सरकारी महाविद्यालयांत प्राध्यापकांची १५० पदे रिक्त

कायमस्वरूपी भरतीसाठी लागणार वेळ : तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th May, 09:32 pm
सरकारी महाविद्यालयांत प्राध्यापकांची १५० पदे रिक्त

पणजी : सरकारी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक आणि व्याख्यात्यांची सुमारे १५० पदे रिक्त आहेत. प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाने कंत्राटी तसेच व्याख्यान पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

कायमस्वरूपी भरतीचाही विचार

महाविद्यालयांतील प्राध्यापकांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कायमस्वरूपी भरतीही केली जाणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात एखाद्या विषयासाठी किती प्राध्यापक आहेत आणि किती गरज आहे, याचा आढावा घेऊन ही भरती केली जाईल. मात्र या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने सध्या कंत्राटी आणि व्याख्यान पद्धतीने भरती केली जात आहे, अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर यांनी दिली.

रजेमुळे प्राध्यापकांची कमतरता

काही प्राध्यापक उच्च शिक्षणासाठी दीर्घ रजेवर आहेत, तर काही जण प्रसूती रजेवर असल्याने महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळेच शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कंत्राटी व व्याख्यान पद्धतीवर प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येत आहे.

कायमस्वरूपी भरती प्रक्रियेला विलंब

सरकारी महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी प्राध्यापकांची भरती गोवा लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. आयोगाकडून जाहिरात देऊन अर्ज मागवले जातात आणि परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड केली जाते. या प्रक्रियेला बराच वेळ लागत असल्याने तात्पुरता उपाय म्हणून कंत्राटी तत्त्वावर भरती सुरू आहे.

कॉमर्स, कॉम्प्युटर सायन्समध्ये सर्वाधिक पदे
  • महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्याने फूड न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स, ह्युमन डेव्हलपमेंट, टेक्सटाइल अँड क्लोथिंग या नवीन विषयांचा समावेश झाला आहे.
  • यामुळे शिक्षकांवरील ताण वाढला असून, कॉमर्सच्या २८ आणि कॉम्प्युटर सायन्सच्या १८ पदांसाठी सर्वाधिक भरती होणार आहे.
  • तसेच करिअर मार्गदर्शनासाठी पूर्णवेळ समुपदेशक नसलेल्या ठिकाणी १० कंत्राटी समुपदेशकांची भरती केली जाणार आहे.
विविध विषयांसाठी मागवले अर्ज

बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, बिझनेस लॉ, ऑर्गेनिक केमिस्ट्री, इनऑर्गेनिक केमिस्ट्री, कॉमर्स, कॉम्प्युटर सायन्स, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, इंग्रजी, हिंदी, भूगोल, जिओइन्फॉर्मेटिक्स, जिओलॉजी, इतिहास, कोंकणी, मराठी, गणित, मायक्रोबायोलॉजी, मॅनेजमेंट, फिजिक्स, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, स्पोर्ट्स सायन्स, प्राणिशास्त्र, फूड न्यूट्रिशन, टेक्सटाइल अँड क्लोथिंग, ह्युमन डेव्हलपमेंट, तबला, हार्मोनियम, गायन, थिएटर आर्ट्स, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक आणि महाविद्यालयीन समुपदेशक या सर्व पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ मे २०२६ आहे.

#GoaEducation #ProfessorRecruitment #GovernmentColleges #HigherEducation #GoaJobs #LecturerJobs #EducationNews #GoaNews