म्हापसा मार्केट सब-यार्डमधील नाला बुजवला ?

Story: अंतरंग- उत्तर गोवा |
06th May, 11:21 pm
म्हापसा मार्केट सब-यार्डमधील नाला बुजवला ?

म्हापसा मार्केट सब-यार्डमधील नैसर्गिक नाला हा व्यापारीवर्गाकडून कचरा टाकून बुजवला जात आहे. यावरून शहरात बनलेली कचरा विल्हेवाटीची गंभीर समस्या दिसून येत आहे. मार्केट सब-यार्डच्या मागील बाजूला ओसाड अशी पडिक सेज जमीन आहे. तिथे कचरा न टाकता तो नाल्यात टाकला जातो. यावरून जाणूनबुजून हा नाला बुजवला गेल्याची यार्डमधील व्यापारी तसेच कृषी पणन मंडळाची मानसिकता स्पष्ट होते.      

नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवण्याचा अधिकार कुणालाही नाही. अशाच प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील शेत जमिनीसह नाले आणि गटारे ही इमारत प्रकल्प आणि घरे, तसेच व्यवसायिक आस्थापने उभी करण्यासाठी बुजवली गेलेली आहेत. त्यामुळे मार्केट सब यार्डमधील नाला बुजवला जाण्यामागे नवल आणि नवीन असे काहीच नाही. कारण शहरातील राजकीय आणि अधिकारीवर्गाच्या मानसिकतेचा हा परिणाम आहे. ज्या व्यापारीवर्गाचा उदरनिर्वाह कृषी उत्पन्नावर चालतो, त्याच शेतीसाठी उपयुक्त असा पावसाच्या पाण्याचा निचरा होणारा नाला बुजवणे तोदेखील दुकानातील टाकाऊ कचरा टाकून, ज्यामुळे मार्केट यार्डसह बाजारपेठेत पूराच्या स्थितीला आमंत्रण देणाऱ्या मानसिकतेची कीव वाटते.      

हा नाला बुजवण्याच्या कृतीला कृषी पणन मंडळ, म्हापसा नगरपालिकेचे अधिकारी, जलस्रोत खाते आणि जागृत व सुशिक्षित व्यापारीवर्गाने मज्जाव करायला हवा होता. या लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळेच ‘टुगेदर फॉर म्हापसा’सारख्या स्वंयसेवी संघटनेला पुढाकार घ्यावा लागला. संघटनेच्या कायदेशीर पत्रव्यवहारामुळे प्रशासकीय यंत्रणेला हा नाला साफ करावा लागला; परंतु या नाला उपसाचे काम पाहता वरील प्रशासकीय यंत्रणा ही मानहानीच्या प्रसंगातून गेल्याचे दिसत आहे. कारण नाल्यातील गाळ हा काठावरच ठेवला गेला आहे. यावरून हा नाला बुडवण्याकडेच त्यांचा कल असण्यामागील संशयाला वाव मिळत आहे. अशा बेकायदा प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने कडक पावले उचलण्याची गरज आहे.

 - उमेश झर्मेकर