
दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर आता उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयीन प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणखी थोड्याच दिवसानंतर नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. पूर्वी निकालानंतर करिअर निवड किंवा करिअर मार्गदर्शनाची चर्चा चालायची. आता वर्षभर तसेच सर्वच थरामध्ये करिअर निवड आणि करिअर मार्गदर्शनाची चर्चा सुरू असते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारच्या कार्यकाळात ‘स्वयंपूर्ण गोवा’ मोहीम सुरू झाली. त्यांच्याच कार्यकाळात कौशल्यावर आधारित सर्वाधिक अभ्यासक्रम सुरू झाले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कार्यवाही सुरू झाली. औद्योगिक वसाहतींबरोबर महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये रोजगार मेळावे सुरू झाले. अभ्यासक्रम तसेच प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या संस्थांबरोबर करार करण्यात आले. विविध उपक्रम किंवा उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री जेव्हा शिक्षण संस्थांना भेटी देतात, तेव्हा ते करिअरबाबत बोलत असतात.
करिअरबाबत मार्गदर्शन देण्यासाठी विद्यालयांमध्ये आता समुपदेशकांची नियुक्ती होणार आहे. नोकरी किंवा करिअरसाठी आता फक्त पदव्या मिळविणे उपयोगी ठरणार नाही. पदव्यांबरोबर एखादी कला आत्मसात करणे किंवा कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे. सरकारी नोकरभरती गुणवत्तेच्या आधारावर व पारदर्शकपणे व्हावी, म्हणून आता कर्मचारी भरती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. सरकारी नोकऱ्या सर्वांना मिळणे अशक्य आहे. खासगी नोकऱ्यांसाठी कंपन्यांना रोजगार मेळावे घेणे बंधनकारक केले आहे. सरकारीच नव्हे तर आता खासगी नोकऱ्यासुद्धा सर्वांना मिळणे शक्य होणार नाही. यासाठी काहीजणांना स्वयंरोजगार सुरू करावा लागेल. तरुणांना स्वयंरोजगार सुरू करणे शक्य व्हावे म्हणून ‘मुद्रा योजना’, ‘स्टार्ट अप धोरण’ तयार केले आहे.
हे सर्व उपक्रम सुरू असतानाच गोमंतकीयांनी पारंपरिक व्यवसायांकडे पाठ फिरविल्याने ते परप्रांतीयांच्या ताब्यात गेल्याचे मार्मिक विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. यात काही प्रमाणात तरी निश्चितच तथ्य आहे. बाजारात गेल्यास भाजी आणि मासळी विक्रेत्या महिला परप्रांतीयच अधिक दृष्टीस पडतात. पूर्वी प्रत्येक गावात एक किंवा दोन केस कापणारे न्हावी असायचे. आता गोमंतकीय न्हावी दुर्मिळ झाले आहेत. मोठमोठी सलून्स आणि केशकर्तनालये परप्रांतीयच चालवत आहेत. हॉटेलमधील कर्मचारी किंवा घरात काम करणाऱ्या नोकरदार महिला तर शोधूनही गोमंतकीय सापडत नाहीत. गोमंतकीय गवंडी, सुतार, शिंप्यांचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. एखाद्या शिंप्याने कपडे शिवण्यासाठी छोटेसे दुकान घातले तर त्या दुकानात आणखी दोन शिंप्याना सहज काम मिळू शकते. सुतारकाम करणाऱ्या सुताराने घर किंवा इमारतीचे काम घेतले तर त्याच्या हाताखाली तीन-चार कामगार सहज असतात. यामुळे पारंपरिक व्यवसाय केल्याने रोजगारनिर्मितीही होत असते. शेती व दूध उत्पादनाबाबतही असेच म्हणता येईल. पुन्हा या व्यवसायांसाठी नोकरीप्रमाणे शिक्षणाची किंवा वयाची अट नसते. कौशल्य मात्र आवश्यक असते. पारंपरिक व्यवसायांचे संवर्धन झाले तर रोजगारही निर्माण होऊ शकतात. नोकरी मिळविण्यापेक्षा रोजगार तयार करण्याचे उद्दिष्ट तरुणांनी ठेवायला हवे.
- गणेश जावडेकर