क्रिकेट स्टेडियमला उशीर झाल्यास सरकार जागा परत घेणार

क्रीडामंत्री रमेश तवडकर यांचा जीसीएला इशारा


13th May, 11:55 pm
क्रिकेट स्टेडियमला उशीर झाल्यास सरकार जागा परत घेणार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी सरकारने गोवा क्रिकेट असोसिएशनला (जीसीए) धारगळ येथे जागा दिली आहे. आता या जागेवर क्रिकेट स्टेडियम बांधायचे की नाही, यावरून जीसीए गोंधळलेली आहे. स्टेडियमला उशीर झाला, तर ही जमीन सरकार परत घेण्यास तयार आहे, असे क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले.
रेंगाळलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमबाबत मंत्री तवडकर म्हणाले, स्टेडियमचा विषय ३ ते ४ वर्षांपासून वारंवार समोर येत आहे. जीसीएने स्टेडियमसाठी जमीन मागितली, तेव्हा सरकारने त्यांना धारगळमध्ये जमीन दिली आहे. जमीन देताना नियम व अटीही घातल्या आहेत. जीसीएने स्टेडियम बांधण्याचे आश्वासन दिले आहे. आणखी विलंब झाला आणि स्टेडियम झाले नाही, तर जीसीएवर पुढील कारवाई करू, असा इशारा मंत्री तवडकर यांनी दिला.
सरकारकडून कोणताही अडथळा नाही
आम्ही जमीन देण्याचे काम केले आहे. उर्वरित प्रक्रिया जीसीएने पूर्ण करायला हवी. स्टेडियमबाबत सरकारकडून कोणताही अडथळा नाही. त्यांचे काम कशामुळे आणि कुठे अडकले, हे माहीत नाही. अशाच अडचणी येऊन उशीर होत राहिला, तर सरकार जमीन परत घेऊन कारवाई करेल. सध्या स्टेडियम बांधण्याबाबत त्यांच्यात स्पष्टता नसल्यामुळे विलंब होत असल्याचे दिसून येत आहे, असे मंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले.