
विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा भाजपने दणदणीत पराभव केला. ममतांची १५ वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणून सरकार स्थापन केले. पराभवानंतर ममतांनी रस्त्यावर लढणाऱ्या विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत परत जाणार असल्याचे सांगितले. पक्षातील दिग्गजांना पराभूत व्हावे लागल्यामुळे नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल ढासळले आहे. पराभवाची कारणमीमांसा करताना परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पक्षात बंडाळीची शक्यता वाढल्याने कधी काळी पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार असलेल्या ममतांसमोर आता पक्ष टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत ममतांच्या तृणमूलला फक्त ८० जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने २०७ जागा पटकावल्या. मागील निवडणुकीत तृणमूलचे २१५ उमेदवार विजयी झाले होते. भाजपला केवळ ७७ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत खुद्द ममतांना भवानीपूर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकीपूर्वी ममतांचे पुतणे व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांचा पक्षात हस्तक्षेप वाढला होता. नेत्यांचे मनोबल वाढवण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांची ममतांनी बैठक घेतली. या बैठकीला १० आमदार अनुपस्थित राहिले. पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, पक्ष एकसंध ठेवण्यासाठी ममता बॅनर्जी प्रयत्न करत आहेत; परंतु एक वर्षानंतर किती आमदार आमच्याबरोबर राहतील, याबाबत शंका आहे. कुचबेहारमधील वरिष्ठ नेते रवींद्रनाथ घोष यांनी त्यांच्याच जिल्ह्यातील माजी मंत्री उदयन गुहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गुहा यांच्यासारख्या नेत्यांची हकालपट्टी केली नाही, तर तृणमूलची सत्ता कुचबेहारमध्ये येणे अशक्य आहे.
फरक्काचे माजी आमदार मोनिरूल इस्लाम यांनी अभिषेक बॅनर्जी यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, अभिषेकने आमच्यासारख्या आमदारांचा अपमान केला, त्याचीच फळे पक्षाला भोगावी लागत आहेत. मालदा येथील नेते कृष्णेंदू चौधरी म्हणाले, ममतांकडून अभिषेककडे सत्ता हस्तांतरित झाल्यापासून पक्षाला नुकसान सोसावे लागत आहे.
सत्ता हाती घेतल्यानंतर भाजप आपल्यावर अनेक खटले थोपवेल, अशी भीती तृणमूलचे नेते आणि कार्यकर्त्यांना आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांना ईडी, सीबीआय आणि आयकर विभागासारख्या केंद्रीय संस्थांमार्फत तपासल्या जाणाऱ्या विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा सामना करावा लागत आहे. आता या प्रकरणांना अधिक वेग येईल, अशी भीती पक्षाला आहे. एका नेत्याने म्हटले की, अनेक प्रकरणे राज्य पोलिसांकडेही प्रलंबित होती. भाजपच्या प्रशासनाखाली पोलीस आमच्याविरुद्धची ती जुनी प्रकरणेही पुन्हा सुरू करतील.
सत्ता असताना कार्यकर्ते, नेते पक्षासोबत राहतात; मात्र सत्ता गेल्यानंतर अनेक जण पाठ फिरवतात. सत्ता नसताना पक्ष एकसंध ठेवण्यातच नेत्याची परीक्षा असते. या परीक्षेत ममता उत्तीर्ण होतात का, हे लवकरच कळेल.
- प्रदीप जोशी