भाजप वगळता कुठल्याच पक्षाने सदस्य करण्याच्या प्रक्रियेकडे गांभिर्याने पाहिले नाही. जशी लाट आली तशी सत्ता केली. पण कॅडरचे मतदार तयार करण्यावर भाजपने भर दिला आणि आता तेच कॅडर इतर पक्षांची पाळेमुळे उखडून फेकत आहेत.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ, पुदुच्चेरीमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. अनपेक्षितपणे प्रथमच पश्चिम बंगालसारख्या राज्यात भाजपने बाजी मारली आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला उतरती कळा लागल्याचे सिद्ध झाले. एका राज्यात एक प्रादेशिक पक्ष सत्तेतून बाहेर होताना तामिळनाडूसारख्या मोठ्या राज्यात नव्या पक्षाचा आणि नव्या नेत्याचा उदय झाला आहे. तामिळनाडूत अभिनेते विजय थलपती यांच्या पक्षाने इतर दोन जुन्या आणि राजकारणात दशकांपासून मुरलेल्या पक्षांना मागे टाकले आहे. केरळमध्ये काँग्रेसप्रणित आघाडीने सत्ता मिळवली आहे. आसाममध्ये हेमंत बिस्व सरमा यांच्या नेतृत्वाखालील भाजपने, तर पुदुच्चेरीतही भाजपला मतदारांनी स्वीकारले आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि केरळ वगळता इतर तीन ठिकाणी भाजपला मोठे यश मिळाले आहे. यात सर्वांत मोठे यश पश्चिम बंगालचे. कधीकाळी कम्युनिस्टांच्या ताब्यातील पश्चिम बंगाल काढून घेत तृणमूल काँग्रेसने तिथे आपले वर्चस्व वेळोवेळी सिद्ध केले होते. तृमणूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी गेल्या काही वर्षांत भाजपसोबत थेट संघर्ष चालवला होता.
ममता बॅनर्जी एकेकाळी भाजपच्या केंद्र सरकारमध्येही सहभागी होत्या; पण कालांतराने भाजपचे हिंदुत्व उफाळून येऊ लागल्यामुळे ‘हा पक्ष आपल्यासाठी नाही’ हे लक्षात आल्यामुळे त्यांनी भाजपची संगत सोडली. नंतर काँग्रेसशी जवळीक केली. देशाच्या राजकारणातील वजनदार महिला राजकारणी म्हणून गेली काही वर्षे ममता बॅनर्जी यांच्याकडे पाहिले जायचे. वयाने थकल्या असल्या तरी राजकारणातील डावपेचात त्या नेहमी आघाडीवर असायच्या. २०११ पासून त्यांनी पश्चिम बंगालमध्ये एक हाती सत्ता मिळवली होती. २०११ मध्ये १८४, २०१६ मध्ये २११ आणि २०२१ मध्ये २१५ जागांवर तृणमूलने विजय मिळवून सलगपणे सत्ता स्थापन केली होती. मागील तिन्ही निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढत असताना मतदार याद्यांची फेरपडताळणी सुरू करण्यात आली. मतदार याद्या स्वच्छ करण्याचे काम अनेक राज्यांमध्ये पूर्ण झाले. त्यात बिहार नंतर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूचाही समावेश होता. एसआयआरनंतर निवडणुका झाल्या त्याचाही परिणाम पश्चिम बंगालमध्ये दिसला असण्याची शक्यता आहे. तामिळनाडूत झालेल्या परिवर्तनातही मतदार याद्यांच्या पडताळणीचा प्रभाव असू शकतो. पण तिथेही विजयसारख्या अभिनेत्याने पहिल्याच निवडणुकीत मिळवलेल्या यशाने तिथल्या राजकीय आणि चित्रपट संस्कृतीची असलेली सांगड पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. आपल्या एखाद्या सिनेमासारखेच जोजेफ विजयने तामिळनाडूत पहिल्याच निवडणुकीत सत्ताधारी स्टॅलिनसारख्या राजकारण्याला धूळ चारून ब्लॉकबस्टर विजय मिळवला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या पराभवाची चर्चा, भाजपचा पश्चिम बंगालमधील उदय यासोबतच जोजेफ विजय अर्थात विजय थलपतीच्या राजकीय उदयाचीही चर्चा पुढील काही दिवस होणार आहे.
तरीही या निवडणुकीत ममता बॅनर्जीच्या तृणमूलचा भाजपकडून पराभव आणि स्टॅलिनसारख्या दिग्गजाकडून विजयसारख्या अभिनेत्याने पहिल्याच निवडणुकीत सत्ता काढून घेणे, या गोष्टींमध्ये ममता बॅनर्जींच्या पक्षाचा पराभव जास्त चर्चेत राहणार आहे. भाजप देशातील अनेक राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यात यशस्वी होत आहे. सूडाचे राजकारण, केंद्रीय तपास यंत्रणांचा होत असलेला गैरवापर, वाढत असलेली महागाई, देशातील बेरोजगारी वाढत असताना अशा प्रश्नांचा आणि निवडणुकींचा काही संबंधच राहिलेला नाही, असेच म्हणावे लागेल. दुसऱ्या बाजूने राज्यांतील अन्य पक्षांची सरकारेही बलाढ्य भाजपला रोखण्यात अपयशी होत आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार सारख्या राज्यानंतर पश्चिम बंगालसारखे मोठे राज्यही भाजपने मिळवले आहे. त्यामुळे तिथला विजय भाजप दिमाखात साजरा करत आहे. सर्वांत श्रीमंत राजकीय पक्ष असलेल्या भाजपकडे असलेली मालमत्ता आणि पैसे यांचा हिशोब केला तर देशातील एकाही किंवा एकत्र येऊनही इतर पक्षांची तुलना होऊ शकत नाही. अशा बलाढ्य पक्षासोबत इतर पक्षांचा लढा आहे. भाजप वगळता कुठल्याच पक्षाने सदस्य करण्याच्या प्रक्रियेकडे गांभिर्याने पाहिले नाही. जशी लाट आली तशी सत्ता केली. पण कॅडरचे मतदार तयार करण्यावर भाजपने भर दिला आणि आता तेच कॅडर इतर पक्षांची पाळेमुळे उखडून फेकत आहेत. सोबतच साम, दाम, दंड, भेद अशा पद्धतीने आक्रमक होऊन भाजप लढत असतो. या पक्षासमोर इतर पक्ष शक्तीनेही कमी पडत आहेत. त्यामुळेच भाजपच्या विजयामुळे आश्चर्यचकित होण्याची आवश्यकता नाही.