इंधन बचतीसाठी पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; ताफ्यातील वाहनसंख्या ५० टक्क्यांनी कमी

ताफ्यात इलेक्ट्र‌िक वाहनांचा अधिक वापर करण्यावर भर; नवीन वाहन खरेदीला चाप

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
इंधन बचतीसाठी पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; ताफ्यातील वाहनसंख्या ५० टक्क्यांनी कमी

नवी दिल्ली : अमेरिका-इराण युद्धाच्या (US-Iran war) पार्श्वभूमीवर वाढलेल्या जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात इंधन बचत आणि काटकसरीचे उपाय राबवण्यावर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) ला सुरक्षा प्रोटोकॉल अबाधित ठेवत ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर करण्यावर भर देण्यास सांगण्यात आले आहे. अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी नवीन वाहने खरेदी न करण्याचेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

पश्चिम आशियातील दीर्घकाळ सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिणामांचा विचार करून पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीही देशवासियांना इंधन बचत आणि काटकसरीचे सात महत्त्वाचे संदेश दिले होते. त्यामध्ये सार्वजनिक वाहतूक आणि मेट्रोचा वापर वाढवणे, पेट्रोल-डिझेलची बचत करणे, एका वर्षासाठी सोन्याची खरेदी टाळणे तसेच परकीय चलनाची बचत करण्यासाठी विदेश प्रवास मर्यादित ठेवणे यांचा समावेश होता.

पंतप्रधानांच्या या आवाहनाला भाजपच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता ( Delhi chief minister Rekha Gupta)  यांनीही सरकारी कामकाजासाठी वाहनांचा मर्यादित वापर, कारपूलिंग आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

हेही वाचा