
नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'नीट यूजी २०२६' (NEET UG) परीक्षा केंद्र सरकारने मंगळवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ मे २०२६ रोजी देशभरात पार पडलेल्या या परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) हा कठोर निर्णय घेतला. पेपरफुटीचे गंभीर आरोप आणि तपास यंत्रणांच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, आता ही परीक्षा नव्याने घेतली जाणार आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने (SOG) या परीक्षेतील कथित गैरव्यवहारांची चौकशी सुरू केली होती. तपासात असे समोर आले की, परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्न काही विशिष्ट गटांकडे पोहोचले होते. तपास यंत्रणांनी दिलेले पुरावे आणि 'इनपुट्स' पाहता, ही परीक्षा प्रक्रिया पारदर्शक नसल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर, परीक्षेचे गांभीर्य आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन एनजीएने जुनी परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचे जाहीर केले.
एनजीएचे स्पष्टीकरण
एनटीएने 'X' (ट्विटर) वर माहिती दिली की, "राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे पावित्र्य आणि सुरक्षितता राखण्यासाठी आम्ही बांधील आहोत. ८ मे रोजी हे प्रकरण स्वतंत्र चौकशीसाठी केंद्रीय यंत्रणांकडे सोपवण्यात आले होते. कायदा अंमलबजावणी संस्थांकडून मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे, सध्याची परीक्षा प्रक्रिया कायम ठेवता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे."
In continuation of its press release dated 10 May 2026, the National Testing Agency wishes to inform candidates, parents, and members of the public of the following decisions taken in respect of NEET (UG) 2026. NTA had, on 8 May 2026, referred the matters then under consideration…
— National Testing Agency (@NTA_Exams) May 12, 2026
परीक्षेच्या नवीन तारखांची घोषणा लवकरच केली जाईल. एनटीएने स्पष्ट केले आहे की
१. नवीन वेळापत्रक : पुनर्परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल.
२. सुरक्षा उपाय : यापूर्वी परीक्षेसाठी जीपीएस ट्रॅकिंग, एआय सीसीटीव्ही आणि ५जी जॅमरचा वापर करण्यात आला होता. आता पुनर्परीक्षेसाठी सुरक्षा अधिक कडक केली जाणार आहे.
३. विद्यार्थ्यांना सूचना : परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी एनटीएच्या वेबसाइटवर लक्ष ठेवावे.
लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
यावर्षी सुमारे २२,०५,०३५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे आणि चिंतेचे वातावरण असले, तरी प्रामाणिक उमेदवारांना न्याय देण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. आता सरकार या परीक्षेसाठी नवीन तारीख काय जाहीर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.