आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीए आघाडीवर, बहुमताच्या दिशेने वाटचाल

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
19 mins ago
आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीए आघाडीवर, बहुमताच्या दिशेने वाटचाल

गुवाहाटी : भारतीय निवडणूक आयोगाच्या कलांनुसार आसाम ‌विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA)  आघाडी कायम ठेवली आहे. पक्ष बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. 

१२६ सदस्यीय विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (४ मे २०२६) मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. सुरूवातीच्या कलांमध्ये एनडीए ७९ पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर तर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस २४ जागांवर आघाडीवर आहे. भाजप सत्तेचा सलग तिसरा कार्यकाळ राखण्यात यशस्वी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बहुमतासाठी आवश्यक ६४ जागांचा टप्पा गाठण्याचा दावा दोन्ही प्रमुख आघाड्यांकडून केला जात आहे. एकीकडे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा  (Himanta Biswa Sarma)  यांच्या नेतृत्वाखालील भाजपने एनडीएला जवळपास १०० जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे गौरव गोगोई (Gaurav Gogoi) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसप्रणीत आसोम सोनमिलितो मोर्चा (ASM) सुद्धा दशकानंतर सत्तेत पुनरागमनाचा दावा केला आहे.

राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ४० केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये एकच मतमोजणी केंद्र असले, तरी नागाव जिल्ह्यात तीन, तर कोकराझार, तिनसुकिया आणि जोरहाट या जिल्ह्यांत प्रत्येकी दोन केंद्रांवर मतमोजणी केली जात आहे. मतमोजणी अंतिम टप्प्यात पोहोचत असताना, आसामच्या सत्तेचा किल्ला कोणाच्या हाती जाणार, याचा निर्णय लवकरच स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा