यंदा गोव्यात मान्सूनचे आगमन लवकर होण्याची शक्यता

अंदमान-निकोबार बेटांमध्ये १६ मे पर्यंत दाखल होण्यासाठी पोषक वातावरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23 mins ago
यंदा गोव्यात मान्सूनचे आगमन लवकर होण्याची शक्यता

पणजी : हवामान खात्याने मान्सून (monsoon) अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये १६ मे पर्यंत दाखल होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. मान्सून अंदमानमध्ये साधारपणे २० मे पर्यंत दाखल होतो. यंदा येथे मान्सून लवकर दाखल झाल्यास केरळ, गोवा येथेही मान्सूनचे आगमन लवकर होण्याची शक्यता आहे. अंदमान ते गोवा या प्रवासासाठी साधारपणे १५ दिवसांचा कालावधी गृहीत धरल्यास मान्सून गोव्यात मान्सून ४ जूनपर्यंत दाखल होऊ शकतो.
मागील वर्षी मान्सून केरळमध्ये आठ दिवस आधीच म्हणजेच २४ मे रोजी केरळात दाखल झाला होता. अनुकूल वातावरण असल्याने गोव्यात केवळ एकच दिवसात म्हणजेच २५ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. दरम्यान, बुधवारी राज्यातील कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम होती. पणजीत कमाल ३६ अंश, तर किमान २८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान ३५.६ अंश व किमान तापमान २८.७ अंश सेल्सिअस राहिले.
पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३५ ते ३६ अंश, तर किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात १४ ते २६ मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. बुधवारी राज्यातील काही भागात किरकोळ पावसाची नोंद झाली. राज्यात १७ ते १९ मे दरम्यान वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात १ मार्च ते १३ मे दरम्यान सरासरी ८.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण ४९.७ टक्क्यांनी कमी आहे.       

हेही वाचा