यापूर्वी लहान कॅसिनो जहाजांची जागा मोठ्या जहाजांनी घेतली आहे. मोठी जहाजे एकाच भागात नांगरून ठेवून तिथे कॅसिनो चालवल्यास मांडवी नदीत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मांडवीच्या उरावर अशी मोठमोठी जहाजे आणून ठेवण्यापूर्वी मांडवीच्या या भागाच्या वहन क्षमतेची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.

मांडवीत एका जुन्या कॅसिनो जहाजाच्या जागी नवे जहाज आणण्याच्या हालचाली एका कंपनीने सुरू केल्यामुळे त्याला ‘इनफ इज इनफ’ संस्थेने हरकत घेऊन न्यायालयात धाव घेतली. डेल्टीन कंपनीचा सध्या कॅसिनो मांडवी नदीत आहे. डेल्टीन कंपनीकडे सध्या मांडवीत दोन कॅसिनो आहेत. त्यातील एक कॅसिनो हा मोठा म्हणजे सुमारे ३८४ चौरस मीटरच्या क्षेत्रफळाचा आहे. त्याही पेक्षा जास्त मोठे जहाज आणण्यासाठी कंपनीचा प्रयत्न आहे. त्यासाठी सुमारे दोन हजार प्रवासी हाताळू शकेल अशा प्रकारचे प्रचंड महाकाय जहाज सध्या गोव्यात आणून ते मुरगाव बंदरात नांगरून ठेवले आहे. ११२ मीटर लांबीचे हे जहाज म्हणजे गोव्यातील तरंगत्या कॅसिनोंपैकी सर्वांत मोठे आणि सर्वांत जास्त प्रवासी क्षमतेचे जहाज आहे. गोव्यातील अनेक कॅसिनो कंपन्यांनी यापूर्वी जहाजांची अदलाबदल केली आहे. लहान बोटींची जागा मोठ्या सुसज्ज आणि जास्त प्रवासी हाताळणाऱ्या जहाजांनी घेतली आहे. त्यामुळे यात नाविन्य काही नाही किंवा पहिल्यांदाच असे होत आहे, असेही नाही. सरकारने कायद्यात तरतुदी करून वेळोवेळी कॅसिनो मालकांना बोट बदलण्यासाठी संधी दिली आहे. किंबहुना सरकारशी बोलणी करूनच कंपन्या नव्या जहाजाच्या बांधणीसाठी पुढाकार घेतात.
डेल्टा कॉर्प ही कॅसिनो क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य कंपनी आहे. मांडवीतील जे तरंगत कॅसिनो आहेत, त्यामध्ये आता स्पर्धाही वाढली आहे. प्रत्येक जण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने दाखवत असतो. ग्राहकांना गोव्यात येण्यासाठी पॅकेज देण्यापासून ते कोटींची बक्षिसे, महागड्या गाड्या असलेले लकी ड्रॉ काढण्यापर्यंत कॅसिनो युक्त्या करत असतात. राज्यात चेकपोस्टपासून ते रस्त्यांवरील डिव्हायडरपर्यंत सर्वत्र कॅसिनोंच्या जाहिराती झळकत असतात. गोव्यातील उद्योगांपैकी जुगार चालवणारे कॅसिनो हा एक महत्त्वाचा आणि टाळता येणार नाही असा उद्योग आहे. त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आजच्या घडीला मांडवीत सहा, तर जमिनीवर पंधरापेक्षा जास्त कॅसिनो सुरू आहेत. काही कॅसिनो बंद पडले असले, तरी काही ठराविक कॅसिनो दिवसेंदिवस आपला विस्तार करत आहेत. डेल्टीन, बीग डॅडी, मॅजेस्टीक, प्राईड, कॅडिलॅक असे काही मोठे कॅसिनो गोव्यात सध्या सुरू आहेत. सरकारलाही वर्षाकाठी शेकडो कोटींचा महसूल येतो, त्यामुळे कॅसिनोंसाठी पायघड्या घातलेल्या आहेत. गेल्या पाच वर्षांतच राज्य सरकारला सतराशे कोटींचा महसूल आला आहे. हजारो लोकांना रोजगारही कॅसिनोंमुळे प्राप्त झाला आहे. कॅसिनोंमध्ये गोमंतकीयांना प्राधान्य दिले जात नाही, याकडे मात्र सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. पण कॅसिनोंच्या कुठल्याही गोष्टीला सरकार नाही म्हणत नाही.
मांडवीतून कॅसिनो हटवण्यासाठी भाजप सरकारने २०१२ पासून लोकांना झुलवत ठेवले आहे. दरवेळी कॅसिनो स्थलांतरच्या प्रस्तावाला सरकार मुदतवाढ देत असते. तरंगत्या कॅसिनोंसाठी दुसरी पर्यायी जागा सरकारने शोधलेली नाही. त्यामुळे हे कॅसिनो आता अनिश्चित काळासाठी मांडवीत राहतील, हे स्पष्ट आहे. निवृत्त न्या. फेर्दिन रिबेलो यांच्या नेतृत्वाखालील ‘इनफ इज इनफ’ या चळवळीने मांडवीतून कॅसिनो हटवण्यासाठी सरकारकडे मागणी केली आहे. पण सरकराने या चळवळीच्या कुठल्याच मागणीवर आजपर्यंत निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे या चळवळीतील लोकांनी पुढाकार घेऊन न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सरकारने कॅसिनो जहाजांना मांडवी नदी दिली असली, तरी कॅसिनो जहाजे खोल समुद्रात न जाता पणजी आणि बेतीच्या मधल्या भागातच नांगरून ठेवलेली असतात. फक्त पाण्यात नांगरून ठेवल्यामुळे ते ‘तरंगते कॅसिनो’ आहेत, अन्यथा ते एका जागेवरून हलतही नाहीत. मांडवीच्या ज्या पट्ट्यात कॅसिनो असतात, त्या भागाला जत्रेचे स्वरूप असते. मांडवीत एवढी मोठी कॅसिनो जहाजे ठेवण्यासाठी सरकारने परवानगी दिलेली असली, तरी मांडवीच्या या भागाच्या वहन क्षमतेची तपासणी व्हायला हवी. या कॅसिनोंमुळे मांडवीच्या या पट्ट्याचे किती प्रदूषण होते, त्याचाही अभ्यास व्हायला हवा. एकेक करून आज ना उद्या कॅसिनोंची जुनी जहाजे बदलून नवी जहाजे येतील. सध्याच्या जहाजांपेक्षा ती जहाजे मोठी असतील, त्यामुळे ही मोठी जहाजे एकाच भागात नांगरून ठेवून तिथे कॅसिनो चालवल्यास मांडवीत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. सरकारने या गोष्टीचा विचार करून मांडवीतील कॅसिनोंना जहाज बदलण्यासाठी परवनागी देताना तिथून ती कधी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केली जातील, त्याबाबतही मुदत ठरवायला हवी. मांडवीच्या उरावर अशी मोठमोठी जहाजे आणून ठेवण्यापूर्वी मांडवीच्या या भागाच्या वहन क्षमतेची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.