मुंबईचा वणवा आता गोव्याच्या उंबरठ्यावर !

Story: प्रासंगिक |
03rd May, 08:05 pm
मुंबईचा वणवा आता गोव्याच्या उंबरठ्यावर !

निसर्गाची मुक्त उधळण, डोंगरदऱ्यातून वाहणारा दूधसागरासारखा शुभ्र धबधबा आणि फेसाळलेला अथांग समुद्र लाभलेला आपला गोवा आज केवळ भारताचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र, याच सौंदर्याला आता परप्रांतीयांच्या वाढत्या विळख्याची दृष्ट लागली आहे. ज्या गोव्याने शतकानुशतके आपली संस्कृती आणि शांतता जपली, तोच गोवा आज एका अदृश्य संकटाच्या छायेखाली वावरत आहे. कधीकाळी रस्त्याच्या कडेला नगण्य वाटणारे परप्रांतीय फेरीवाले आज गोव्याच्या मुख्य व्यापारावर कब्जा करू पाहत आहेत. ‘कानामागून आले आणि तिखट झाले’ या उक्तीप्रमाणे, हे लोंढे आज गोव्याच्या अर्थव्यवस्थेची नाडी आपल्या हातात घेऊ लागले आहेत, तर दुसरीकडे आपला मूळ गोवेकर माणूस ‘सुशेगात’ वृत्तीत गुरफटून उद्याच्या भयावह परिस्थितीकडे डोळेझाक करत आहे.

आज गोव्याने मुंबईच्या भीषण वास्तवाचा आरसा डोळ्यासमोर ठेवण्याची नितांत गरज 

आहे. एकेकाळी मुंबईवर मराठी माणसाचा आणि मराठी संस्कृतीचा पगडा होता. पण जेव्हा परप्रांतीयांचे लोंढे मुंबईत धडकू लागले, तेव्हा तिथला स्थानिक मराठी माणूस 'मला काय त्याचे' म्हणत ध्यानस्थ बसला होता. जेव्हा त्याचे डोळे उघडले, तेव्हा खूप उशीर झाला होता. आज स्वतःच्याच हक्काच्या मुंबईत मराठी माणूस परका झाला असून तिथल्या व्यापार आणि राजकारणावर परकीयांनी आपली मक्तेदारी निर्माण केली आहे. मुंबईची झालेली ही 'बजबजपुरी' आणि तिथे मराठीच्या अस्तित्वासाठी सुरू असलेला संघर्ष हा गोव्यासाठी एक मोठा धडा आहे. जर आज गोवेकरांनी आपल्या डोळ्यात अंजन घातले नाही, तर उद्याची विध्वंसक सुनामी गोव्याचे अस्तित्व धुवून नेल्याशिवाय राहणार नाही. 

लोकशाहीने प्रत्येकाला कुठेही राहण्याचे आणि व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, हे मान्य असले तरी, या स्वातंत्र्याचा अर्थ स्थानिक भूमिपुत्रांना देशोधडीला लावणे असा कदापि असू नये. आज गोव्यात रस्त्यारस्त्यांवर वाढणारी फेरीवाल्यांची संख्या हे गोव्याच्या विद्रूपीकरणाचे पहिले लक्षण आहे. मुंबईमध्ये आता उशिरा का होईना, पण फेरीवाला परवाना आणि इतर रोजगारांसाठी वास्तव्याची अट कडक करण्यात आली आहे, ज्यामुळे तिथल्या भूमिपुत्राला रोजगाराचा थोडा का होईना ‘ऑक्सिजन’ मिळू लागला आहे. गोव्यातील सरकारनेही आता अशाच प्रकारचे ठोस पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. गोव्याचे हित जोपासण्याचे कर्तव्य केवळ कागदावर न राहता, परप्रांतीयांचे हे लोंढे रोखण्यासाठी सरकारने कडक नियमावली आणि धोरणे आखणे गरजेचे आहे.

गोव्याची आर्थिक समृद्धी तेव्हाच टिकून राहील, जेव्हा इथला स्थानिक भूमिपुत्र आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. केवळ सरकारवर ताशेरे ओढून किंवा राजकारण्यांना दोष देऊन हा प्रश्न सुटणार नाही. प्रत्येक गोवेकराने आता स्वतःच्या अस्तित्वासाठी जागरूक होऊन एकजुटीच्या बंधाऱ्याची भिंत उभारणे आवश्यक आहे. जर आज आपण ही भिंत उभारली नाही, तर भविष्यात गोव्याची अस्मिता आणि संस्कृती केवळ इतिहासाच्या पुस्तकातच शिल्लक राहील. आपली मायभूमी परकीयांच्या हातात जाताना उघड्या डोळ्यांनी पाहण्यापेक्षा, आताच संघटित होऊन गोव्याचे 'गोवेपण' जपण्यासाठी लढा देण्याची हीच ती योग्य वेळ आहे.

- सुजाता लोलयेकर

(दाबोळी (९३७०१८८१९४)