संरक्षणात्मक मोहिमेत सहभागी होण्याची ऑस्ट्रेलियाची घोषणा; युद्ध आणखी पेटण्याची शक्यता

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी इराणविरोधातील युद्ध आणि अणुकार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नागरिकांना होणाऱ्या आर्थिक फटक्यापेक्षा इराणला अण्वस्त्र ( nuclear weapon) मिळण्यापासून रोखणे अधिक महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. इराण युद्ध संपवण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी ही भूमिका मांडली. इराण-अमेरिका यांच्यामधील हा संघर्ष वाढत गेल्यास युद्ध अधिक पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इराणच्या मुख्य वाटाघाटी प्रतिनिधींनी अमेरिकेसमोर नवा शांतता प्रस्ताव ठेवला असून, तो स्वीकारला नाही तर चर्चेचे प्रयत्न अपयशी ठरतील, असा इशाराही दिला आहे. पश्चिम आशियातील युद्धविराम कोलमडण्याच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिल्यानंतर इराणकडून ही प्रतिक्रिया आली.
संरक्षणात्मक मोहिमेत सहभागी होण्याची ऑस्ट्रेलियाची घोषणा
या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने (Australia) फ्रान्स आणि ब्रिटनच्या नेतृत्वाखालील ‘संरक्षणात्मक मोहिमेत’ सहभागी होण्याची घोषणा केली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजवाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलिया वेडगेटेल ई-७ए (‘Wedgetail E-7A’ ) निगराणी विमान तैनात करणार आहे. हे विमान सध्या संयुक्त अरब अमिरातीचे इराणी ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी त्या भागात कार्यरत आहे.
इस्त्रायलने हवाई हल्ले वाढवले
दुसरीकडे, इस्त्रायलने (Israel) दक्षिण लेबनॉनमध्ये हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. अमेरिकेत झालेल्या इस्रायल-लेबनॉन चर्चेपूर्वी मंगळवारी झालेल्या हल्ल्यांमध्ये मोठे नुकसान झाले. १७ एप्रिलच्या युद्धविरामानंतर इस्रायली हल्ल्यांत आतापर्यंत ३८० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती बैरूत प्रशासनाने दिली आहे.