कलम ३९ (अ) आंदोलनानंतर आरजीपीत अंतर्गत संघर्ष तीव्र

मनोज–वीरेश यांच्यात दुरावा; पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर


36 mins ago
कलम ३९ (अ) आंदोलनानंतर आरजीपीत अंतर्गत संघर्ष तीव्र

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कलम ३९ (अ) विरोधातील आंदोलनानंतर रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षात (आरजीपी) अंतर्गत मतभेद तीव्र झाल्याचे चित्र समोर आले आहे. पक्षाचे प्रमुख मनोज परब आणि सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांच्यातील दुरावा उघड झाल्याने पक्षातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पक्षांतर्गत मतभेद सुरू होते. मात्र आता हे वाद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाध्यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांच्यातील संवाद पूर्णपणे थांबला आहे. मध्यस्थीचे प्रयत्न होत असले तरी दोन्ही गट समोरासमोर येऊन चर्चा करण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे.
मनोज परब यांना पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीतील बहुतेक सदस्य, सरचिटणीस विश्वेश नाईक, खजिनदार अजय खोलकर आणि इतर पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचे मानले जाते. तर आमदार वीरेश बोरकर यांच्या बाजूने सा लॉरेन्सच्या जिल्हा पंचायत सदस्य तृप्ती बकाल, उत्तर गोव्याचे सरचिटणीस लिसियो रोन्कोन, सासष्टीतील नेते डॅगली फर्नांडिस, यूकेमध्ये राहणारे सदस्य, काही स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उभे आहेत. सध्या मनोज परब यांनी बोरकर यांच्या सांत आंद्रे मतदारसंघातील आरजी पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मौन धारण केलेल्या आमदार वीरेश बोरकर यांनी अखेर बुधवारी दै. ‘गोवन वार्ता’च्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया देत पक्ष सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
आरजीपीतील वाढता अंतर्गत संघर्ष पक्षासाठी मोठे आव्हान ठरत असून, येत्या काळात पक्ष नेतृत्व कोणती भूमिका घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पक्षात कोणतेही मतभेद नाहीत आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच नाही.
— वीरेश बोरकर, आमदार
---
सोशल मीडियावरून आरोप-प्रत्यारोप
मनोज परब यांनी मंगळवारी सोशल मीडियावर काही पोस्टद्वारे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर विखारी टीका केली होती. बुधवारी मात्र त्यांनी सोशल मीडियावर एकच पोस्ट केली. त्यात ते म्हणतात, ‘उघडपणे बोलणे अहंकार मानले जाते.’ दुसरीकडे, आमदार बोरकर समर्थकांनी सोशल मीडियावर आमदार बाेरकर यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. आमदार बोरकर यांचे समर्थक डॅगली फर्नांडिस यांनी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे, ‘शांतता म्हणजे कमजोरी नाही; ती संघर्षाची तयारी असते.’