२ वर्षांत सहा विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल..

पणजी : दक्षिण गोव्यातील नामांकित 'बिट्स पिलानी' कॅम्पस सध्या अभ्यासापेक्षा तिथे घडणाऱ्या मृत्यूच्या घटनांमुळे चर्चेत आला आहे. ताजी घटना केरळच्या अर्जुन साबू या २६ वर्षीय पोस्ट ग्रॅजुएशनच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची असून, त्याने संस्थेच्या मागे असलेल्या एका भाड्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळावरून पोलिसांनी एक 'सुसाईड नोट' जप्त केली असून, या मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न वेर्णा पोलीस करत आहेत.
केवळ अर्जुनच नाही, तर २ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथील २० वर्षीय वैष्णवी जितेश विद्यार्थिनीनेही वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. ही विद्यार्थिनी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. रात्री उशिरा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. या घटनांनी आता पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
२०२४ पासून आतापर्यंत बिट्स पिलानीत झालेले मृत्यू आणि त्यामागील कारणे:
१) ११ डिसेंबर २०२४: गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथील २० वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. तपासात अभ्यासाचा दबाव आणि कौटुंबिक अपेक्षा ही कारणे समोर आली.
२) ५ मार्च २०२५: गोव्यातील अथर्व देसाई या २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू. निकालातील अपयश आणि मानसिक ताणामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी नमूद केले.
३) १ मे २०२५: लखनऊ (उत्तर प्रदेश) येथील कृष्णा कासेरा याने आत्महत्या केली. त्याचा शैक्षणिक आलेख खालावत चालल्याने तो चिंतेत होता.
४) १६ ऑगस्ट २०२५: कुशाग्र जैन (उत्तर प्रदेश) या विद्यार्थ्याचा गूढ मृत्यू. रात्री टेबल टेनिस खेळल्यानंतर त्याने चार बाटल्या एनर्जी ड्रिंक प्यायले होते, यामुळे त्याच्या मेंदूला इजा झाली व त्याचा मृत्यू झाला.
५) ४ सप्टेंबर २०२५: कर्नाटक येथील १९ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या. हा विद्यार्थी वैयक्तिक आणि प्रकृतीशी संबंधित समस्यांनी ग्रस्त होता.
६) २ फेब्रुवारी २०२६ : इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या वैष्णवी जिटेश या २० वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या.
७) १३ मे २०२६ (अर्जुन साबू): केरळचा २६ वर्षीय विद्यार्थी. या प्रकरणाचा तपास सध्या 'सुसाईड नोट'च्या आधारे सुरू आहे.
तज्ज्ञांचे मत आणि सरकारी पावले:
विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मागेच एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या मते, सुसाईड कॉन्टॅजियन" (Suicide Contagion) ही एक मोठी समस्या बनली आहे. एका आत्महत्येची बातमी दुसऱ्या तणावग्रस्त विद्यार्थ्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करू शकते. याशिवाय, सर्व घटना परीक्षेच्या काळातच घडल्याने शैक्षणिक दबाव हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. बिट्स प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी २४ तास हेल्पलाइन आणि समुपदेशन सुरू केले असले, नैराश्यात जाऊन टोकाचे पाऊल उचलणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चिंताजनक आहे.
बातमी अपडेट होत आहे.