अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरूच राहणार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पेपरफुटीनंतर केंद्र सरकारने ‘नीट यूजी’ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील वैद्यकीय, दंत महाविद्यालयांसह ‘नीट’च्या गुणांवर आधारित अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब होणार आहे. प्रवेशासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मात्र सुरूच राहणार आहे, अशी माहिती तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर यांनी दिली.
बारावीच्या निकालानंतर ‘नीट’ झाल्याने तांत्रिक शिक्षण संचालनालयाने व्यावसायिक महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली होती. माहिती पुस्तिका उपलब्ध करून अर्ज स्वीकारण्यासही सुरुवात झाली होती. ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. मात्र वैद्यकीय, दंत, होमिओपॅथी आणि आयुर्वेद पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश वगळता इतर अभ्यासक्रमांचे प्रवेश पूर्वनियोजित पद्धतीने सुरू राहतील. अभियांत्रिकी आणि फार्मसी अभ्यासक्रमांचे प्रवेश ‘जेईई’च्या गुणांवर आधारित असतात. त्यामुळे अभियांत्रिकी आणि फार्मसी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश नियोजित वेळापत्रकानुसार होतील, असे त्यांनी सांगितले.
नव्या ‘नीट’च्या वेळापत्रकावर प्रवेश प्रक्रिया अवलंबून
पेपरफुटीमुळे एनटीएने नीट यूजी परीक्षा रद्द केली आहे. आता नव्याने परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल आणि परीक्षा घेतली जाईल. नव्या परीक्षेच्या गुणांवर आधारित प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया नव्या ‘नीट’च्या वेळापत्रकावर अवलंबून असेल.