नेतन्याहू यांच्या इशाऱ्याने जगाची चिंता वाढली

Story: विश्वरंग |
12 hours ago
नेतन्याहू यांच्या इशाऱ्याने जगाची चिंता वाढली

मध्य-पूर्वेत काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या युद्धविरामामुळे परिस्थिती शांत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी दिलेल्या एका मुलाखतीनंतर पुन्हा एकदा या भागात तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘काम अजून संपलेले नाही,’ असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी इराणच्या अणु कार्यक्रमावर थेट निशाणा साधला आहे.

ही केवळ एक राजकीय प्रतिक्रिया नसून, पुढील काही आठवडे मध्य-पूर्वेसाठी निर्णायक ठरू शकतात, असा संदेश या मुलाखतीतून दिला गेला आहे.

इराण आणि अमेरिकेमध्ये नुकताच युद्धविराम लागू झाला असला, तरी प्रत्यक्षात जमिनीवरील परिस्थिती फार बदललेली दिसत नाही. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहविरोधातील कारवाया सुरूच आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातही तणाव कायम आहे. अशा वेळी नेतान्याहू यांनी अमेरिकन वृत्तवाहिनी सीबीएसला दिलेल्या मुलाखतीत इराणच्या अणु कार्यक्रमाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.

त्यांच्या मते, इराणकडे अजूनही मोठ्या प्रमाणात समृद्ध युरेनियमचा साठा आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या अहवालानुसार, ६० टक्के समृद्ध केलेले युरेनियम काही आठवड्यांतच शस्त्रनिर्मितीसाठी लागणाऱ्या पातळीपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे इस्रायल हा धोका अजून संपलेला मानायला तयार नाही.

या मुलाखतीतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्याचा संकेत. अनेक दशकांपासून इस्रायलला अमेरिकेकडून मोठी लष्करी मदत मिळत आली आहे. मात्र आता ‘स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतः सक्षम राहणे आवश्यक आहे,’ असा सूर नेतान्याहू यांनी लावला. याचा अर्थ भविष्यात इस्रायल कोणतीही कारवाई करताना अमेरिकेच्या परवानगीची वाट पाहणार नाही, असा घेतला जात आहे. मध्य-पूर्वेतील बदलत्या समीकरणांमध्ये हा मोठा राजकीय संदेश मानला जातो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही नेतान्याहू यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे दिसून आले. ‘आम्ही इस्रायलसोबत आहोत,’ असा संदेश ट्रम्प यांनी सोशल मीडियावर दिला. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायलची भूमिका आणखी आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, मध्य-पूर्वेतील कोणत्याही संघर्षाचा परिणाम फक्त त्या भागापुरता मर्यादित राहत नाही. तेलाचे दर, जागतिक व्यापार, शेअर बाजार आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर त्याचा थेट परिणाम होतो. त्यामुळे जगभरातील देश या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

इराणने पाकिस्तानमार्फत शांततेचा प्रस्ताव पाठवल्याची चर्चा होती. मात्र इस्रायलने तो सरळ फेटाळल्याचे वृत्त आहे. इस्रायलची भूमिका स्पष्ट आहे, इराणने सर्व समृद्ध युरेनियम देशाबाहेर हलवले नाही, तोपर्यंत कोणताही तडजोडीचा मार्ग स्वीकारला जाणार नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते की, इस्रायल आता केवळ इशारे देण्याच्या भूमिकेत नाही. गरज पडल्यास थेट लष्करी कारवाई करण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले जात आहेत.


- सचिन दळवी