरू


42 mins ago
बिट्स पिलानीतील आणखी एका विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळले

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : सांकवाळ येथील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये पीचडी करणाऱ्या अर्जुन साबू (२६) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर विद्यार्थी केरळचा रहिवासी असून, तो या कॅम्पसपासून काही अंतरावर असलेल्या एका इमारतीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. अर्जुनने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये’, असे लिहिल्याचे समजते. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठविला आहे. बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये यापूर्वी पाच मुले आणि एका मुलीने आत्महत्या केली आहे.
अर्जुन साबू हा बिट्स पिलानीमध्ये पीचडीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. काही दिवस तो बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये राहिल्यावर कॅम्पसपासून काही अंतरावर असलेल्या एका इमारतीमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन तेथे राहू लागला होता. त्यामुळे त्याचा व कॅम्पसचा संबंध वर्ग चालत असे तेव्हाच येत होता. पीचडी करणाऱ्यांना कॅम्पसच्या बाहेर वास्तव्य करता येते. ते सज्ञान असल्याने त्यांच्यावर वेळेचे बंधन नसते. अर्जुन साबू बुधवारी सकाळी त्याच्या खोलीत मृतावस्थेत सापडला. त्याने कॅम्पसच्या बाहेर आत्महत्या केली असली, तरी तो बिट्स पिलानीचा विद्यार्थी असल्याने व्यवस्थापनाला धक्का बसला आहे. तो मानसिक तणावाखाली होती की आणखी कोणते कारण होते यासंबंधी वेर्णा पोलीस तपास करत आहेत.
यापूर्वी झालेल्या सहा विद्यार्थ्याच्या आत्महत्यांमुळे बिट्स पिलानीचे व्यवस्थापन व शिक्षकवर्ग ‘अलर्ट मोड’वर होते. सरकारतर्फे यासंबंधी चर्चा करून काही निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे शिक्षकवर्ग प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष ठेवून असतात. विद्यार्थी मानसिक तणावाखाली असू नयेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यांना समुपदेशन करण्यात येत आहे. त्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष दिले जात आहे. सध्या बिट्स पिलानीमध्ये परीक्षा सुरू असल्याने या काळात विद्यार्थ्यांनी आत्महत्यासारखे पाऊल उचलू नये यासाठी शिक्षक रात्रीचे जागरण करत आहेत. विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवून आहेत. कॅम्पसमध्ये सुरू असलेली परीक्षा १६ मे रोजी संपणार आहे.
बिट्स पिलानीत आत्महत्या केलेले विद्यार्थी (महिना/वर्ष)

१. ओम प्रियान सिंग (डिसेंबर २०२४)
२. अथर्व देसाई (मार्च २०२५)
३. कृष्णा कासेरा (मे २०२५)
४. कुशाग्र जैन (ऑगस्ट २०२५)
५. ऋषी नायर (सप्टेबर २०२५)
६. वैष्णवी जितेश (फेबुवारी २०२६)
प्राथमिक तपासातून आत्महत्या असल्याचे स्पष्ट
वेर्णा पोलिसांना सकाळी ११.३० वा. बिट्स पिलानीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. हा विद्यार्थी कॅम्पसबाहेर राहत होता. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे दिसून आले आहे. पोलीस तपास सुरू आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे.

प्रशासन हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळणार : जिल्हाधिकारी
बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये गेल्यावर्षी चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. या वर्षातील ही दुसरी आत्महत्या आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे कॅम्पसमध्ये भीतीचे वातावरण असून, त्याचा गंभीर परिणाम संवेदनशील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासन हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलपणे हाताळणार आहे, अशी माहिती दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी दिली.वेब मालिका