पुद्दुचेरीत एन. रंगासामी पुन्हा मुख्यमंत्री; विक्रमी पाचव्यांदा घेतली शपथ

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
30 mins ago
पुद्दुचेरीत एन. रंगासामी पुन्हा मुख्यमंत्री; विक्रमी पाचव्यांदा घेतली शपथ

नवी दिल्ली : पुद्दुचेरीचे ज्येष्ठ नेते एन. रंगासामी यांनी बुधवारी विक्रमी पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची (Puducherry Chief Minister  N. Rangasamy) शपथ घेत नवे सरकार स्थापन केले. शपथ विधीनंतर बोलताना रंगासामी यांनी राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी काम करण्याची ग्वाही दिली. “पाचव्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारताना मला अत्यंत आनंद होत आहे. राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व योजना आणि निर्णय आमचे सरकार राबवेल,” असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी अधिकृतपणे त्यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केल्यानंतर नायब राज्यपाल कैलाशनाथन यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले. त्यानंतर रंगासामी यांनी आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे सादर करून सरकार स्थापनेचा दावा केला होता.

दोन दशकांहून अधिक काळाचा राजकीय प्रवास

७६ वर्षीय रंगासामी यांचा दोन दशकांहून अधिक काळाचा राजकीय प्रवास उल्लेखनीय मानला जातो. काँग्रेस पक्षात असताना त्यांनी २००१ ते २००६ आणि पुन्हा २००६ ते २००८ या कालावधीत मुख्यमंत्रीपद भूषवले होते. त्यानंतर त्यांनी ऑल इंडिया एनआर काँग्रेस (AINRC) पक्षाची स्थापना केली आणि २०११ ते २०१६ दरम्यान पुन्हा सत्तेत पुनरागमन केले. २०२१ ते २०२६ या कालावधीत त्यांनी एआयएनआरसी-भाजप आघाडी सरकारचे नेतृत्व केले.

१८ आमदारांचा पाठिंबा

अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रंगासामी यांनी थट्टांचवडी आणि मंगळम या दोन्ही मतदारसंघांत विजय मिळवत आपली मजबूत राजकीय पकड कायम राखली. ३० सदस्यीय विधानसभेत एआयएनआरसी-नेतृत्वाखालील एनडीएला १८ आमदारांचा पाठिंबा मिळाला असून; बहुमतासाठी आवश्यक आकड्यापेक्षा दोन जागा अधिक मिळाल्या आहेत.

नव्या प्रशासनाची अधिकृत सुरूवात 

बुधवारी झालेल्या शपथविधी सोहळ्याने पुद्दुचेरीतील नव्या प्रशासनाची अधिकृत सुरूवात झाली असून; लवकरच इतर मंत्र्यांचाही शपथविधी पार पडणार आहे. विकासकामे, कल्याणकारी योजना आणि प्रशासनातील सातत्य यांवर भर देत रंगासामी सरकार पुढील कार्यकाळात काम करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा